অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टागोर अवनींद्रनाथ

टागोर अवनींद्रनाथ

(जन्म ७ ऑगस्ट १८७१– मृत्यू ५ डिसेंबर १९५१). एक श्रेष्ठ आधुनिक भारतीय चित्रकार. कलकत्त्यातील जोडासाँको विभागात जन्म. त्यांचे वडील गुणेंद्रनाथ हे रवींद्रनाथ टागोरांचे चुलतबंधू. घरातील रसिक व संस्कारप्रसन्न वातावरणात लहानपणापासून अवनींद्रनाथांची कलावृत्ती जोपासली गेली. १८८१–९१ या काळात कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. या सुमारास त्यांनी संस्कृतमध्ये काव्ये व मुलांसाठी कथा लिहिल्या, तसेच कथांवर आधारित चित्रेही काढली. या उपक्रमांमध्ये त्यांना रवींद्रनाथ टागोरांचे प्रोत्साहन लाभले. १८९७ मध्ये सिन्योरे जिलार्दी या इटालियन आणि चार्ल्‌स पामर या ब्रिटिश चित्रकारांकडून खाजगी रीत्या त्यांनी माध्यम आणि आविष्कार या दोन्ही दृष्टींनी चित्रकलेतील सुरुवातीचे धडे घेतले. तैकवान या जपानी चित्रकाराकडून जलरंग हाताळण्यासाठी काही वैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली. त्यांच्या कलात्मक जडणघडणीत इ. बी. हॅवेल यांचा फार मोठा वाटा होता. पाश्चात्त्य चित्रणपद्धती स्वतःच्या भावनाविष्कारासाठी वापरण्यात त्यांना असमाधन व अपुरेपणा जाणवू लागला. आपल्या संवेदनांशी एकनिष्ठ राहून शोधक व चिंतनशील वृत्तीने त्यांनी या या संघर्षातून वाट काढली. अवनींद्रनाथांचे कलावंत म्हणून मोठेपणा यातच सामावले आहे.

जलरंगातील वेगळे निर्मितीतंत्र व भारतीय कलापरंपरांच्या गाभ्यातून आविष्कृत झालेली त्यांची कलानिर्मिती हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा होय. रंग-कुंचल्याद्वारा साकारलेली चित्रकाव्ये, असेही त्यांच्या या कलाविष्काराचे वर्णन करता येईल. पोएट्स बाउल डान्स इन फाल्गुनी, द एंड ऑफ द जर्नी, राजा विक्रम, रांची लँडस्केप, क्वीन ऑफ द फॉरेस्ट, बॅनिश्ड यक्ष, द लास्ट व्हॉयेज, द ड्रीम ऑफ शहाजहान इ. चित्रे तसेच कृष्णलीलेवरील चित्रमाला (१९०१–०३) या त्यांच्या उल्लेखनीय कलाकृती होत. १९१४ मधील पॅरिस येथील त्यांच्या चित्रप्रदर्शनामुळे यूरोपमध्ये त्यांना प्रसिद्धी व प्रशंसा लाभली.

शिष्यपरिवाराबरोबर दिवसभर बैठक घालून स्वतः काम करावे, शिष्यांना आपल्याला स्वतंत्र दिशा शोधण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा आश्रमी थाटात त्यांची दिनचर्या चाले. या तालमीत तयार झालेल्या नंदलाल बोससारख्या शिष्यांनी ही परंपरा पुढे रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनमध्ये जोपासली.

कलकत्त्याच्या कलाविद्यालयात उपप्राचार्य, कलकत्ता विद्यापीठामध्ये ‘बागेश्वरी प्रोफेसर ऑफ ओरिएंटल आर्ट’ इ. पदे त्यांनी भूषविली. षडाङ्‌ग ऑर सिक्स लिम्ब्‌स ऑफ इंडियन पेंटिंग  (१९१५) आणि भारत शिल्प ही त्यांची महत्त्वपूर्ण पुस्तके होत. कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. अवनींद्रनाथांनी रवींद्रनाथांच्या नाटकांसाठी नेपथ्यरचनाही केल्या. त्यांची साहित्य निर्मितीही उल्लेखनीय आहे.

अवनींद्रनाथांचा काळ हा स्वदेशी चळवळीचा काळ असल्यामुळे स्वदेशी विचारसरणीचा कलावंत म्हणून सर्वसामान्यांनी त्यांच्याकडे आदराने पाहिले; परंतु भारतीय कलेस लाभलेली एक नवी दिशा या दृष्टीने हॅवेल यांनीच अवनींद्रनाथांच्या निर्मितीचे महत्त्व जाणले आणि गौरविले. कलकत्त्यातील जोडासाँको येथे त्यांचे निधन झाले.

लेखक : १) मृगांक जोशी

मराठी स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate