(१९ फेब्रुवारी १९२५). सुप्रसिद्घ भारतीय शिल्पकार. पूर्ण नाव राम वंजी सुतार. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूर या खेडेगावी अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अतिशय खडतर व संघर्षमय परिस्थितीत गेले. बालपणापासूनच सुतारांच्या हाताला प्रतिभेचा स्पर्श होता. त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ते सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे शिक्षणासाठी आले. प्रतिरुपण व शिल्पकलाविषयक पदविका त्यांनी मिळविली (१९५३). आपल्या अत्यंत चमकदार अशा शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी प्रतिरुपणासाठी (मॉडेलिंग) प्रतिष्ठेचे मेयो सुवर्णपदक जिंकले.
ते वेस्टर्न सर्कल येथील पुरातत्त्व विभागात औरंगाबाद येथे १९५४– ५८ दरम्यान नोकरी करीत असताना त्यांनी अजिंठा व वेरुळ येथील अनेक शिल्पांच्या जीर्णोद्घाराचे काम पाहिले. नंतर ते नवी दिल्लीत माहिती व प्रसारण मंत्रालयातील दृक्श्राव्य प्रसिद्घी विभागात तांत्रिक साहाय्यक या पदावर कार्यरत होते (१९५८– ५९). तिथून राजीनामा देऊन त्यांनी पूर्ण वेळ शिल्पकार होण्याचे ठरविले. दगड आणि संगमरवरातील शिल्पकामात जरी त्यांचा हातखंडा असला, तरी त्यांना ब्राँझ धातूत शिल्पकाम करण्याची विशेष आवड आहे. त्यांचे बहुतेक प्रसिद्घ काम ब्राँझ धातूमध्येच आहे. स्मारकशिल्पे बनविण्यात त्यांची मुख्यत्वे ख्याती आहे. स्मारकशिल्पे बनविताना ते प्रमाणबद्घता व सूक्ष्मता यांवर विशेष मेहनत घेतात. त्यांचे गाजलेले पहिले शिल्प म्हणजे
महात्मा गांधी इन मेडिटेशनमहात्मा गांधी इन मेडिटेशनगांधीसागर धरणावरील चंबल हे होय. हे ४५ फुटी (१३·७१६ मी.) शिल्प एकाच साच्यात कोरलेले असून चंबल माता आपल्या दोन मुलांसह यात दाखविलेली आहे. ज्यातून मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यांमधील भ्रातृभाव प्रतीत होतो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना हे काम इतके आवडले, की त्यांनी भाक्रा नानगल धरणावर ५० फुट (१५·२४ मी.) उंचीचे ब्राँझमधील स्मारकशिल्प ट्रायम्फ ऑफ लेबर बनविण्यास त्यांना सांगितले. ज्या कामगारांनी हा प्रकल्प पूर्ण करताना आपले प्राण पणास लावले, त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प उभारण्यात येणार होते. मात्र पुरेशा निधीच्या अभावी ते अपूर्ण राहिले. महात्मा गांधी इन मेडिटेशन हे त्यांचे अत्यंत गाजलेले शिल्प होय. १७ फुट (५·१ मी.) उंचीच्या या शिल्पाच्या प्रतिकृती भारत सरकारने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बेडोस आदी देशांना भेटीदाखल पाठविल्या. हे मूळ शिल्प संसदभवनात विराजमान आहे. १९७२ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव आशियासाठी या शिल्पाकृतीची मोठी आवृत्ती तयार करण्यात आली. नंतर तिची प्रगती मैदान, दिल्ली येथे प्रतिष्ठापना करण्यात आली.
सुतार यांना भारत सरकारने भारतीय नेत्यांची शिल्पे बनविण्यासाठी अधिकृत शिल्पकार म्हणून नेमले होते. त्यांनी बनविलेली भारतीय नेत्यांची ब्राँझमधील शिल्पे संसदभवन आणि तत्सम महत्त्वपूर्ण शासकीय इमारतींत, तसेच विविध शहरांत स्थापित केलेली आहेत. दिल्लीतील रफी मार्गावरील गोविंदवल्लभ पंत यांचे १० फुटी (३·०४ मी.) शिल्प म्हणजे सुतार यांचे अद्वितीय कौशल्य, प्रतिभा आणि अचूकता यांचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांनी बनविलेल्या इतर प्रसिद्घ शिल्पांत महात्मा गांधी विथ हरिजन किड्स १३ फुटी (३·९ मी.), महाराजा रणजितसिंह यांचा अमृतसर येथील २१ फुटी (६·४ मी.) पुतळा, गंगा-यमुना देवींचे लुधियाना येथील शिल्प इ. समाविष्ट आहेत. आपल्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सु. १५० हून अधिक शिल्पे निर्माण केली आहेत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, पं. दिनदयाळ उपाध्याय, रफी अहमद किडवई आदींच्या शिल्पाकृती दिल्ली, नैनिताल, लखनौ, लुधियाना, भरतपूर वगैरे ठिकाणी पाहता येतात.
त्यांच्या कार्याची आणि कौशल्याची दखल घेऊन त्यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. १९९९ मध्ये त्यांना पद्मश्रीने विभूषित करण्यात आले. तसेच त्यांना ‘साहित्य कला परिषद’, नवी दिल्ली; ‘बाँबे आर्ट सोसायटी’ या संस्थांचेही पुरस्कार मिळाले आहेत. ते ‘ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स सोसायटी’, नवी दिल्ली आणि ‘ऑल इंडिया स्कल्प्टर्स फोरम’चे सदस्य आहेत.
सध्या ते दिल्ली येथे वास्तव्यास असून ‘राम सुतार कला संचालनालया’चे संचालक आहेत.
लेखक : नितिन भ.वाघ
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/23/2020