অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अँटवान प्येव्ह्‌स्‌न्यर

अँटवान प्येव्ह्‌स्‌न्यर

(१८ जानेवारी १८८६—१२ एप्रिल १९६२). आधुनिक रशियन चित्रकार व शिल्पकार. ऑरेल येथे जन्म. त्याचे कलाशिक्षण ‘अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्‌स’, कीव्ह (१९०८—१०) व सेंट पीटर्झबर्ग (१९११) येथे झाले. १९१२ साली पॅरिसमध्ये असताना ब्राक, पिकासो यांच्या घनवादी चित्रांमुळे त्यास प्रेरणा मिळाली. १९१३ मध्ये त्याने चित्रे काढण्यास प्रारंभ केला. १९१७ साली ‘अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्‌स’, मॉस्को येथे त्याची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तेथे मल्येव्ह्यिच व टॅटलीन हे त्याचे सहकारी होते. राजकीय प्रचारासाठी आपली कला राबवणे त्यास अमान्य होते. त्याने त्याचा भाऊ  नायूम गाब याच्या सहकार्याने १९२० साली  रचनावादी (कन्स्ट्रक्टिव्हिझम) चळवळीचा जाहीरनामा तयार केला. कम्युनिस्ट शासनाने जेव्हा सर्व स्वतंत्र कलाविष्कार दडपण्यास सुरुवात केली, तेव्हा प्येव्ह्‌स्‌न्यर आणि गाब यांनी देश सोडला (१९२२). प्येव्हस्‌न्यर बर्लिनला गेला आणि शिल्पकलेकडे वळला. १९२४ मध्ये तो पॅरिसमध्ये स्थायिक झाला व १९३० मध्ये त्याने फ्रेंच नागरिकत्व पतकरले. त्याने प्लॅस्टिक, ब्राँझ, पितळ इ. माध्यमांतून अनेक रचनात्मक शिल्पे तयार केली. त्याच्या शिल्पांमध्ये भौमितिक आकृतिबंधांचा प्रामुख्याने उपयोग केलेला आढळतो. डायनॅमिक प्रोजेक्शन इन द थर्टिएथ डिग्री (१९५०—५१) व डेव्हलपेबल कॉलम ऑफ व्हिक्टरी (फ्लाइट ऑफ द बर्ड, १९५५) ही भव्य शिल्पे त्याने तयार केली. पोर्ट्रेट ऑफ मार्सेल द्यूशाँ हे उत्थित शिल्प (१९२६), कन्स्ट्रक्शन्स फॉर अ‍ॅन एअरपोर्ट (१९३७), प्रोजेक्शन इन्टू स्पेस (१९३८—३९) इ. त्याची प्रसिद्ध शिल्पे होत. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

लेखक : नंदा जगताप

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate