অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नंदलाल बोस

नंदलाल बोस

(३ डिसेंबर १८८३-१६ एप्रिल १९६६). एक श्रेष्ठ भारतीय चित्रकार. बिहारमधील खरगपूर या खेड्यात जन्म. त्यांच्या वडिलांचे नाव पूर्णचंद्र व आईचे नाव क्षेत्रमणी. देवीचे मुखवटे, खेळणी, कंथा हे प्रसिद्ध बंगाली भरतकाम इ. हस्तकलांत त्या कुशल होत्या. आईच्या प्रभावातून दुर्गा, काली वगैरेंच्या मूर्ती नंदलाल तयार करीत. शालेय शिक्षणानंतर त्यांनी १९०५ मध्ये कलकत्त्याच्या सरकारी कला विद्यालयातून चित्रकलेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला व नंतर जोडासाँको येथील अवनींद्रनाथ टागोरांच्या घरी उमेदवारी केली. तेथील सुप्रसिद्ध ‘टागोर संग्रहा’तील वस्तूंची सूची तयार करण्यात त्यांची फार मदत झाली. बऱ्याच रेखाचित्रांच्या त्यांनी प्रतिकृती तयार केल्या आणि टागोर परिवारातील मुलांचे कलाशिक्षक म्हणून ते काम पाहू लागले.

१९०७ मध्ये भारतीय प्राच्यकलासंस्थेने (स्थापना १९०७) आयोजित केलेल प्रदर्शनात नंदलाल बोसांच्या शिवसती या चित्रास पारितोषिक मिळाले. त्यामुळेच ते उत्तर प्रदेश व व दक्षिणेकडील काही प्रमुख स्थळांना भेटी देऊ शकले. १९११ मध्ये काही महिने अजिंठ्याला राहून तेथील चित्रांच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या. सर्वसामान्य माणसाला चित्रांची गोडी लागावी, म्हणून १९१३ साली त्यांनी स्वतः काढलेली अनेक पटचित्रे प्रत्येकी फक्त २५ पैसे या किंमतीस विकली. रवींद्रनाथ टागोरांनी १९१८ साली ‘विश्वभारती’ची स्थापना केली व १९१९ मध्ये तिच्या ‘कला भवन’ शाखेचे प्रमुख म्हणून नंदलाल यांची नेमणूक केली. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी शातिनिकेतनमध्ये अध्यापन केले व अनेक चित्रकार तयार केले. शांतिनिकेतन येथेच ते निधन पावले.

नंदलाल बोस हे अवनींद्रनाथ टागोरांच्या शिष्यपरंपरेतील होत. रवींद्रनाथांचाही त्यांच्यावर प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कलात्मक निर्मितीत स्थूलमानाने तीन प्रवाह दिसून येतात. प्राचीन भारतीय परंपरा, राष्ट्रीय विचारसरणी व आधुनिकांची तांत्रिक प्रयोगशीलता हे ते तीन प्रवाह होत. त्यांच्या मनाला असलेली प्राचीन भारतीय संस्कृतीची व परंपरेची ओढ प्रामुख्याने रामायण, महाभारत यांवर आधारलेली चित्रे-अग्नी, नल-दमयंती, कुरुक्षेत्र, अर्जुन, स्वर्णकुंभ इ. चित्रांतून दिसते. गोकुल ब्रत, कुमारी ब्रत यांसारखी त्यांची चित्रे त्यांच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यपूर्ण शैलीची निदर्शक आहेत. १९३०-४० या दशकातील त्यांच्या चित्रांतून जोषपूर्णता व वैविध्य दिसून येते. ह्याच सुमारास त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली व त्यांच्या प्रभावातून राष्ट्रीयत्वाची एक प्रबळ प्रेरणा त्यांच्या निर्मितीस लाभली. बहुजनसमाजास आकृष्ट करू शकतील, अशी चित्रेही त्यांनी काढली.

‘हरिपूर पोस्टर्स’ या नावाने ओळखली जाणारी सु. ६० चित्रे या प्रकारची आहेत. भारतीय लोकजीवनातील अत्यंत साध्यासुध्या घटकांना त्यांनी चित्ररूप दिले. लोकसंगीतकार, कारागीर, शेतकरी अशी व्यक्तिचित्रे त्यातून आढळतात. नटीर पूजा, शांतिनिकेतनमधील चिनी भवनाच्या भिंतीवरील भित्तिलेपचित्रे ही त्यांच्या शैलीच्या प्रगल्भतेची साक्ष देतात. आपल्या कला-कारकीर्दीत त्यांनी विविध तंत्रविषयक प्रयोग केले. चित्रणसाधनांचा कमीत कमी वापर व भारतीय चित्रकलेच्या परंपरेची निदर्शक अशी शैलीची आलंकारिकता ही त्यांची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होत. पोये दाम्फे, बसंत, दुपूर, संध्या, पार्वती प्रत्याख्यानभम् इ. चित्र तंत्रदृष्ट्या उल्लेखनीय आहेत. त्यांची चित्रे कलकत्ता येथील ‘इंडियन म्यूझियम’, ‘अशुतोष म्यूझियम ऑफ इंडियन आर्ट’, ‘शांतिनिकेतन’, म्हैसूरच्या जगमोहन प्रासादातील चित्रवीथी इ. ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत.

 

 

 

 

 

 

लेखक :विश्वास यंदे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate