अधिक्रमण म्हणजे सूर्यबिंबावरून एखाद्या ग्रहाचे बिंब पुढे सरकताना पृथ्वीवरून दिसणे. अशा प्रकारचे अधिक्रमण हे अंतरग्रहांच्या बाबतीत घडते. पृथ्वी आणि सूर्याच्या मानाने बुध आणि शुक्र हे अंतरग्रह आहेत.
शुक्राचे अधिक्रमण म्हणजे सूर्याच्या गोलावरून शुक्राचे लहान बिंब पुढे सरकताना दिसते.
सूर्यमालेमध्ये ग्रह आपल्या उपग्रहांसोबत केंद्रस्थानी असलेल्या सूर्याभोवती लंबगोलाकार कक्षेमध्ये भ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाची सूर्य भ्रमणपातळी ( प्रतल ) थोड्याफार प्रमाणात कललेली आहे.
सर्व ग्रहांच्या भ्रमण पातळ्या समांतर नसल्याने दरवेळस ग्रहण शक्य होत नाही. ज्या ठिकाणी दोन ग्रहांचे भ्रमण प्रतल एकमेकांना छेदतात, त्या बिंदूवर जर ग्रह असतील तरच ग्रहण शक्य होते. चंद्रामुळे पूर्ण सूर्यबिंब झाकले गेल्याने ग्रहण दिसते. परंतु अंतरग्रह असलेला असलेल्या बुध आणि शुक्र ग्रहांचा आकार सूर्याच्यामानाने फारच लहान असल्यामुळे ते पूर्ण सूर्यबिंब झाकू शकत नाहीत. म्हणून जेव्हा बुध किंवा शुक्र सूर्यबिंबावरून जातात. तेव्हा एक काळा ठिपका पुढे सरकताना दिसतो, त्यास अधिक्रमण असे म्हणतात.
अधिक्रमण पाहणे म्हणजे थोडक्यात सूर्याकडेच पाहणे. नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे हे कोणत्याही परिस्थितीत धोक्याचेच सूर्याकडे पाहताना नेहमीच चांगले सौर फिल्टर वापरावेत.
प्रकाश क्षमता कमी करणारे निरनिराळे चांगले फिल्टर आपल्याकडे असतील तरी सूर्याकडे पाहण्यासाठी नेहमीच सौर फिल्टर वापरावेत. सूर्याकडून येणार्या प्रकाशातील अतिनील आणि क्ष-किरणे आपल्या डोळ्यांसाठी फार हानिकारक असतात. प्रसंगी अंधत्व देखिल येऊ शकते.
विशिष्ट प्रकारचे सौर फिल्टरचे चश्मे अधिक्रमण पाहण्यासाठी उपयोगी असतात.
सध्याच्या आधुनिक जगामध्ये हौशी खगोलशास्त्रज्ञ शुक्राचे सूर्यबिंबावरून होणारे अधिक्रमण पाहण्यासाठी धडपड करीत आहेत, त्याचवेळेस नासासारखी प्रगत अंतराळ संशोधन करणारी संस्था 'केप्लर मिशन' सारख्या योजनांद्वारे आकाशातील १, ००, ००० तार्यांचा अभ्यास करून त्यांच्या भोवती एखादा पृथ्वीसारखा ग्रह शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. इथे अधिक्रमणाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा एक गोष्ट प्रकर्षाने जाणविते ती या अनंत विश्वाच्या पसार्यात आपल्या आईप्रमाणे असणार्या पृथ्वीची जागातरी किती?
जिथे आपण एकीकडे सूर्यावरून पुढे जाणार्या शुक्राचे बिंब पाहणार आहोत, तेथेच असे समजा की आपण सूर्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या पृथ्वीच्या त्या भागामध्ये आहोत जिथे रात्र आहे आणि अवकाशामध्ये कित्येक प्रकाशवर्षे दूरावरून एखाद्या दृष्टीने ग्रहमाला असलेल्या सूर्य तार्यास शोधले आहे आणि त्याचवेळेस त्यावरून आपली पृथ्वीनामक ग्रह पुढे सरकताना दिसत असेल. कोण जाणे?
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे सोबत नवीन प्रश्नाला जन्म देत असते. अशा या अनादी-अनंत विश्वाची अजून कित्येक रहस्ये आपल्याला उलगडायची आहेत.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 9/8/2023