सूर्य या तार्याभोवती फिरणार्या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते. ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास सूर्यग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास सूर्यग्रहण होय. अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खंडग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो.
पृथ्वीवरून दिसणार्या तार्याच्या पुढून चंद्रबिंब जाऊ लागले की, काही काळ तो तारा झाकला जातो. म्हणजे सूर्याखेरीज इतर तार्यांच्या चंद्रामुळे होणार्या ग्रहणाला पिधान म्हणतात.
थेल्य ह्या प्रसिद्ध तत्ववेत्त्या व निसर्ग अभ्यासकाने इ. स. पूर्व ५८५ साली होणार्या ग्रहणाचे भाकीत अचूक वर्तविले होते. चिनी दरबारातील दोन खगोलविदांना इ. स. पूर्व २१३७ मध्ये झालेल्या २२ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाचे भाकीत आधी न वर्तविता आल्याने प्राणास मुकावे लागले अशी नोंद मिळते.
पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात.
अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
सूर्य व पृथ्वी यांच्या, मध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वी पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.
एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून खग्रास सूर्यग्रहण दिसला तर पुन्हा त्याच ठिकाणी सूर्यग्रहण दिसण्यास सुमारे चारशे वर्षाचा काळ जावा लागतो.
उदा. लंडनहून १७१४ साली खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. आता २१५१ साली तेथून परत 'खग्रास सूर्यग्रहण' योग आहे.
खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १ तास ४२ मिनिटांपर्यंत असू शकतो. पृथ्वीची सावली १५ हजार कि. मी. लांबीची असते. चंद्राच पृथ्वीपासून अंतर सर्वात कमी असताना चंद्रग्रहण झाले तर कालावधी प्रदीर्घ असतो, तर चंद्र पृथ्वी अंतर सर्वात जास्त असेल तर हा कालावधी कमी असतो. सर्वसामान्यपणे पृथ्वीच्या छायेचा व्यास चंद्रबिंबापेक्षा २. ६६ पट जास्त असतो. ही छाया पार करण्यास चंद्राला अधिक वेळ लागतो. साहजिकच खग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण यांच्या तुलनेत खग्रास चंद्रग्रहण अधिक वेळ दिसते.
खग्रास सूर्यग्रहण एखाद्या उंच ठिकाणाहून पाहिले तर खग्रास अवस्था सुरू होण्यापूर्वी एक-दोन मिनिटे आधी चंद्रछायेचे प्रचंड धूड ताशी २ ते २. ५ हजार कि. मी. वेगानं सरकत असल्याचे दिसते. चंद्रबिंबाने सूर्यबिंब झाकून टाकण्यापूर्वी अतिशय अरुंद अशा सूर्यकोरीचा भाग दिसतो. त्याचवेळी जमिनीवर पांढरी चादर अंथरून ठेवली, तर त्यावेळी येणारा सूर्यप्रकाश वातावरणाच्या विविध थरांमधून येताना तार्यांच्या लुकलुकण्यासारखा आविष्कार होतो. तोच आपल्याला छायाप्रकाश पट्ट्यांच्या नर्तनातून दिसतो. ह्या आविष्काराची प्रकाशचित्र घेणे हाही एक अनुभवसिद्ध प्रयोगच आहे. हे जमलं नाही तर किमान हे सतेज पांढरे व काळपट पट्टे एकाआड एक येताना पाहता तरी येतील.
एका वर्षात जास्तीत जास्त ७ ग्रहणे होऊ शकतात. यातील ४ ते ५ सूर्यग्रहणे, तर उरलेली चंद्रग्रहणे असतात. एका वर्षात कमीत कमी २ ग्रहणे होतातच. मात्र त्या वेळी ही दोन्ही ग्रहणे सूर्यग्रहण असतात. त्यावर्षी चंद्रग्रहणे होत नाही.
खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त ७ मिनिटे ४० सेकंदापर्यंत दिसणे शक्य असते. पण कंकणाकृती सूर्यग्रहण जास्तीत जास्त १२ मिनिटे ३० सेकंद एवढा वेळ दिसू शकते.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/28/2023