অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फिटनेस ट्रेनर

फिटनेस ट्रेनर

सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे अवघड जाते त्यामुळे शरीराच्या अनके तक्रारी सुरु होतात. फास्ट फुडच्या जमान्यात अनेकविध आजार वाढू लागले आहेत. अगदी कमी वयात मधुमेह, हृदयरोगाने दगावलेली तरुण मंडळी पाहिली की प्रकृतीस्वास्थ जपणे किती महत्वाचे आहे याची जाणीव प्रकर्षाने होते. सतत बैठे काम केल्याने वाढते वजन आणि पोट यामुळे हैराण असलेले अनेकजण आपण आजूबाजूला पाहतो. सध्या मात्र तरुणाईचा फिटनेसकडे बघण्याचा कल बदलतो आहे. सदृढ शरीर ही संपत्ती असते असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. पूर्वी नित्यनियमाने व्यायाम करण्यासाठी तालीम असायच्यात त्याची जागा आता जिमनी घेतलेली आहे. व्यायामासाठी जिमला जाण्यात सर्वच वयोगटातील लोक आघाडीवर आहेत. अत्याधुनिक साहित्य व्यायामासाठी उपलब्ध होते आहे. व्यायामाचे अनेक नवनवीन प्रकारही आले आहेत. हे करत असताना चांगल्या अनुभवी मार्गदर्शकाची गरज भासते यासाठी फिटनेस ट्रेनरचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले जाते. उत्तम व्यवसाय म्हणून यात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्या अनुषंगाने करिअर म्हणून या क्षेत्रात नेमक्या काय संधी आहेत हे आपण या लेखाच्या माध्यमातून खास करिअरनामा या सदरासाठी पाहणार आहोत.

पाहूयात फिटनेस ट्रेनरचे प्रकार

विशेष ट्रेनर

हा एखाद्या खास विषयातील प्रशिक्षित आणि तज्ञ असतो.

वैयक्तीक ट्रेनर

हा खास व्यक्तिगतरीत्या मार्गदर्शन करतो. एकावेळी एकाच व्यक्तीला प्रशिक्षण देत असतो. त्या व्यक्तीच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन तो करतो. अगदी आहारासंबंधी नियोजनही तो करून देतो. प्रकृती बरोबर ग्राहकाच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडेही लक्ष ठेवले जाते.

जिम ट्रेनर

हा जिममध्ये सामूहिकरीत्या लोकांना मार्गदर्शन करतो. तिथल्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयीची माहिती तो देतो.

पात्रता

फिटनेस ट्रेनर प्रशिक्षणासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.

कामाचे स्वरुप

फिटनेस ट्रेनर हा लोकांना व्यायामाचे बारकावे, पद्धती शिकवतो. वयोमानानुसार व्यायामाच्या पद्धती बदलत असतात. तसेच कोणताही व्यायाम अतिरेकीपणाणे केल्यास त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो म्हणू तो मार्गदर्शक या भूमिकेत असतो. व्यक्तीच्या आहाराचे नियोजन(डायट चार्ट) प्रकृतीनुसार बनवून देतो. एरोबिक्स, किक बॉक्सिंग, योग, आदी. बाबींवर तो सल्ला देतो. वजन निर्धारित करणे, तणाव कमी करण्याचे व्यायाम प्रकार शिकविणे अशी विविधांगी कामे त्याला करावी लागतात. वेटलिफ्टिंग, पुशअप अशा व्यायामावर जोर दिला जातो.

या गुणांची आवश्यकता

फिटनेस ट्रेनर म्हणून काम करताना व्यावसायिकरीत्या प्रशिक्षित असणे गरजेचे असते. एनाटॉमी अँड एक्ससाईझ फीजीओलॉजी, कायनेजिओलॉजी अँड बायोमेकॅनिक्स, स्ट्रेन्थ ट्रेनिंग घेतलेले आणि त्यातील तज्ञ असणे गरजेचे आहे. या क्षेत्रात जनसंपर्क सतत होत असल्याने काही व्यावहारिक गोष्टीही आत्मसात कराव्या लागतात त्याचबरोबर संवाद कौशल्यही अवगत करावे लागते. तसेच दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील सतत बदलत जाणारे ज्ञान आत्मसात करून अद्यवत राहावे लागते. अधिक चिवट, लवचिक व्यायाम प्रकार आत्मसात करण्यासाठी त्याला वेळ देऊन प्रयत्नपूर्वक नवीन प्रशिक्षण घ्यावे लागते. भारतीय संस्कृतीला योग विद्येची मोठी परंपरा असल्याने त्याविषयी ज्ञान असणेही महत्वाचे ठरते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ग्राहकाच्या मागणीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागते त्याचबरोबर संयमाने सातत्य ठेवून काम करत राहावे लागते.

वेतन

करिअरच्या सुरवातीला या क्षेत्रात अल्प वेतनावर काम करावे लागते. एकदा का तुमचे नाव आणि कामाचा दर्जा लोकांना भावला की चांगल्या पद्धतीने कमाई होते. काही प्रसिद्ध ट्रेनर अगदी तासाला दहा हजारसुद्धा कमवतात. स्वत: जिमच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवसाय करता येतो. अर्थात संयमाने काम करत राहिल्यास उत्तम नफा मिळतो.

उपलब्ध कोर्सेस

• एरोबिक्स सर्टिफिकेट कोर्स

• रिबॉक इनस्ट्रक्टर सर्टिफिकेशन प्रोग्राम (कालावधी- ८० तास)

यामध्ये ३० तासांचे लेखी आणि ५० तासांचे प्रात्यक्षिक कार्य असते. अभ्यासक्रमाच्या शेवटी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. ‘अ’ दर्जाची मास्टर ट्रेनर गुणवत्ता प्राप्त केल्यावर आपण मान्यताप्राप्त ट्रेनर होता. तसेच गोल्ड्स जिम विद्यापीठात फिटनेस मॅनेजमेंट, पर्सनल ट्रेनिंग याविषयी चार महिन्यांचे सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत.

प्रशिक्षण संस्था

• गोल्ड्स जिम युनिव्हर्सिटी मुंबई

• अष्टांग योग रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई

संकेतस्थळ- www.ashtanga.com

• तालवॉकर्स अॅकॅडमी मुंबई

संकेतस्थळ- www.talwalkars.net

• के.११फिटनेस अॅकॅडमी मुंबई

संकेतस्थळ- www.keleven.com

• रिबॉक इंडिया

संकेतस्थळ- www.reebok.com

• इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्यु. अँड स्पोर्टस सायन्स दिल्ली.

संकेतस्थळ- www.igipess.du.ac.in

• साई एनएस साउथ सेंटर युनिव्हर्सिटी बेंगलोर

संकेतस्थळ- http://www.saisouth-bangalore.com

मित्रहो चित्रपटसृष्टी, उद्योग व्यवसायातील अनेक नामांकित व्यक्तीसाठी व्यक्तिगत व्यावसायिक प्रशिक्षकाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शारीरिक तंदुरुस्ती विषयी जागरूकता होत असल्याने करिअरच्या दृष्टीने या क्षेत्राकडे पाहण्यास काहीच हरकत नाही. देशात अत्यल्प प्रमाणात लोक व्यायाम करत असल्याचे अलीकडे पाहणीत सिद्ध झाले आहे. निरोगी आयुष्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे आरोग्यविषयक तज्ञांचे मत आहे. कालानुरूप जाणीवजागृती होत असल्याने लोक योगासारख्या गोष्टींकडे हल्ली वळत आहेत. देशात फिटनेस आणि योगा क्षेत्रात करोडो रुपयाची उलाढाल वर्षभरात होत असते. या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. चला तर मग तयार व्हा फिटनेस ट्रेनर होण्यासाठी आणि स्वतः बरोबर इतरांनाही निरोगी बनविण्यासाठी..

सचिन पाटील, संपर्क – ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate