(२८ एप्रिल १९१३− ). आधुनिक इंग्लिश मूर्तिकार व वास्तुकार. पूर्ण नाव रेजिनल्ड कॉटरेल बटलर. हार्टफर्डशर परगण्यातील बंटिंगफर्ड येथे जन्म. त्याने १९३७ मध्ये वास्तुशास्त्राची पदवी घेतली व १९३७-३९ या काळात ‘लंडन आर्किटेक्चरल असोशिएश स्कूल’ येथे अध्यापन केले. १९३९-५० पर्यंत त्याने तंत्रज्ञ म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने ससेक्समधील एका खेड्यात लोहारकाम केले. १९४६-५० च्या दरम्यान तो आर्किटेक्चरल जर्नल या नियतकालिकाचा तांत्रिक संपादक होता. १९५० मध्ये लीड्स विद्यापीठात त्याची अधिछात्र म्हणून नियुक्ती झाली.
१९४७ मध्ये हेन्री मुरचा साहाय्यक या नात्याने तो शिल्पाकती तयार करू लागला. १९४९साली त्याच्या स्वतःच्याकलाकृतीचे पहिले प्रदर्शन हॅनोव्हर गॅलरी, लंडन येथे भरले. १९५३ मध्ये व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याच्या प्रोजेक्ट फॉर अ मॉन्युमेंट टु द अन्नोज पोलिटिकल प्रिझनर या शिल्पाकृतीस पहिले पारितोषिक मिळाले. १९५४ मध्ये त्याने हॅटफिल्ड ट्रेनिंग कॉलेजसाठी द ऑरकल हे प्रसिध्द शिल्प तयार केले. ह्या शिल्पात त्याने आर्ष व आधुनिक आकृतिबंधाचा−उदा., किटकासारख्या सेंद्रिय आणि विमानासारख्या तांत्रिक प्रतिमानांचा−मेळ घातलेला दिसतो. त्याने लोह, पोलाद, बाँझ, इ. माध्यमांचा वापर करून अनेक शिल्पाकृती तयार केल्या. त्याची सुरूवातीची शिल्पे अमूर्त, रचनावादी आहेत या शिल्पांतील मानवाकृती सडसडीत व रेषात्मक दिसतात, उदा., बॉय अँड गर्ल (१९५०). त्याच्या उत्तरकालीन शिल्पांमध्ये अधिक सघनता व सौष्ठव आढळते, उदा., गर्ल (१९५६-५७) त्याने लिहिलेलेक्रिएटिव्ह डिव्हेलप्मेंट हे पुस्तक १९६२ मध्ये प्रकाशित झाले.
लेखिका: नंदा जगताप
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020