অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीमकाम

प्रस्तावना

कापडावर रेशीमधाग्यांनी करण्यात येणारे विणकाम (सिल्क बीव्हिंग). रेशमाचे उत्पादन करण्याचे तंत्र शोधून काढण्याचे श्रेय चीन देशाला निर्विवादपणे दिले जाते. चीनमध्ये इ. स. पू. २६४० च्या सुमारास चिनी सम्राट हुआंग-ती याची पत्नी सी लिंग शी हिने रेशमाची पैदास करण्याचे तंत्र शोधून काढले. रेशीमधागा चिवट, मृदू व तकाकीयुक्त असल्यामुळे त्याच्यापासून विणलेली वस्त्रे अत्यंत मृदू, मुलायम पोताची, टिकाऊ व शानदार भासणारी असत. या वस्त्रांचे सुंदर अभिकल्प व त्यांमधील मोहक रंगसंगती यांमुळे त्यांनी प्राचीन काळी जगाचे लक्ष वेधून घेतले.

पौर्वात्य रेशीमकाम

इ. स. पू. पहिल्या शतकापासून या वस्त्रांची निर्यात पौर्वात्य तसेच पाश्चात्त्य देशांत उंटांच्या काफिल्यांकरवी सुरू झाली. सिरियन व्यापाऱ्यांचे तांडे असे काफिले घेऊन पामीरच्या खिंडीतून पार्थियामार्गे सिरियात येत. हा मार्ग अवघड व धोकादायक असून रेशीममार्ग (सिल्क-रूट) म्हणून प्राचीन काळी प्रसिद्ध होता. ही वस्त्रे सिरियातून पूर्वेकडील तसेच पश्चिमेकडील विविध देशांत पाठविली जात.

चीन

चिनी लोक ‘सेरीस’ या नावाने प्राचीन काळी ओळखले जात असल्याने रेशमी किड्यांचे संवर्धन ‘सेरिकल्चर’ या नावाने संबोधले जाऊ लागले. भारतात रेशमी वस्त्रे ‘चीनांशुक’ म्हणून ओळखली जात.

मंगोलिया, रशिया, सिरिया इ. देशांत तसेच रेशीममार्गावरील अनेक कबरींत अगणित चिनी रेशमी वस्त्रांचे नमुने उत्खननात मिळाले. ब्रिटिश हंगेरियन पुरातत्त्ववेत्ता व भूगोलज्ञ सर ऑरेल स्टेन (१८६२-१९४३) या संशोधकाने या बाबतीत केलेले संशोधन महत्त्वपूर्ण आहे. या तपशिलांतून तसेच अरबी इतिहासकार अल् मसूदी (९५६) व जगप्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो (१२५४-१३२४) यांच्या वर्णनांवरूनही चिनी वस्त्रांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

रेशमी धाग्याच्या निर्मितीचे रहस्य अनेक वर्षे गुप्त ठेवण्याचे कसोशीचे प्रयत्‍न चिनी लोकांनी केले; परंतु इ. स. पहिल्या शतकात एका चिनी राजकन्येचा खोतानच्या राजपुत्राशी विवाह झाला; तेव्हा खोतानला जाताना तिने आपल्या केशभूषेत रेशमाच्या किड्यांची अंडी लपवून नेली व तेथे वस्त्रोत्पादन सुरू केले. यानंतर हे तंत्र इराण, भारत, जपान इ. देशांत, बायझंटिन साम्राज्यात तसेच पुढे जगभर पसरले.

चिनी वस्त्रे सुंदर, सफाईदार व तलम पोताची असत. उन्हाळ्यात वापरण्यासाठी विणला जाणारा ‘पा-ओ’ अंगरखा तर अत्यंत तलम व दोन औंसांपेक्षा (५६ ग्रॅम ) कमी वजनाचा असे. सुंदर, तलम पोताबरोबरच मोहक आकृतिबंध व सुखद रंगसंगती यांमुळे चिनी वस्त्रे लोकप्रिय झाली.

हान साम्राज्यकाळात (इ. स. पू. २०२ ते इ. स. ९) रेशमी कस्सू वस्त्रे वा चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) व भरतकामाची वस्त्रे तसेच प्राणी व मानवाकृती यांचे अलंकरण असलेली दमास्क वस्त्रे (ही वस्त्रे प्रथम दमास्कसमध्ये तयार करण्यात आल्याने त्यांना हे नाव पडले), गॉझ म्हणून ओळखली जाणारी जाळीदार वस्त्रे तयार होऊ लागली. यांवरील नक्षींत भौमितिक आकृतिबंध तसेच घोडे, ड्रॅगन यांचे लांबट आकार; गाठ, ढग, पाने-फुले, घोडेस्वार, पंखांचे घोडे, प्राण्यांची झुंज असे विविध आकार आढळतात.

थांग साम्राज्यकाळात (६१८-९०६) चीनचे व्यापारी संबंध भारत व इराणसारख्या दूरवरच्या देशांत पसरले. इराणी अलंकरण व भारतीय बौद्ध धर्म यांचा प्रभाव चीनमध्ये वाढला. त्यामुळे इराणी मंडलाकार नक्षी, शिकार करणारे घोडेस्वार तसेच बुद्ध व बोधिसत्त्वांच्या आकृती वस्त्रांमध्ये दिसू लागल्या. इतर अलंकरणांत शंभर फुलांतून वर येणारा ड्रॅगन, संगीताची वाद्ये, उडणारी बदके, मोर इ. आकार दिसू लागले.

सुंग काळात (९६०-१२७९) रेशमी, किनखाबी, मखमली व कस्सू वस्त्रे यांची निर्मिती होऊ लागली. ही कस्सू वस्त्रे रेशमी ताणा आणि रेशमाबरोबर जरीचा धागा बाण्यासाठी वापरून घट्ट विणीने विणली जात व अलंकरणही सुंदर असे. दोन्ही दृष्टींनी ती उच्च दर्जाची मानली जात. प्रसिद्ध फ्रेंच गोबेलिन वस्त्रेही त्यांच्या तुलनेत फिकी पडतील, इतकी ती गच्च विणीची असून त्यांची जर शेकडो वर्षांनंतरही तशीच झगझगीत राहिल्याचे आढळते.

मंगोल सम्राटांच्या काळात (१२६०-१३६८) चिनी सम्राटांचे संबंध इस्लामी सम्राटांबरोबर सलोख्याचे असल्याने इराणी  व तुर्की शैलींतील अलंकृत वस्त्रे आणि चिनी शैलीतील अलंकरणयुक्त वस्त्रे यांची देवाणघेवाण झालेली आढळते. चिनी वस्त्रांवर अरबी लिपीतील अक्षरे आली, तसेच दमास्क वस्त्रांचा प्रभाव पडला, तर इस्लामी वस्त्रांवर सर्वत्र स्वतंत्र, सुटे अभिकल्प दिसू लागले. या काळात चित्रविचित्र प्राण्यांचे आकारही नक्षीत आले.

चीनमध्ये मांचू राजवटीत (१६४४-१९१२) रुजाग्याचे गालिचे, मखमली व भरतकामाची वस्त्रेही विशेष सुंदर शैलीत विणली गेली. चिनी स्त्रिया सुंदर भरतकामात निपुण होत्या; विशेषतः, शांघायमधील ‘कू’ घराण्यातील स्त्रिया भरतकामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या भरतकामात निसर्गातील पाने, फुले, झाडे, पक्षी यांचे आल्हाददायक आकार असत. चिनी वस्त्रांवरील नक्षीत ड्रॅगन, चंद्र, सूर्य, तारे, लाटा, ढग इत्यादींच्या आकारांचा प्रतीकात्मक वापर केला गेला.

इराण

इराणमध्ये तिसऱ्या शतकात सॅसॅनिडी वंशाच्या राजवटीत दुसऱ्या शापुरने सिरिया व मेसोपोटेमिया येथील कुशल विणकर आणून रेशमी वस्त्रांच्या उत्पादनास चालना दिली. चीनमधून आणलेले कच्चे रेशीम यासाठी वापरले जाई. पर्सेपलिसजवळील नाक-ई-बोस्तान येथील खडकावर कोरलेल्या उत्थित शिल्पात खुस्त्रू परवीझ व त्याच्या अधिकाऱ्यांच्या कपड्यांवर कोरलेले तिसांहून अधिक अभिकल्प सॅसॅनियन अलंकरणाची कल्पना देतात. यांत चौरस वा मंडलयुक्त आकारात पक्षी, प्राणी असून त्यांपैकी काहींच्या गळ्यांत अगर पायांत फडफडणाऱ्या फिती आढळतात. स्वतः खुस्त्रूच्या तुमानीवर प्रसिद्ध सॅसॅनियन ‘सेनमूर्व’ प्राणी दिसतो. हा प्राणी मोराचा पिसारा, गरुडाचे पंख व पुढचा अर्धा भाग आणि सिंहाचे पंजे अशा वैचित्र्यपूर्ण मिश्रणाने बनविण्यात येऊन सॅसॅनियन राजघराण्याचे प्रतीकचिन्ह म्हणून वापरला गेला.

सॅसॅनियन वस्त्रांवरील संकल्पनांत अंतराअंतरावर असलेले स्वतंत्र अभिकल्प व पाठीमागील एकरंगी पार्श्वभूमी हे वैशिष्ट्य आढळते. हे बुट्टे तिरप्या रेषेत रचना करून विणले जात. इतर कबरींत सापडलेल्या वस्त्रांतही अनेक चित्रविचित्र पशुपक्ष्यांचे आकार, मानवाकृती मुखवटे, पंखांचे घोडे, बकरे इ. आकार मोत्याप्रमाणे ठिपके असलेल्या रुंद पट्ट्यांच्या वर्तुळाकारात विणलेले आढळतात. अलंकरणात परस्परसन्मुख पक्ष्यांची जोडीही दिसते.

या वस्त्रांत टसरप्रमाणे वीण वापरून रेशमाची तकाकी असलेल्या धाग्याचा भाग पृष्ठभागावर येईल, अशा पद्धतीने विणल्यामुळे सर्व पृष्ठभागाला एक तकाकी दिसते. ही पद्धत अकराव्या शतकापर्यंत, विशेषतः इराणी रेशमी वस्त्रांच्या विणीत वापरली गेली.

या काळातील इराणी वस्त्रे पाश्चात्त्य देशांतील चर्चमधील संग्रहालयांतही आढळतात. यांत वरील अभिकल्पांखेरीज अनेकरंगी किनखाबी विणीत शिकारीचे देखावे, जीवनवृक्ष, सुरूची झाडे, दोन तोंडांचा गरुड (सामर्थ्याचे प्रतीक) व तीन रत्‍नांचा हार तोंडात धरलेला पक्षी (सम्राज्ञीचे प्रतीक) असे आकार आढळतात. या आकारांखेरीज डाळिंबाचा आलंकारिक आकारही नक्षीत दिसतो. हाच पुढे पाश्चात्त्य देशांत व इस्लामी वस्त्रकलेत आवडीने वापरला गेला.

इस्लामी राजवटीत इराणमध्ये धार्मिक पुस्तकांतील चित्रे तसेच पानाफुलांच्या अलंकरणात चित्रशैलीचा प्रभाव दिसू लागला. अरबी लिपीच्या अक्षरांचाही अंतर्भाव वस्त्रातील अलंकरणात झाला. या काळातील किनखाबी वस्त्रांत जरीच्या कापडाच्या पार्श्वभूमीवर मखमली विणीत उठावदार दिसणाऱ्या आकृती अत्यंत मोहक, झगझगीत रंगांत विणल्या गेल्या. दुसरे महत्त्वाचे तंत्र म्हणजे, दुहेरी विणीचे कापड विणले गेले. यात जरीच्या धाग्याबरोबरच तिहेरी वीण वापरून विणलेले वस्त्र याखेरीज वेगवेगळ्या विणींचा एकाच कापडात वापर करून विणलेली ‘लंपास’ वस्त्रेही प्रसिद्धीस आली. इराणी वस्त्रांच्या रंगसंगतीत पिवळट हिरवा, गडद हिरवा, करडा, झगझगीत निळा, लाल असे अनेक रंग वापरले गेले. नक्षीत गडद निळ्यावर पांढरा व करडा, लालभडक पार्श्वभूमीवर सोनेरी अशा सुंदर रचना आढळतात. गडद जांभळा रंग राजवस्त्रांसाठी वापरला गेला.

बायझंटिन

बायझंटिन साम्राज्यकाळात (इ. स. ३३० ते १४५३) रेशमी कापड सोन्याइतके मोलाचे मानले जाई. प्रसिद्ध बायझंटिन सम्राट पहिला जस्टिनिअन (४८३-५६५) याने तिबेटी साधूंना मोठे आमिष दाखवून त्यांच्याकरवी रेशमी किड्यांची अंडी आणविली व रेशमी वस्त्रांचे उत्पादन कॉन्स्टँटिनोपल येथे सुरू केले. राजांच्या कार्यशाळांत सुरूवातीला इराणी व सिरियन विणकर हे उत्पादन करू लागले. साहजिकच इराणी अभिकल्प व बायझंटिन चित्रशैलीतील ख्रिस्ती अलंकरण, उभट उंच आकार व ठळक बाह्यरेषा यांचा मिलाफ या वस्त्रांवरील नक्षीत झाला. पंख असलेले सिंह, इतर पशू व चित्रविचित्र आकारांचे प्राणी, पानाफुलांचे आलंकारिक आकार, भावदर्शी टपोरे डोळे असलेले चेहरे व उंच मानवाकृती हे आकार दिसू लागले. सुंदर वीण व झगझगीत रंगसंगती यांमुळे ही वस्त्रे पाश्चात्य देशांत लोकप्रिय झाली. ईजिप्शियन कबरी व पश्चिमेकडील रोमन साम्राज्यातील अनेक चर्चचे संग्रह यांत बायझंटिन वस्त्रांचे जतन केलेले नमुने आढळले आहेत. शार्लमेन राजाच्या कबरीतही अशी वस्त्रे आढळली आहेत.

बायझंटिन वस्त्रांवरील आकारांत पानाफुलांचे पौर्वात्य अलंकरण, सपाट रंग व ग्रीक पद्धतींच्या पिळदार देहाच्या मानवाकृती यांचा मिलाफ झाला. याचे सुंदर उदाहरण प्रसिद्ध सॅमसन सिल्क आणि क्वाड्रिगा सिल्क या उल्लेखनीय वस्त्रांत दिसते. रंगसंगतीत लाल अगर जांभळ्या गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी, पिवळा, काळा, पांढरा वगैरे रंगांचे अलंकरण नक्षीत दिसते. झगझगीत रंगसंगती, सुसंवादी रचना आणि कलात्मक आकार हे या वस्त्रांचे वैशिष्ट्य मानले गेले.

इस्लाम काळ

इस्लामी वर्चस्वाचा काळ वस्त्रकलेत महत्त्वाचा ठरला; अरबी लिपीमधील गोल अक्षरांच्या नक्श शैलीचे व कोनात्मक अक्षरांच्या क्यूफिक शैलीचे सुलेखन हे मृत्पात्री व अन्य कारागिरीच्या वस्तूंप्रमाणेच वस्त्रांवरील अलंकरणातही दिसू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे, मानवाकृती काढण्यास मनाई असल्याने पानाफुलांची व भौमितिक आकारांची नक्षी प्राचुर्याने दिसू लागली.

इराकमधील बगदाद शहरातील कुशल विणकरांचे व पशुपक्ष्यांच्या सुंदर नक्षीने त्यांनी विणलेल्या वस्त्रांचे कौतुक प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो याने केले आहे. ईजिप्तमध्ये इस्लामी राजवटीत अरबी सुभाषिते अलंकरणात आली. ही अक्षरे विणलेली वस्त्रे ‘तिराझ’ वस्त्रे या नावाने ओळखली जात. अशा कापडात चंदेरी व सोनेरी धागाही वापरला जाऊ लागला. नक्षीसाठी लोकरीच्या धाग्याऐवजी रेशमी धागा वापरण्याची पद्धत फातिमी खिलाफतीच्या काळात (९०८-११७१) ईजिप्तमध्ये आल्याबरोबर वस्त्रांवरील आकृतिबंधांत सूक्ष्म तपशील व वक्राकार यांना प्राधान्य मिळाले. त्यामुळे आकार अधिक नाजुक दिसू लागले. इस्लामी काळातील ईजिप्तमधील वस्त्रे ठसठशीत नक्षीची व विरोधी रंगच्छटांची होऊ लागली.

इस्लामी वर्चस्वाच्या काळात स्पेनमधील मूळ चित्रविचित्र प्राण्यांचे आकार असलेल्या नक्षीत इस्लामी पद्धतीची अक्षरे व पानाफुलांचे आकार मिसळून ‘हिस्पॅनो-मोरेस्क’ शैली (मूर लोकांचा स्पेनमध्ये प्रभावकाळ असताना त्यांनी मृत्पात्रे, वस्त्रे, प्रावरणे इत्यादींवर उमटविलेली वा प्रतिबिंबित केलेली आपली स्वतःची अशी खास स्वतंत्र शैली) वस्त्रांच्या अलंकरणातही आली. त्याचबरोबर वस्त्रात रेशमी धाग्याचा वापर सुरू झाला. कच्च्या रेशमाची आयात करून त्यापासून सुंदर वस्त्रे तयार होऊ लागली. ती इतकी लोकप्रिय झाली, की परदेशांतूनही त्यांना अतोनात मागणी आली. या काळातील जाळीदार जरी-किनाराची व कोनात्मक लिपीतील सुलेखन नक्षीची वस्त्रे तसेच सारागोझा येथे विणलेली सिंहांच्या जरतारी आकृत्या असलेली लाल रेशमी वस्त्रे उल्लेखनीय होती.

तुर्कस्तानमध्ये (१०७१-१२५९) विणलेली मखमली व रेशमी वस्त्रे सफाईदार विणीची व झगझगीत रंगांची आहेत. गालिचे तर अप्रतिम सफाईने व सुंदर रंगसंगतीत विणले गेले. सेल्जुक राज्यकर्त्यांच्या काळात तुर्की वस्त्रकलेला विशेष बहर आला. तुर्की रेशमी वस्त्रांची केंद्रे आशिया मायनरमध्ये होती व विशेषतः, दरबारी पोशाखांसाठी रेशमी व मखमली वस्त्रांचा वापर होऊ लागला. प्रत्येक सुलतानाचा पोशाख काळजीपूर्वक बनविला जाई. या सर्व वस्त्रांचा संग्रह इस्तंबूल येथील ‘टोपकापी प्रासादा’त आढळतो. त्यावरून या काळातील तुर्की वस्त्रांचे सुंदर रंग, अलंकरण व कौशल्याच्या विणीची कल्पना येते. दोन आडवे नागमोडी पट्टे व त्यांत तीन ठिपके हा आकार विशेषेकरून सुलतानांच्या वस्त्रांवर वापरला गेला.

इटली

अकराव्या शतकात रेशमी वस्त्रांचे उत्पादन इटलीमध्ये होऊ लागले. या कलेचा खरा बहर तेराव्या ते अठराव्या शतकापर्यंत होता. चौदाव्या शतकात एकछत्री साम्राज्याऐवजी लहानलहान राज्ये अस्तित्वात होती. त्यामुळे तेथील वस्त्रकलेच्या शैलीत व केंद्रांतही विविधता आली. ल्यूका येथे इराणी प्रभावातून प्राणी, पक्षी यांची नक्षी व गॉथिक शैलीच्या प्रभावाने ज्वालेप्रमाणे तळपत्या आकारांचे व गतिमानता दाखविणारे अलंकरण आले. ल्यूकामध्ये होणाऱ्या रेशमी वस्त्रांत प्रामुख्याने सॅटिनसारखी चकचकीत व फेट्यासारख्या विणीची नक्षी असलेली दमास्क वस्त्रे, तसेच दोन्ही बाजूंस सॅटिनप्रमाणे पात असलेली वस्त्रे व एकाच रंगाचा धागा वापरून केवळ वेगळ्या विणीमुळे किंचित उठावाची नक्षी दाखविणारी ‘डायस्प्रम’ वस्त्रे विणली गेली. यांत नंतर दुसरा रंग पार्श्वभूमीसाठी वापरून रंगसंगतीही अधिक परिणामकारक केली गेली आणि त्यांतच पार्श्वभूमी सफाईदार पिळाच्या धाग्याने; तर वरील नक्षी बिनपिळाच्या धाग्याने विणून विविधता साधण्यात आली. रंगसंगतीतही ल्यूकामध्ये झगमगणारे तेजस्वी रंग वापरले गेले.

फ्लॉरेन्समध्ये वस्त्रावरील अलंकरणात प्रबोधनकाळातील अभिजात कलाशैलीचा अधिक प्रभाव पडला. विख्यात चित्रकारांनीही या काळात वस्त्रांसाठी आकृतिबंध तयार केले. डाळिंबांचा आकार व ‘एस्’ या इंग्रजी अक्षराचा आकार तसेच कमानींच्या ओळी यांचा वापर आकृतिबंधांत करण्यात आला. सोळाव्या शतकात आकार अधिक वास्तववादी झाले. राजमुकुटांचे आकार व नाजुक बुट्टेही नक्षींत दिसतात. माणकासारखा सुरेख डाळिंबी लाल रंग हे या काळातील वस्त्रांचे वैशिष्ट्य. शिवाय तेजस्वी खुला निळा व जांभळा हेही रंग रंगसंगतीत आले.

व्हेनिसच्या रेशमी वस्त्रांतील नक्षींत चित्रविचित्र पशुपक्ष्यांचे आकार व रंगीत चित्रकाचांच्या खिडक्यांतील रंगसंगतीचा प्रभाव दिसतो. व्हेनिसच्या मखमली सर्वाधिक लोकप्रिय झाल्या. त्या एकरंगी व विविधरंगी अशा दोन प्रकारांत विणल्या गेल्या. या मखमलीची सर इतर कोणत्याही मखमलींना आलेली नाही.

फ्रान्स

फ्रेंच वस्त्रोद्योगात रेशमी वस्त्रांच्या उत्पादनास पंधराव्या शतकापासून राजश्रय मिळालेला दिसतो. सुरुवातीच्या वस्त्रांवर इटालियन प्रभाव होता. मात्र सतराव्या शतकात परकीय प्रभाव कमी होऊन स्वतंत्र फ्रेंच शैली निर्माण झाली. सॅटिन, दमास्क, ब्रॉकेटलेस, किनखाब (ब्रॉकेड), मखमल अशा विविध विणींची वस्त्रे तयार होऊ लागली. चौदाव्या लूईचा मंत्री झां बातीस्त कॉलबेअर (१६१९-८३) याने ‘गोबेलिन’ वस्त्राचे पुनरुज्‍जीवन करण्यात यश मिळविले. तसेच लीआँ येथे कुशल विणकरांची संघटना स्थापन केली. सतराव्या शतकात बरोक शैलीचे अलंकरणप्रचुर अभिकल्प व झगझगीत रंगसंगती वस्त्रांतही दिसते. मात्र त्या शतकात रोकोको शैलीच्या आगमनाबरोबरच सुखद व प्रसन्न अशा फिक्या रंगसंगती व नाजुक वक्राकार अलंकरणात आले. पाँपेई व हर्क्युलेनियम या प्राचीन रोमन शहरांच्या सोळाव्या शतकातील उत्खननांत आढळलेल्या अलंकरणाचा प्रभाव पडून समतोल व सरळ रेषांचे भारदस्त अलंकरण आले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियनच्या राजवटीत पुन्हा रोमन धाटणीचे समृद्ध अलंकरण आले. रोमन प्रतीके म्हणजेच गरुड व सिंह, तसेच लॉरेल पानांच्या माळा व त्यांत गुंफलेले ‘एन्’ हे आद्याक्षर दिसू लागले. भारतीय छपाईच्या वस्त्रांच्या प्रभावातून (क्रिस्टॉफ फिलिप ओबरकॅम्फ मृ. १८१५) याने छपाईची वस्त्रे निर्माण करण्यास सुरुवात केली. यानंतरच्या काळात छपाई व विणकाम यांत अनेक नवेनवे शोध लागले. त्यांत जॅकार्ड मागाचा शोध महत्त्वाचा ठरला.

इंग्लंड

फ्रान्समध्ये चौथ्या हेन्‍रीने १५९८ मध्ये ‘एडिक्ट ऑफ नँट्‌स’ या सनदेद्वारे फ्रेंच प्रॉटेस्टंटांना (ह्यूगनॉत्स) जे धर्मस्वातंत्र्य व नागरी हक्क बहाल केले होते, ते चौदाव्या लूईने १६८५ मध्ये ती सनद रद्द करून हिरावून घेतले; त्यामुळे बहुसंख्य फ्रेंच प्रॉटेस्टंट विणकरांनी फ्रान्स सोडून इंग्लंडमध्ये आश्रय घेतला. या महत्त्वाच्या घटनेमुळे इंग्लिश रेशमी वस्त्रोत्पादनाची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. इंग्लंडमध्ये तयार झालेल्या वस्त्रांत प्रामुख्याने दमास्क घाटणीच्या मृदू किनखाबी (ब्रॉकेड) वस्त्रांचा उल्लेख करावा लागेल.

भारतीय रेशीमकाम

भारतीय वस्त्रोद्योगामध्ये रेशमाचा वापर करण्याची प्रथा प्राचीन आहे. एवढेच नव्हे, तर भारताच्या विविध प्रांतांतील रेशमी भरतकाम तसेच वस्त्रप्रावरणांच्या विविध पद्धती परंपरागत कौशल्याची साक्ष देतात. भरतकामाच्या, तसेच रेशमी विणकामाच्या स्वतंत्र अशा वैशिष्ट्यपूर्ण शैली आढळतात. कर्नाटकचा कसूती कशिदा, पंजाबची फुलकरी, बंगालमधील कंथा, बनारसी रेशमी कारागिरी, लखनौची चिकनकारी, पहाडी प्रदेशातील चंबा रुमाल; एवढेच नव्हे, तर भटक्या जमातींतही रेशमी कशिद्याचा वापर चोळीवर व घागऱ्यावर केलेला आढळतो.

सृष्टिसौंदर्याने नटलेल्या काश्मीरमधील शाली, साड्या, बुरखे व अंगरखे यांच्यावरील सॅटिनच्या व इतर प्रकारच्या टाक्यांनी केलेले रेशमी भरतकाम पाहण्यासारखे असते. चिनारची सुंदर पाने, सफरचंदाची फुले, चेरी, आलुबुखार, सुरूची झाडे, फुलपाखरे आदींच्या आकृतिबंधांचा भरतकामाच्या संकल्पनांत विशेषत्वाने वापर केलेला आढळतो. शीतल रंगच्छटा व प्रसन्न रंगसंगती यांमुळे हे भरतकाम वैशिष्ट्यपूर्ण भासते.

लखनौच्या चिकन वस्त्रांतही रेशमी व सुती असे दोन्ही प्रकारचे कुसरकाम आढळते. या कलेचा उगम प्रथम पूर्व बंगालमध्ये झाला, असे मानतात. त्यानंतर अयोध्येच्या नबाबांच्या कारकीर्दीत ही कला लखनौला गेली. रेशमी वस्त्रांत टसर सिल्क अगर सॅटिनचे कापड यांवर, तर कधी मलमलीवर हे चिकनकाम केले जाते. वरच्या धाग्याच्या आतून दिसणाऱ्या रंगीत धाग्यांचे सौंदर्य हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते.

पंजाब

पंजाबमधील फुलकरी अतिशय प्रसिद्ध आहे. फुलकरी म्हणजे फुलापानांची कारागिरी. अशा पद्धतीची कारागिरी असलेल्या फुलकरी आणि बाग या प्रकारच्या शाली सुप्रसिद्ध आहेत. फुलकरी शालीवर दोन्ही टोकांना साडीच्या पदराप्रमाणे भरतकाम केले जाते, तर बाग शालींवर असे काठांचे स्वतंत्र अलंकरण दिसत नाही. बाग शालीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा फारच थोडा भाग भरतकामरहित दिसतो. लाल खादीवर विणलेला शालू, गडद निळ्या रंगाच्या कापडावर मोजकेच भरतकाम केलेले तीलपत्र, तर पिवळ्या अगर लाल धाग्यांनी विणलेली निकल शाल, डोक्यावर घुंगट घेण्यासाठी घुंगटबाग; तसेच समारंभात वापरण्याकरिता थोड्याशा मोठ्या आकाराचे चोपे व सुबर शाली या अतिबारकाईच्या भरतकामात विणल्या जातात. सुबरच्या चारी कोपऱ्यांवर व मध्यभागी पंचफुलांचा समूह विणला जातो व ही शाल होमाभोवती सात प्रदक्षिणा घालताना वधूने परिधान करावयाची असते. रेशमी शीशा या शालीत रेशमी भरतकामाबरोबर छोटे आरसेही गुंफण्यात येतात.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील चंबा हे शहर भरतकामाच्या चंबा रुमालांसाठी प्रसिद्ध आहे. हे रुमाल म्हणजे डोक्याला अथवा गळ्याभोवती बांधावयाच्या शालीच होत. विवाहप्रसंगी वरपक्ष व वधूपक्ष यांच्यात एकमेकाला दिलेले नजराणे या रुमालांनी झाकून देण्याची पद्धत होती. याचा आकार साधारणपणे २ फूट (६१ सेंमी.) ते ६ फूट (१८३ सेंमी.) व चौरस असतो. रुमालांवरील भरतकामात रासलीला, राधाकृष्ण यांमधील प्रणयदृश्ये अथवा अष्टनायिका, रागरागिण्या, हातांत हात घालून कृष्णाभोवती फेर धरून नाचणाऱ्या गोपी इ. विषय सॅटिनच्या भरीव धाग्यांनी व बारीक रेषांनी बाह्यरेषा भरून फुलविले जातात. अशा रुमालांचे सुंदर नमुने चंबा येथील भुरिसिंह संग्रहालय आणि मंडी येथील लोकसंस्कृती संस्थान संग्रहालयात आढळतात. लंडनमधील व्हिक्टोरिया व ॲल्बर्ट संग्रहालयांत कौरवपांडवांचे युद्धदृश्य भरतकामात विणलेले आढळते. हा रुमाल चबाराजा गोपालसिंग याने ब्रिटिशांना नजराणा म्हणून दिला. अखिल भारतीय हस्तोद्योग मंडळाच्या संग्रहालयातील रुमालावर रुक्मिणीहरणाचा प्रसंग बारकाव्याने भरलेला आहे.

कर्नाटक

कर्नाटकमधील कसूती, मेथी, मुरगयी, नोगी इ. वेगवेगळे टाके वापरले जाणारा कशिदाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या कसूती कशिद्यासाठी अभिकल्प छापून न घेता सुते मोजून टाका घातला जातो. लोकजीवनातील धार्मिक भावनांचे प्रतिबिंब या कशिद्याच्या अभिकल्पात आढळते. नंदी, गोपुर, उत्सवाचा रथ, पालखी, चंद्र, शंकर, कमळ अशी अनेक प्रतीके यात पहावयास मिळतात. इरकली साडीचे पदर, लहान मुलांची कुंची, गोधडी, झबले इत्यादींवरही शुभशकुनांची सांकेतिक चिन्हे भरतकामात केलेली आढळतात.

बंगाल

बंगालमधील कंथा हा भरतकामाचा प्रकार अतिशय कौशल्याचा व वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण यात घरातील जुन्या साड्या एकीवर एक ठेवून व त्यांची गोधडी शिवून त्याच साड्यांच्या पदरातील अगर काठांतील धागे ओढून काढून त्यांचा वापर करून त्यांवर सुंदर आकृती भरतकामात काढल्या जातात. यांतील शंभर पाकळ्यांचे कमळ म्हणजेच शतदलपद्म, मंडल वा कलश हे अभिकल्प लोकप्रिय आहेत.

लेखिका : नलिनी भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate