অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औद्योगिक संयोग

औद्योगिक संयोग : दोन किंवा अधिक उद्योगसंस्थांचा संघ. अशा उद्योगसंस्था एकाच किंवा भिन्न उद्योगांतील असतील व त्यांचे संयोगपूर्व संघटनात्मक स्वरूप वैयक्तित मालकी, भागीदारी किंवा संयुक्त भांडवलाच्या संस्था ह्यांपैकी कोणतेही असू शकेल. संयोग ही सापेक्ष कल्पना असल्यामुळे संयोगामुळे होणाऱ्या एक वटीच्या मर्यादा, स्वरूप व विस्तार ही सर्वच संयोगांबाबत एकच रूप धारण करतील असे नाही. विविध उद्योग संस्थांचे एकीकरण होऊन त्यांची एकच उद्योगसंस्था झालेल्या पूर्ण संयोगापासून, काही विशिष्ट बाबतींत एकसूत्री धोरण अवलंबिण्याचे मोघम करार असणाऱ्या परंतुसंयोगातील प्रत्येक उद्योगसंस्थेचे पृथकत्व शाबीत ठेवणाऱ्या ढिल्यासंयोगापर्यंत संयोगाच्या विविध छटा व रूपे असू शकतात.

उद्योगसंस्थांमध्ये दोन क्षेत्रांत स्पर्धा असू शकते. एक पक्क्या मालाच्या विक्रीत व दुसरी उत्पादनाला लागणाऱ्या कच्च्या व पूरक मालाच्या खरेदीत. साहजिकच आपसांतील अनिष्ट व हानिकारक स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या वरील आपत्तीतून मार्ग काढण्याकरिता व कच्च्या व पूरक वा पक्क्या मालाची किंमत स्पर्धायुक्त बाजारातील प्रवाहाकडून ठरविली जाण्याऐवजी तीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता उत्पादक संयोग स्थापिले जातात. अशा तऱ्हेने खरेदी वा विक्रीतील स्पर्धा कमी करून जास्तीत जास्त नफा मिळविणे, हा संयोग स्थापण्याचा एक प्रधान हेतू आढळतो.

वरील कारणांशिवाय संयोगांमागे इतरही अनेक प्रेरणा असतात. संयोगांच्यायोगे उद्योगसंस्थांचा आकार वाढून बाजार, भांडवल उत्पादन व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांतील बाह्य काटकसरींचा फायदा मिळतो व उत्पादन परिव्यय कमी होऊन नफा वाढतो. त्याशिवाय सामायिक हितसंबंध असलेल्या इतर अनेक प्रश्‍नांसंबंधी परस्परसल्ल्याने व एकोप्याने निर्णय घेणे, विधानसभा व लोकसभा वगैरे प्रातिनिधिक संस्थांमध्येउद्योगांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे, उद्योगातील घटकांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सामुदायिक रीतीने शैक्षणिक कार्यक्रम आखणे, आपसांतील स्पर्धेच्या स्वरूपाबाबत सर्वमान्य आचारसंहिता तयार करणे वगैरे अस्तित्वात येण्याची अनेक कारणे असू शकतात.

उद्योगधंद्यांच्या स्वरूपावरून संयोगांचे चार प्रकार दृष्टीस पडतात

  1. समस्तर संयोग,
  2. ऊर्ध्वाधर संयोग,
  3. पार्श्वीय वा संबद्ध संयोगव
  4. विकर्ण वा सेवा संयोग.

    समस्तर संयोग

    प्रत्येक वस्तूच्या उत्पादनात कच्च्या मालापासून त्याचे उपभोग्य वस्तूत रूपांतर होईपर्यंत अनेक टप्पे असतात. जेव्हा एकाच टप्प्यातील उत्पादकांचा संयोग होतो, तेव्हा त्यास समस्तर संयोग असे म्हणतात. उदा., कापड निर्मितीच्या कार्यात कापसाचे उत्पादन, त्याचे सुतात व नंतर कापडात रूपांतर वगैरे अनेक टप्पे आहेत. ज्यावेळी सुताच्या गिरण्यांचे मालक किंवा कापडगिरण्यांचे मालक संघ निर्माण करतात, तेव्हा समस्तर संयोग अस्तित्वात आला, असे म्हटले जाते. साखर कारखान्यांच्या मालकांचा संयोग हेही समस्तर संयोगाचे उदाहरण आहे. भारतातील ‘असोसिएटेड सिमेंट कंपनी’ हे समस्तर संयोगाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. समस्तर संयोगामुळे एकच प्रकारचा माल निर्माण करणाऱ्याउत्पादकांतील स्पर्धा कमी किंवा नाहीशी होते व त्याचबरोबर त्यांना बाह्य काटकसरींचे फायदे मिळविणे शक्य होते. समस्तर संयोग झाल्यावर लगेच मक्तेदारी प्रस्थापित होते असे नाही, पण असे संयोग मक्तेदारीसाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

    ऊर्ध्वाधर संयोग

    जेव्हा उत्पादनक्रियेतील खालच्या म्हणजे कच्च्या मालाच्या व वरच्या म्हणजे पक्क्या मालाच्या अवस्थेतील उत्पादकांचा संयोग होतो, तेव्हा त्यास ऊर्ध्वाधर संयोग म्हणतात. ह्यासंयोगात उत्पादनक्रियेतील एकामागून एक येणाऱ्या टप्प्यांतील उत्पादकांचा संयोग असतो. साखर कारखाने व ऊसशेती किंवा कापडगिरण्या व कापसाची शेती ह्यांचा संयोग हा ऊर्ध्वाधर संयोग होय. ऊर्ध्वाधर संयोगाचा हेतू बहुधा दलालांना टाळून उत्पादन क्रियेतील वेगवेगळ्या टप्प्यांत लागणारा कच्चा माल दर्जेदार, नियमित व वाजवी किंमतीत उपलब्ध व्हावा व तो मिळविण्याकरिता होणारी बाजारपेठेतील स्पर्धा नष्ट व्हावी, हा असतो. अशा संयोगामुळे अंतर्गत व बाह्य काटकसरींचाही फायदा होतो. ऊर्ध्वाधर संयोग व समस्तर संयोग ह्यांचा एकत्र आढळ होणेही संभवनीय असते.

    पार्श्वीय वा संबद्ध संयोग


एकमेकांशी या ना त्या प्रकारे संबंधित असणाऱ्या परंतु भिन्न पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या औद्योगिक घटकांच्या संयोगास पार्श्वीय वा संबद्ध संयोग म्हणतात.
ह्याचे दोन प्रकार आहेत : (अ) अभिसारी पार्श्वीय वा संबद्ध संयोग व (आ) अपसारी पार्श्वीय वा संबद्ध संयोग. एखाद्या प्रमुख उद्योगाचा त्याच्या उत्पादनास साहाय्यभूत असलेल्या अन्य उद्योगांशी संयोग झाला म्हणजे त्यास अभिसारी संयोग म्हणतात. अशा संयोगातील घटक वेगवेगळा कच्चा माल वापरतात व त्याचा पक्का मालही प्रमुख उद्योगापेक्षा वेगळा असतो. अशा संयोगात इतर उद्योगांचा पक्का माल प्रमुख उद्योगाचा कच्चा माल असतो. मुद्रणालयाच्या उद्योगाचा त्याला लागणाऱ्या कागद, शाई, पुठ्ठा, यंत्रसामग्री, अक्षरांचे ठसे वगैरे उत्पादन करणाऱ्या अन्य उद्योगसंस्थांशी संयोग होतो, तो अभिसारी पार्श्वीय वा संबद्ध संयोग होय. अशा संयोगामुळे उत्पादनाला लागणारी साधनसामग्री व कच्चा माल इतर उद्योगांकडून योग्य दर्जाचा, नियमित व वाजवी किंमतीत मिळतो व अशा उद्योगांचे संयोगीकरण झाल्यामुळे उत्पादनव्ययही कमी होतो.

एकाच प्रकारच्या प्रमुख कच्च्या मालापासून भिन्न तऱ्हेचा पक्का माल उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांचा जेव्हा संयोग होतो, तेव्हा त्यास अपसारी पार्श्वीय वा संबद्ध संयोग म्हणतात. पोलाद कारखान्यांचा यंत्रोत्पादक, जहाज बांधणी, रेल्वेचे कारखाने वगैरे एकच प्रकारचा प्रमुख कच्चा माल वापरणाऱ्या उद्योगसंस्थांशी संयोग, हा अपसारी पार्श्वीय वा संबद्ध संयोग होय. कातड्यापासून बूट, पेट्या, खोगीर, लगाम वगैरे उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा संयोग ह्याच वर्गात मोडतो. अशा संयोगांचा हेतू कच्च्या मालाचे उत्पादन व त्याची मागणी ह्यांत समतोल साधून अत्युत्पादन टाळणे, हा असतो.

विकर्ण वा सेवा संयोग

ज्यावेळी प्रमुख उद्योगसंस्थेचा व त्या संस्थेच्या उत्पादनासाठी आवश्यक सेवा पुरविणाऱ्या इतर घटकांचा संयोग होतो, तेव्हा त्यास विकर्ण वा सेवा संयोग म्हणतात. उदा., बाटाची पादत्राणे उत्पादन करणारी उद्योगसंस्था व त्यांची विक्रीची दुकाने ह्यांचा संयोग हा अशा प्रकारचा संयोग होय.

एकाच नियंत्रणाखालील उद्योगसंस्थांचा संयोग व विविध नियंत्रणाखालील उद्योगांचा संयोग ह्यांचे अनुक्रमे सामान्य संयोग व संमिश्र संयोग असे वर्गीकरण करतात. अनेक भागीदारी उद्योगसंस्था किंवा कंपन्या जर एकाच नियंत्रणाखालील असतील, तर त्यामुळे त्यांच्या परस्परसंबंधांचे स्वरूप संयोगासारखेच होते, कारण त्यांचे हितसंबंध गर्भित रीत्या एकच असल्यामुळे त्यांच्यात अनेक बाबतींत स्वाभाविकच धोरणाची एकवाक्यता दिसून येते. व्यवस्थापन अभिकरण पद्धत अशा संयोगाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. उदा., टाटा उद्योगसमूहाच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक उद्योगसंस्थांचे परस्परसंबंध सामान्य संयोगाचेच होतात. याउलट, वेगवेगळ्या मालकीखाली किंवा नियंत्रणाखाली असलेल्या उद्योगसंस्थांचा ज्या वेळी संयोग होतो, त्यावेळी त्यास संमिश्र संयोग म्हणतात.

संमिश्र संयोगांचे त्यांतील घटकांच्या परस्परसंबंधांच्या स्वरूपावरून अनेक प्रकारांत वर्गीकरण करता येते. त्यांतील प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  1. मंडळे: ह्यांमध्ये व्यापार मंडळ, व्यापार प्रमंडळ, अनौपचारिक करार असणाऱ्या उद्योगसंस्थांचा समुच्चय ह्या तीन प्रकारांचा अंतर्भाव होतो. ही मंडळे समाईक हितसंबंध असलेल्या प्रश्‍नांसंबंधी परस्परसल्ल्याने व संमतीने निर्णय घेण्याचे मान्य करतात. मंडळाची काही बंधने मान्य केल्यानंतर इतर बाबतींत सर्व घटक स्वायत्त असतात. ‘बाँबे मिलओनर्स असोसिएशन’, ‘इंडियन ज्यूट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’, ‘इंडियन इंजिनिअरिंग असोसिएशन’ ही अशा मंडळांची उदाहरणे होत
  2. व्यापार प्रमंडळ: अशा संयोगात व्यापार व उद्योगाशी निगडित असलेल्या प्रश्‍नांविषयी आंतरराष्ट्रीय संस्था, शासन व समाज वगैरेंच्यापुढे आपली बाजू मांडण्याकरिता विविध उद्योगांतील उत्पादक एक प्रातिनिधिक संस्था निर्माण करतात. अशा संघटना उद्योगसंस्थांतील अंतर्गत व्यवहार सोडून समाईक हित असलेल्या इतर प्रश्‍नांविषयी उद्योगसंस्थांचे प्रतिनिधित्व करू शकतात.
  3. अनौपचारिक करार: हा एक अलिखित करार असतो. किंमतीची पातळी कोणती ठेवावी, संयोगातील प्रत्येक घटकाचे उत्पादन परिणाम किती असावे वगैरेंविषयी सर्वमान्य असे निर्णय तोंडी कराराच्या स्वरूपात अशा संयोगात घेतले जातात व संयोगात सहभागी असलेल्या उद्योगसंस्था करारात अंतर्भूत असलेल्या बाबींविषयी एकविचाराने वागण्याचे मान्य करतात. असे करार अधिकृत संघटनेशिवाय उद्योगसंस्थांमध्ये होऊ शकतात.

संयोगांच्या वरील स्वरूपाशिवाय संयुक्त संघ असेही संयोगाचे स्वरूप असू शकते. त्यापैकी उद्योगसंस्थांचे संयुक्त संघ, औपचारिक करार, विक्रयसंघ व उत्पादक संघ हे प्रकार प्रमुख होत:

  1. उद्योगसंस्थांचे संयुक्त संघ: अनेक व्यापार मंडळे व प्रमंडळे अशा संघांचे सभासद असतात. अशा संघांचे हेतू उद्योगातील अंतर्गत व्यवहार सोडून उद्योगाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या इतर विषयांवर चर्चा करणे, त्याविषयी एकमुखी धोरण आखणे व शासन वगैरेंच्यापुढे उद्योगाची बाजू मांडताना प्रतिनिधित्व करणे, हे असतात. ‘एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया’ हे अशा संघाचे उदाहरण म्हणून देता येईल.
  2. औपचारिक करार: असा करार लिखित असतो व तो दोन किंवा अधिक उद्योगसमूहांचा होऊ शकतो. उदा., ‘असोसिएटेड सिमेंट कंपनी’ व ‘डालमिया सिमेंट उद्योगसमूह’ ह्यांचा, किंमत व वेतनाची पातळी काय ठेवावी, जाहिरातीची पद्धत व मालाची बांधणावळ कशी असावी वगैरेंविषयी असलेला करार ह्या वर्गात मोडतो. अशा करारांत सर्वसामान्यपणे प्रत्येक उद्योगसमूह आपापले उत्पादनाचे प्रमाण ठरविण्यास स्वतंत्र असतो.
  3. विक्रय संघ: अशा संघात एकाच प्रकारच्या उद्योगसंस्था सदस्य असतात. अशा संयोगाचा हेतू उत्पादित मालाच्या किंमतीवर नियंत्रण मिळविणे, हा असतो. त्याकरिता सर्वसाधारणपणे संघातील सदस्य सर्वांनुमते प्रत्येकाचे उत्पादन परिणाम नियमित करतात व अशा तऱ्हेने मागणी व पुरवठा ह्यांत समतोल प्रस्थापून अप्रत्यक्षपणे किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्‍न करतात. अर्थात विक्रयसंघाची उत्पादन संघ, बाजार संघ, उत्पन्न वा लाभ संघ अशी अनेक स्वरूपे असू शकतात. उत्पादन संघाचा प्रमुख हेतू संघातील सदस्यांचे प्रत्येकी व पर्यायाने एकूण उत्पादन निश्चित करून आपसांतील अपव्ययात्मक स्पर्धा नाहीशी करणे, हा असतो; तर बाजार संघात उत्पादक आपसांत बाजाराची वाटणी करून घेतात; उत्पन्न व लाभ संघांत ठरलेल्या प्रमाणात उत्पन्न वा लाभ वाटून घेण्याचा करार असतो. ‘इंडियन ज्यूट मिल्स असोसिएशन’ (IJMA) हे उत्पादन संघाचे उदाहरण म्हणून सांगता येईल, तर डालमिया सिमेंट उद्योगसमूह व असोसिएटेड सिमेंट कंपनी ह्यांतील करार, हे बाजार संघाचे उदाहरण होय. (४) उत्पादक संघ: अशा संघात प्रत्येक उद्योगसंस्थेचे स्वतंत्र अस्तित्व कायम असते व संघाचे स्वरूप सामायिक विक्री संघ असे असते, म्हणजेच संयोगातील विविध उद्योगसंस्थांचा माल अशा संघांतर्फे विकला जातो. ‘इंडियन शुगर सिंडिकेट’ हे अशा सघाचे उदाहरण होय. अशा संघाचा हेतू पक्क्या मालाच्या विक्रीचे केंद्रीकरण करून किंमतींवर नियंत्रण ठेवणे, हा असतो.

उद्योगसंस्थांचे वरील चार प्रकार व्यापार संघ या प्रकारात येतात. व्यापार मंडळे वा व्यापार संघ ह्यांचे कार्यक्षेत्र स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय ह्यांपैकी कोणतेही असू शकते.

संयोगांचे अंशतः दृढीकरणात्मक संयोग व संपूर्ण दृढीकरणात्मक संयोग, असे दोन प्रकार आढळतात. अंशतः दृढीकरणात्मक संयोगांचे विश्वस्त निधी किंवा न्यास, सत्ताधारी उद्योगसंस्था व सामायिक हितसंबंधित उद्योगसंस्था, असे प्रमुख प्रकार आहेत. पूर्णतः दृढीकरणाचे विलीनीकरण व एकत्रीकरण, असे प्रकार आढळतात.

  1. विश्वस्त निधी किंवा न्यास : अशी संस्था अनेक उद्योगसंस्थांचे संयोगीकरण होऊन अस्तित्वात येते. संयोगपूर्व स्वतंत्र असलेल्या उद्योगसंस्था करारान्वये आपले बहुसंख्य भाग त्यांनी स्वखुशीने निर्माण केलेल्या विश्वस्त निधीकडे विश्वस्त प्रमाणपत्र घेऊन सुपूर्त करतात. असोसिएटेड सिमेंट कंपनी हे विश्वस्त निधीचे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अशा संयोगाचा हेतू किंमतींवर नियंत्रण ठेवणे व अत्युत्पादन टाळणे, हा असतो.
  2. सत्ताधारी उद्योगसंस्था : एखाद्या उद्योगसंस्थेत मताधिक्य मिळवून देण्याइतके भाग धारण करणाऱ्या दुसऱ्या उद्योगसंस्थेस सत्ताधारी उद्योगसंस्था म्हणतात. ह्यामुळे दुसरी उद्योगसंस्था पहिलीच्या कारभाराचे नियंत्रण करू शकते. अर्थात अशा संयोगात नियंत्रित उद्योगसंस्थांचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहते. भारतीय उद्योगसंस्थांविषयीच्या कायद्यात दुसऱ्याउद्योगसंस्थेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त भागांची मालकी असणाऱ्या उद्योगसंस्थेस सत्ताधारी उद्योगसंस्था म्हटले आहे. अशा सत्ताधारी उद्योगसंस्थांचेही अनेक प्रकार आहेत.
  3. सामायिक हितसंबंधित उद्योगसंस्था : असे संयोग साखळी पद्धतीच्या संचालकत्वामुळे अस्तित्वात येतात. विविध उद्योगसंस्थांत ज्यावेळी त्याच त्या व्यक्ती संचालक असतात त्यावेळी साहजिकच आर्थिक, व्यवस्थापकीय, शासनात्मक वगैरे बाबतींत अशा उद्योगसंस्थांत एकसूत्रता व परस्परसंबंध दिसून येतात. व्यवस्थापकीय अभिकरण पद्धत ही अशा संयोगाचे उदाहरण होय.

पूर्ण दृढीकरणाचे दोन प्रकार दृष्टीस पडतात

  1. एकत्रीकरण
  2. विलीनीकरण.

एकत्रीकरणात दोन किंवा अधिक उद्योगसंस्था एकत्रित येऊन त्या एका नव्या नावाखाली एक उद्योगसंस्था म्हणून अस्तित्वात येतात. याउलट विलीनीकरणात एखादी प्रबळ उद्योगसंस्था तशा तऱ्हेच्या उद्योगसंस्था विकत घेऊन त्या स्वतःमध्ये विलीन करते. ‘ब्रिटिश इंडियन कार्पोरेशन’, ‘मार्टिन बर्न कंपनी’ ही एकत्रीकरणाची उदाहरण म्हणून सांगता येतील. ‘असोसिएटेड इलेक्ट्रिकल कंपनी ऑफ इंडिया’ ही कंपनी ‘जनरल इलेक्ट्रिक कंपनी ऑफ इंडिया’ या कंपनीने स्वतःमध्ये विलीन केली, हे विलीनीकरणाचे उदाहरण होय. एकत्रीकरण व विलीनीकरण यांचे हेतू अर्थातच किंमतींवर नियंत्रण ठेवणे व बाह्य काटकसरींचे फायदे मिळविणे, हेच असतात. विशेषतः जर अनेक कमकुवत उद्योगसंस्थांचे एकत्रीकरण केले, तर त्या उद्योगसंस्था आर्थिक दृष्ट्या तग धरू शकतात.

परकीय उद्योगसंस्थांशी सहकार्याचे वा सहयोगाचे करार हा संयोगाचा एक नवा प्रकार म्हणून सांगता येईल. त्यास ‘संयुक्त व्यवहार’ असे म्हटले जाते. ह्या प्रकारात सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील उद्योगसंस्था परकीय उद्योगसंस्थांशी काही विशिष्ट बाबतींत सहकार्याचा वा सहयोगाचा करार करतात. भारतातील सरकारी व खाजगी क्षेत्रांतील उद्योगसंस्थांचे अशा स्वरूपाचे अनेक करार झालेले आहेत

ज्याप्रमाणे देशांतर्गत संयोग आढळतात, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संयोगही असू शकतात. असे संयोग दोन किंवा अधिक देशांतील मक्तेदारी असलेल्या उद्योगसंस्था इतर देशांतील तशीच मक्तेदारी असलेल्या उद्योगसंस्थांशी करतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात जर्मनीतील व अमेरिकेतील रंगरसायने, रासायनिक खते, काचपट्टिका, पोलादनिर्मितीच्या उद्योगसंस्था ह्यांचे असे संयोग झाले होते. १९१९ एका साली आंतरराष्ट्रीय व्यापार संघही अस्तित्वात होता. भारत व श्रीलंका ह्यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत चहा विकण्याबाबत एक अनौपचारिक करारात्मक संयोग आहे.

संयोग कोठल्यातरी स्वरूपात सर्व देशांत आढळतात. परंतु संयोगांमुळे आर्थिक कल्याण कितपत साधते, ह्यावरच त्यांची इष्टानिष्टता अवलंबून असते. संयोगांमुळे काही फायदे होतात, ह्याविषयी दुमत नाही. त्यांपासून होणाऱ्या बाह्य काटकसरींमुळे औद्योगिक क्षमता वाढण्याची व त्याचबरोबर उत्पादनपरिव्यय कमी होण्याची शक्यता असते. तसेच उद्योगसंस्थांमधील हानिकारक व गळेकापू स्पर्धेला पायबंद बसतो. संयोग समाजहितात भर टाकतीलच असे सांगता येत नाही. त्यांच्यामुळे अकार्यक्षम उद्योगसंस्थांना जीवदान मिळण्याची शक्यता असते, कारण स्पर्धाच नष्ट झाल्यामुळे मूल्याची पातळी स्वेच्छेप्रमाणे नियंत्रित करता येते.

संयोगांमुळे आर्थिक विषमताही वाढण्याची शक्यता असते. कारण त्यांमुळे प्रबळ उद्योगसंस्था निर्माण होतात, पण त्यांना प्रतिरोधक शक्ती म्हणून तितक्याच भव्य व प्रभावी कामगार संघटना प्रत्येक देशात असतीलच, असे सांगता येत नाही. अशा उद्योगसंस्था कामगार वेतनाची पातळी कमीतकमी ठेवून आपल्या नफ्यात जास्तीतजास्त वाढ करण्याचा प्रयत्‍न करतात. संयोगांतील उद्योगसंस्था त्यांच्या अवाढव्य भांडवलामुळे आणि स्पर्धा करण्याच्या शक्तीमुळे नवीन उत्पादकांना उद्योगधंद्यांत शिरकाव करणे कठीण करतात; त्याचबरोबर आपल्या अवाढव्य संपत्तीच्या साहाय्याने विधानसभा, लोकसभा वगैरे ठिकाणी संयोगांना सातत्याने पाठिंबा देणाऱ्या व त्यांच्याकरिता अनेक सवलती मिळविण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या सदस्यांचा गट निर्माण करतात. अवाढव्य संपत्तीच्या साहाय्याने ते संसदीय राजकारणावर व सरकारी धोरणावरही प्रभावी दाब आणू शकतात व अशा तऱ्हेने निर्भेळ लोकशाहीला धोका निर्माण करतात. संयोगांच्या अशा अनिष्ट परिणामांमुळे बहुशः प्रत्येक देशात संयोगविरोधी अधिनियम करण्यात आले आहेत. भारत सरकारने १९६९ च्या ‘मक्तेदारी व निर्बधक व्यापार प्रथा अधिनियमा’न्वये खाजगी क्षेत्रातील संयोगांचे नियमन केले आहे आणि जनहितास बाध आणणाऱ्या मक्तेदारी व निर्बंधक व्यापार प्रथांवर नियंत्रण आणले आहे.

 

संदर्भ : 1. Berge, Wendell, Cartels : Challenge to a Free World, Washington, 1944.

2. Mason, E. S. Economic Concentration and Monopoly Problem, New York, 1964.

3. Mehta, M. M. Structure of Indian Industries, Bombay, 1955.

4. Plummer, Alfred, International Combines in Modern Industry, London, 1951.

लेखक - बा. रं. रायरीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate