অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नर्सिंग : सेवा आणि समाधान

प्रस्तावना

नर्सिंग ही एका व्यावसायिक अभ्यासक्रमाची दिशा आहे. हा एक सेवाभावी व्यवसाय आहे. आपण करत असलेल्या कामाचे समाधान या क्षेत्रात समोरच्या व्यक्तीच्या (रुग्णाच्या) चेहऱ्यावर लगेच प्रकट होत असते. विद्यार्थी 10 वी किंवा 12 वीला असतानाच पुढील आयुष्याची गणिते सुरू होतात. मग कोणता अभ्यासक्रम निवडायचा हे ठरवावे लागते. अभ्यासक्रम निवडल्यानंतर फक्त तो पूर्ण करणे किंवा पदवी/पदविका घेणे एवढेच अपेक्षित नसते तर आयुष्यामधील व्यवसायाची कारकिर्द त्या कामात घालवायची असते. हा सर्व विचार करूनच नर्सिंग अभ्यासक्रम निवडणे ही बाब महत्त्वाची ठरते.

नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी एएनएम (एएनएम- ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफरी) आणि जीएनएम (जीएनएम- जनरल नर्सिंग ॲण्ड मिडवाईफरी) असा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

एएनएम

हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून या परीक्षा घेतली जाते.

वयोमर्यादा

प्रवेश घेण्याच्या वर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी किमान वय वर्षे 17 पूर्ण आणि कमाल वय वर्षे 35 पेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक अर्हता

कोणत्याही शाखेतील किमान बारावी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12 वी (10+2) अथवा समतूल्य परीक्षा मंडळाची शासनमान्य संस्थेमधून कमीत कमी 40 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटातील उमेदवारांच्या बाबतीत किमान 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे अर्हता परीक्षा जास्तीत जास्त तीन प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल परंतु अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांचे 5 गुण 12 वी (10+2) अथवा समतूल्य परीक्षेच्या एकूण गुणातून कमी करण्यात येतील जे उमेदवार शासनमान्य विद्यापीठातून बीएस्सी पदवी किंवा एमएस्सी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असतील त्यांच्या बाबतीत 12 वी अथवा समतूल्य परीक्षेच्या एकूण गुणात 5 गुण वाढविण्यात येतील.

शासनाच्या प्रचलित नियमांनुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील. हा अभ्यासक्रम शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील 15 जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालयामध्ये चालविला जातो. पंधरा जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयातील नर्सिंग अभ्यासक्रमासाठी 20 उमेदवारांना प्रवेश मिळू शकतो. शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर (शासनास गरज भासेल तेव्हा) दोन वर्षे बंधपत्रित कालावधीसाठी शासन सेवा करण्याची संधी प्राप्त होते. शासकीय नियमानुसार आणि निधी उपलब्ध असल्यास प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनही दिले जाते.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात आल्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज भरावेत. अर्ज भरताना उमेदवारांनी 12 वीचे गुणपत्रक, शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले) ही प्रमाणपत्रे सोबत जोडावीत. गुणवत्तेनुसार 20 स्त्री उमेदवारांची निवड करण्यात येते. 20 पैकी 2 जागा या आशा स्वयंसेविकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. मात्र अंगणवाडी कार्यकर्तीस प्राधान्य दिले जाते. आशा स्वयंसेविका उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यारिक्त जागी खुल्या प्रर्वगातून गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. उमेदवारांनी जिल्हानिहाय नेमून दिलेल्या कोट्याचा फायदा घेण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातूनच प्रवेशासाठी अर्ज करावा.

जीएनएम

हा अभ्यासक्रम एकूण तीन वर्षाचा असून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडून परीक्षा घेतली जाते.

वयोमर्यादा

किमान वय वर्षे 17 पूर्ण व कमाल वय वर्षे 35 पेक्षा जास्त नसावे एएनएम आणि एलएचव्ही उमेदवारांकरिता उच्च वयोमर्यादा लागू नाही.

शैक्षणिक अर्हता

किमान बारावी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) उमेदवारांना प्राधान्य राहील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12 वी (10+2) अथवा समतूल्य परीक्षा मंडळाची शासनमान्य संस्थेमधून कमीत कमी 40 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटातील उमेदवारांच्या बाबतीत किमान 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शासनाच्या प्रचलित नियमांनुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील . हा अभ्यासक्रम शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यातील 29 जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालयामध्ये चालविला जातो. प्रत्येकी 5 उमेदवारांना प्रवेश मिळू शकतो. शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर (शासनास गरज भासेल तेव्हा) दोन वर्षे बंधपत्रित कालावधीसाठी शासन सेवा करण्याची संधी प्राप्त होते शासकीय नियमानुसार आणि निधी उपलब्ध असल्यास प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरात आल्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज भरावेत. अर्ज करताना उमेदवारांनी 12 वीची गुणपत्रक, शाळा/ कॉलेज सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकार्यांकडून प्राप्त झालेले) ही प्रमाणपत्रे सोबत जोडावी. गुणवत्तेनुसार 5 स्त्री उमेदवारांची निवड करण्यात येते. यापैकी 1 जागा आशा स्वयंसेविका व 1 जागा एएनएम उत्तीर्ण उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येतात.

आशा स्वयंसेविका उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या रिक्त जागी इमाव प्रर्वगातून व एएनएम उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनुसूचित जमाती प्रवर्गातून शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.

बीएसस्सी (नर्सिंग)

हा अभ्यासक्रम एकूण 4 वर्षाचा असून तो विद्यापीठांमार्फत चालवला जातो.

वयोमर्यादा

किमान वय वर्षे 17 पूर्ण

शैक्षणिक अर्हता

विज्ञान शाखेतील (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) मध्ये किमान बारावी 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य राहील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12 वी (10+2) अथवा समतूल्य परीक्षा मंडळाची शासनमान्य संस्थेमधून कमीत कमी 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयामध्ये साहाय्यक परिचारिका, परिचारिका, परिचारिका प्रशिक्षक अशा विविध पदांवर नोकरीची संधी हमखास उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी http://www.maharashtranursingcouncil.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

लेखक: भावना चौधरी

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 2/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate