অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायबर लॅा तज्ञ

सायबर लॅा तज्ञ

अलीकडच्या दशकात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर ते खेडे असा प्रवास पूर्ण झाला असून मोबाईल क्रांतीमुळे इंटरनेट दैनंदिन गरज बनली आहे. संगणक युगात वावरत असताना त्याच्या फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही असतात. माणूस दिवसेंदिवस संगणकावर अवलंबून राहायला लागला असून अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर इंटरनेट ही प्राथमिक गरज बनल्याचे दिसून येते आहे. डिजिटल युगाचा प्रारंभ होत असताना त्याच्या गैरवापराचे अनेक किस्से आपणास पहावयास, वाचावयास मिळतात. कालानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि मोबाईलमध्ये आवश्यक बाबींचा समावेश झाल्याने त्याच्यावरील परावलंबित्व वाढले आहे. सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाला आहे. वेबसाईट हॅक करणे, ऑनलाइन बँकिंग अफरातफर करणे, सायबर बुलिंग सारखे प्रकार वाढत आहेत. अलीकडेच रॅन्स्मवेअर या सायबर विषाणूने जगभरात धुमाकूळ घातल्याचे आपण पाहिलेले आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांना उत्तेजन देत असताना त्यातील फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. अचानक इमेल हॅक होणे, संगणकातील महत्वाची माहिती गायब होणे आणि ती परत मिळविण्यासाठी पैशाची मागणी करणे, ऑनलाइन स्पर्धांमध्ये तुम्ही जिंकला आहात अमुकतमुक रक्कम या खात्यावर पाठवा किंवा तुमच्या एटीएमची मुदत संपली असून त्यावरील क्रमांक, पासवर्ड सांगा, येणारा ओटीपी कोड काय आहे? अशा माध्यमातून आर्थिक फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. इंटरनेटद्वारे क्रेडिट कार्ड चोरी, ब्लॅकमेलिंग, स्टॉकिंग, कॉपीराइट, ट्रेडमार्क फ्रॉड आदी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर लॉ तज्ञांची मागणी आहे कारण आज प्रत्येकास सायबर सुरक्षेची गरज भासतेय. या तज्ञांच्या माध्यमातून उद्योग, संस्था, बँक आदींच्या माहितीच्या सुरक्षीतेतची काळजी घेतली जाते. येणाऱ्या काळात करिअरचा विचार करता या क्षेत्रात अमाप संधी निर्माण होणार असून या विषयातील करिअर करण्यासंबंधी जाणून घेवूया खास करिअरनामा या सदरासाठी

पात्रता

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे. पदवी नंतरही या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. कायदा, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, अकाउंट आदी क्षेत्राशी सबंधितही लोकही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.

आवश्यक गुण

या क्षेत्रात करिअर करणाऱ्यास सतत कालानुरूप अद्ययावत राहावे लागते. नवीन तयार होणारे कायदे, बदलते नवे तंत्रज्ञान याची माहिती त्याला असावी. तसेच सायबर गुन्हेगारांना समजण्याची मानसिकता ठेवून मानसशास्त्राचा मुलभूत अभ्यासही त्याला असावा.

सायबर लॉ कोर्सेस

सायबर लॉ हे व्यापक क्षेत्र असून तंत्रज्ञान आणि कायद्याचा अभ्यास यात महत्वाचा ठरतो. या दोन्ही बाबींचा सखोल अभ्यास केला जातो.

कोर्सची रचना

• राइट ऑफ सिटीजन्स आणि ई-गवर्नंस

• इंन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट

• व्यवस्थापनाशी संबंधीत विषय

• लॉ ऑफ डिजिटल कॉंट्रॅक्ट

• बौद्धिक संपदा अधिकार संबंधी मुद्दे

• सायबर लॉ संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबींचे अध्ययन

या क्षेत्रातील तज्ञ बनण्यासाठी पदव्युत्तर पदविका किवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे ठरते. या विषयातील खास अभ्यासक्रम अत्यल्प संस्थांमध्ये उपलब्ध आहेत मात्र या क्षेत्रातील विषय मात्र अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. यात सायबर सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा, सायबर हल्ल्यांचे प्रकार, पद्धती, आधुनिक सुरक्षा प्रणाली याचा समावेश पाठ्यक्रमात असतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालयाची देखील सोय केलेली असते.

संधी

हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारणारे असल्याने रोजगाराच्या अमाप संधी इथे उपलब्ध असतात. संशोधनासाठी देशातील विद्यापीठे, लॉ फर्म्स, बहुराष्ट्रीय कंपन्या, शासकीय विभाग, कार्पोरेट हौसेज, पोलीस प्रशासन, सैन्यदल, बँकिंग, बीपीओ, आयटी, विविध शिक्षण संस्था अशा अनेक क्षेत्रात संधी मिळू शकते. तसेच फसवणुकीचे अनेक गुन्हे नोंद होतात उदा. बँकिंग, ऑनलाइन खरेदी,विक्री, शेअर ट्रेडिंग, क्रेडीट कार्ड फसवणूक, वेबसाईट फेरफार यासंबधी न्याय मिळवून देण्यासाठी काम करता येते. या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते.

वेतन

वेगाने वाढणाऱ्या या क्षेत्रात पगाराच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. आजकाल पॅकेज पद्धतीनेही वेतन दिले जाते. सुरवातीस २० ते २५ हजारापर्यंत आणि अनुभव वाढल्यानंतर चांगले वेतन मिळते. मुक्तपद्धतीने काम करताना तुमच्या कौशल्यानुसार आणि नावलौकिकानुसार अर्थप्राप्ती होते.

प्रशिक्षण संस्था

• सिम्बॉयोसिस सोसायटी लॉ कॉलेज, पुणे

• शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर

• सेन्ट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ, नागपूर

• एस.एस. मणियार लॉ कॉलेज, जळगाव

• भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ, धुळे

• एन.एस. सोटी लॉ कॉलेज, सांगली

• एन.बी. ठाकूर लॉ कॉलेज, नाशिक

• स्कूलगुरु मुंबई

• शांताराम पोटदुखे कॉलेज ऑफ लॉ, चंद्रपूर

लेखक: सचिन के.पाटील, संपर्क- ९५२७७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate