रात्रीच्या आकाशामध्ये एखादा तारा तुटताना आपणास दिसतो तो प्रत्यक्षात तारा नसून ती उल्का असते. लहान-मोठे लघुग्रह तसेच धूमकेतूने त्यांच्या मार्गामध्ये सोडलेला धूळीकणांचा कचरा जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर खेचले जातात, परंतु पृथ्वीवर पडण्यापूर्वीच वातावरणामध्ये घर्षणाने ते जळून जातात. अशा प्रकारे जळून पडताना आपणास त्यांचा प्रकाश दिसतो.
आकाराने मोठ्या असलेल्या उल्का जेव्हा पृथ्वीवर पडताना जळतात तेव्हा त्यांच्या प्रकाशाचा मोठा झोत दिसतो, त्यास 'अग्निगोल' असे म्हणतात. तर त्याही पेक्षा आकाराने मोठ्या उल्का जेव्हा पृथ्वीवर खेचल्या जातात तेव्हा वातावरणामध्ये जळून देखिल त्या पृथ्वीवर आदळतात. आकाराने प्रचंड मोठ्या उल्का पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात संहार करू शकतात.
उल्का पृथ्वीवर पडताना त्यांचा वेग प्रती सेकंद ६०-७० की. मी. एवढा असतो. एका दिवसामध्ये जवळपास ४ अब्ज उल्का पृथ्वीवर पडतात, परंतु आकाराने फारच लहान असल्याने त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही.
वर्षातील काही ठराविक रात्री अनेक उल्का पडताना दिसतात. या उल्का आकाशातील एखाद्या ठराविक दिशेतून पडताना दिसतात, यालाच उल्कावर्षाव असे म्हणतात. उल्कावर्षावाच्या मागचे प्रमुख कारण हे धूमकेतूच्या मार्गामध्ये राहिलेले धुळीचे लहान मोठे दगड असतात. पृथ्वी जेव्हा अशा एखाद्या धूमकेतूच्या मार्गामधून जाते तेव्हा लहान मोठेदगड पृथ्वीवर मोठ्या संख्येने पडताना दिसतात.
उल्कावर्षाव हे प्रामुख्याने ते ज्या तारकासमुहात पडताना दिसतात. त्या तारकासमुहाच्या नावाने ओळखले जातात. जसे सिंह तारकासमुहातून पडताना दिसणारा उल्कावर्षाव हा सिंह तारकासमुहातील उल्कावर्षाव या नावाने ओळखला जातो.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 7/26/2023
उल्का वर्षावाचे निरीक्षण करण्यासंबंधी माहिती