मागील लेखात एमपीएससीचे आपण स्पर्धात्मक वेगळेपण काय असते हे समजून घेतले. पण या बरोबरच या परीक्षेविषयी पसरलेल्या आणि पसरवलेल्या गैरसमजाचाही विचार करणे अत्यावश्यक ठरते. याबरोबरच अशा गैरसमजांचाही परामर्श घेऊन त्यांचे निराकारण करणे महत्त्वाचे ठरते. यासंदर्भातील एक गैरसमज म्हणजे यात यश मिळवण्यासाठी असामान्य बुद्धीमत्तेची गरज लागते हा होय. वेगळ्या भाषेत ज्यांनी 10 वी, 12 वी व पदवीशिक्षणात गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे असेच विद्यार्थी यात टिकू शकतात असा एक व्यापक स्तरावर आढळणारा गैरसमज आहे. वस्तुत: या परीक्षेत दरवर्षी यशस्वी होणाऱया विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी तपासल्यास हे लक्षात येते की, त्यातील अत्यल्प विद्यार्थीच गुणवत्ता यादीत आलेले असतात. उर्वरित विद्यार्थी सर्वसाधारण शैक्षणिक पार्श्वभूमी असणारेच दिसतात. तथापि, याचा अर्थ 10, 12 वी आणि पदवीशिक्षण कसेही केले तरी चालेल असे नाही. राज्यसेवा परीक्षेचा स्वतंत्र अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एकाअर्थी गैरलागूच ठरते असे लक्षात येते. म्हणूनच पदवीशिक्षण पूर्ण केलेला प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेचा विचार करू शकतो आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास त्यात यश प्राप्त करू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.
एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी शहरी भागातच शिक्षण झालेले असले पाहिजे, त्यातही प्रतिथयश महाविद्यालयात ते पूर्ण झालेले असावे असे बऱयाच विद्यार्थी-पालकांना वाटत असते. शहरी, निमशहरी भागात अनेक सुविधा उपलब्ध असतात आणि मार्गदर्शन उपलब्ध असते हे जरी मान्य केले तरी ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी यात यश प्राप्त करू शकत नाही असे नाही. खरे पाहता आज एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱया विद्यार्थ्यांत ग्रामीण, निमशहरी पार्श्वभूमी असलेल्या मुलां-मुलींचीच संख्या लक्षणीय असते हे लक्षात येते. चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोणताही विद्यार्थी यात नेत्रदीपक यश मिळवू शकतो, यात शंका नाही.
अस्खलित अर्थात `फाड फाड' इंग्रजी बोलता-लिहिता आल्याशिवाय या परीक्षेत यशस्वी होता येत नाही असाही एक अपसमज आढळतो. राज्यसेवेचे एकंदर स्वरूप पाहता मुख्यपरीक्षेत समाविष्ट असलेल्या अनिवार्य इंग्रजी पेपरखेरीज दुसऱया कोणत्याही पेपरमध्ये इंग्रजी भाषेचा प्रश्न निर्माण होत नाही. थोडक्यात इतर अभ्यासक्रमाच्या संदर्भात आणि त्यावर आधारित प्रश्नपत्रिकांत इंग्रजीचे सर्वसाधारण अथवा विशेषीकृत ज्ञान अत्यावश्यक ठरत नाही. त्यामुळे इंग्रजीविषयीची कित्येक विद्यार्थी-पालकांच्या मनात आढळणारी अनाठायी भीती बाजुला सारणे अगत्याचे ठरते.तथापि आपण एकविसाव्या आणि जागतिकीकरणाच्या युगात रहात असल्यामुळे किमान वाचता-लिहिता येण्यासाठी आवश्यक इंग्रजीचे ज्ञान आपल्याकडे असेल याची प्रत्येकाने खात्री बाळगावी.
त्याचप्रमाणे मुलाखतीत मुलाखत मंडळ काहीही प्रश्न विचारते. जणु ते आपल्याला सापळ्यात पकडायलाच बसलेले असते. त्यातील सदस्य कोणतेही आणि कशाही स्वरूपाचे प्रश्न विचारून विद्यार्थ्याला भंडावून सोडतात इ. मुलाखतीविषयी अशा एक ना अनेक गैरसमजुती आढळतात. वास्तविक पाहता मुलाखत मंडळाला याची जाणिव असते की मुलाखतीस पात्र ठरलेला उमेदवार पूर्व व मुख्य परीक्षेचे दोन महत्त्वाचे अडथळे पार करून आलेला आहे. म्हणजेच त्याने /तिने आपली त्यासंदर्भातील पात्रता सिद्ध केलेली आहे हे लक्षात घेऊनच मुलाखत मंडळ त्या उमेदवाराची मुलाखत घेत असते. उमेदवारावर दडपण येणार नाही अशा पद्धतीनेच उमेदवाराच्या क्षमता व गुणवैशिष्टय़ांची खातरजमा करावी असे निर्देशही मुलाखत-मंडळाला दिलेले असतात. त्यामुळे मुलाखतीविषयक सर्व गैरसमजांना बाजुला सारून उपरोक्त भागात नमूद केलेल्या घटकांची तयारी केल्यास मुलाखतीला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाता येईल आणि त्यात चांगले गुण प्राप्त करता येतील हे लक्षात घ्यावे. शेवटी लाचलुचपत दिल्याशिवाय अधिकाऱयाचे पद मिळत नाही असेही अनेकांना वाटते. एमपीएससीच्या इतिहासात अशी काही प्रकरणे उघडकीस आली आहेत यात शंका नाही. मात्र अलीकडील काळात ही बाब मागे पडली आहे. त्यामुळेच आज अर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेले अनेक विद्यार्थी विविध अधिकारपदावर रूढ होतांना दिसत आहेत.
एकंदर पाहता राज्यसेवा म्हणजे एमपीएससी परीक्षा ही शब्दश: स्पर्धात्मक स्वरूपाची असल्याने ती इतर परीक्षांपेक्षा महत्त्वपूर्ण अर्थाने भिन्न ठरते. या गैरसमजांना वेळीच बाजुला सारून कोणत्याही पूर्वग्रह विरहीत मनाने या परीक्षांचा विचार करावा. या परीक्षेचे वेगळेपण व नेमके स्वरूप लक्षात घेऊन याविषयी निर्णय घ्यावा आणि परीक्षेची तयारी सुरू करावी.
लेखक : तुकाराम जाधव, संचालक, द युनिक ऍकॅडमी, पुणे., ९८५०९६९९४७
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 5/15/2020
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इति...
मित्रहो एमपीएससी परीक्षेचा विचार करतांना प्रारंभी ...
चालू घडामोडीसाठी बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत....
मानव संसाधन आणि विकास या घटकावर पाच प्रकरणे नमूद क...