(जन्म २७ मार्च १८८६–मृत्यू १७ ऑगस्ट १९६९). विसाव्या शतकातील वास्तुकलेलावेगळी दिशा देणारा, श्रेष्ठ जर्मन-अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ. आकन (जर्मनी) येथे जन्म. त्याचे वडील निष्णात गवंडी व पाथरवट होते. त्यांनीच त्याला वास्तुकलेतील प्राथमिक धडे दिले. त्यानंतर ब्रूनो पाउल या फर्निचर-रचनाकाराकडे त्याने काही काळ उमेदवारी केली व त्यानंतर पेटर बेरेन्स, शिंकेल, बेर्लाज या वास्तुशिल्पज्ञांच्या प्रभावातून त्याची वास्तुशैली घडत गेली. १९१३ मध्ये रोअने स्वतःचा वास्तुव्यवसाय सुरू केला. १९१९ मध्ये कल्पिलेला, काचेचे बाह्यांग असलेला गगनचुंबी वास्तुप्रकल्प आणि त्यानंतर तीन वर्षांनी काँक्रीट व काच या साधनांचा वापर करून कार्यालयीन वास्तुप्रकल्प हे त्याच्या अभिनव कल्पकतेची साक्ष देतात १९२९ मध्ये बार्सेलोना येथील प्रदर्शनात रोअने जर्मन दालनाची रचना केली. हे साधे दिसणारे आयताकृती दालन अवकाशरचनेतील सघनता आणि पोकळी यांचा समन्वय, प्रमाणबद्धता तसेच संगमरवर, काच लोह या साधनांच्या अत्याधुनिक प्रकारांचा वापर या गुणवैशिष्ट्यांमुळे अत्यंत लोकप्रिय झाले. या दालनातील रोअ निर्मित ‘बार्सेलोना चेअर’ प्रसिद्ध असून आजही तिची निर्मिती केली जाते. याच सुमारास त्याने चेकोस्लोव्हाकियात बांधलेले ‘तुजेन्हॅट हाउस’ (१९३०) त्याच्या शैलीची गुणवैशिष्ट्ये विकसित करणारे ठरले. वास्तूच्या कार्यवादी उद्दिष्टाचे, म्हणजेच ती वास्तू कोणत्या कार्यासाठी योजलेली आहे, त्याचे वास्तु-अवकाशरचनेत ठेवलेले भान, वास्तु-अलंकरण पद्धतींचा पूर्ण अव्हेर, रचनेतील साधेपणा आणि घनाकारांपेक्षा अवकाशातील आकारमानांचा साधलेला समन्वय अशा मूलभूत तत्त्वांवर रोअची वास्तुशैली पुढे विकसित होत गेलेली दिसते. १९३० मध्येबौहाउस या कलासंस्थेचा संचालक म्हणून रोअची नियुक्ती झाली. पुढे १९३७ मध्ये त्याने जर्मनी सोडली व तो अमेरिकत स्थायिक झाला. शिकागो येथील ‘इलिनॉथ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (पूर्वीची ‘आर्मर इन्स्टिट्यूट’) तो संचालक होता (१९३८ ते ५८).
अमेरिकेत खऱ्या अर्थाने रोअची वास्तुकला बहरली. आधुनिक वास्तुकलेच्या इतिहासातील काही अत्यंत क्रांतिकारी वास्तू त्याने १९५० व १९६० या दशकांत बांधल्या. त्यांपैकी इलिनॉय येथील ‘फार्नझ्वर्थ हाउस’ (१९४६–५०), शिकागो येथील ‘लेक शोअर ड्राइव्ह’ या गृहवास्तू (१९५०–५१), न्युयॉर्कमधील ‘सीग्रॅम बिल्डिंग’ (१९५६–५८), न्यू जर्सी येथील ‘कोलोनेड पार्क’ (१९६०), ‘इलिनॉय इन्स्टिट्यूट’च्या इमारती, मेक्सिको येथील ‘बाकार्डी ऑफिस बिल्डिंग’ (१९६१) या वास्तू आणि १९६९ मध्ये उभारलेली बर्लिन येथील ‘नॅशनल गॅलरी’ ह्या रोअच्या शैलीचा सर्वोत्तम आविष्कार घडविणाऱ्या वास्तू मानल्या जातात. काच आणि धातू (विशेषतः पोलाद) या साहित्याचा वापर त्याच्या वास्तुरचनेत मुखत्वे असल्याने त्यात आयताकृती अवकाशरचना, रेषात्मक सौंदर्य, भौमितिक घनकारांतून व्यक्त होणारा साधेपणा ही वैशिष्ट्ये सातत्याने आढळतात. तसेच विविध वास्तुघटकांची जडणघडण नियोजनपूर्वक केलेली असते.
रोअने आपल्या वास्तुशैलीविषयी फारच थोडे लिखाण केले; परंतु त्याचे ‘लेस इज मोअर’ हे तत्त्व प्रसिद्ध आहे. याचा अर्थ वास्तूचे मूलभूत कार्य विचारात घेऊन वास्तुघटकांची संख्या शक्य तितकी कमी करणे व त्यायोगे सुनियोजित अवकाशनिर्मिती करणे, हा आहे. असे केल्यानंतर जी शैली अभिव्यक्त होते, ती शक्य तितक्या साधेपणाने झालेली प्रामाणिक कलानिर्मिती असते आणि म्हणूनच श्रेष्ठ दर्जाची असते. रोअच्या शैलीचा प्रभाव आज जगभरच्या असंख्य वास्तुनिर्मितींतून आढळतो. शिकागो येथे त्याचे निधन झाले.
लेखक : विजय दीक्षित
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/20/2020