मन वढाळ वढाळ
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरुनं येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्यानं चालल्या
पाण्यावरल्या रे लाटा
मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभाळात
मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, विंचू, साप बरा
त्याला उतारे मंतर !
मन एवढं एवढं
जसा खसखसचा दाना
अन् मन केवढं केवढं ?
त्यात आभाळ मायेना
देवा आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तुला
असं सपनं पडलं !
कवियत्री : बहिणाबाई चौधरी
अंतिम सुधारित : 8/21/2020
ए आई मला पावसात जाउ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चि...
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता च...
एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला, "मला घाल न्हाऊ, घ...
अरे खोप्यामधी खोपा, सुगडिणीचा चांगला, पहा पिल्लासा...