অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेनेटिक इंजिनिअरिंग मधील करिअर

प्रस्तावना

जेनेटिक इंजिनिअरिंग ही विज्ञान विषयातील अत्यंत महत्वाची शाखा मानली जाते. ही शाखा नव्याने विस्तारत असून यामध्ये सजीव प्राण्यांच्या डीएनए कोडमध्ये जेनेटिक परिवर्तनाची क्रिया अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने पार पाडली जाते. या तंत्रामुळे रोग प्रतिरोधक शक्ती वाढून मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन घेतल्याचे आपण पाहिले असेल. वनस्पतीमध्ये प्रतिरोध क्षमता विकसित करून रोगराईशी लढण्याचे सामर्थ्य या तंत्रामुळे शक्य झाले आहे. अशा वनस्पती, वृक्ष, पिके यांना जेनेटिकली मॉडीफाईड असेही म्हटले जाते. ज्या शास्त्रामध्ये गुणसूत्रांच्या आकारांचे संशोधन करून त्यांच्या आकारात, आकृतीत परिवर्तन करून त्यांच्या मुलभूत गुणांना बदलले जाऊ शकते त्यास जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटले जाते. संकरीत पीक, लसी, क्‍लोनिंग, टिश्‍यू कल्चर आदी गोष्टींचा अंतर्भाव या शाखेत होतो. बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात जेनेटिक इंजिनिअरिंगचा विशेष फायदा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. हरित क्रांतीनंतर या संकल्पनेने वेग घेतल्याने या क्षेत्राला विशेष महत्व प्राप्त झाले असून रोजगाराच्या अमाप संधी आता उपलब्ध होत आहेत. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील करिअरच्यादृष्टीने असलेल्या संधींचा घेतलेला आढावा खास करिअरनामासाठी..

पात्रता व कोर्सेस

या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. पदवी स्तरावर बी.ई. तसेच बीटेकचे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. पदवीसाठी प्रवेश परीक्षा पार करावी लागते. एमएससी इन जेनेटिक इंजिनिअरिंग देखील करता येते. बायोटेक्‍नॉलॉजी शाखेत जेनिटिक इंजिनिअरिंगचे स्पेशलाईजेशनही उपलब्ध आहे. आयआयटीमधील जेनिटिक इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी जेईई ही परीक्षा पास होणे आवश्‍यक ठरते. तसेच नेहरू विश्विद्यालयाकडून प्रवेश परीक्षेचे आयोजनही करण्यात येते.

आवश्यक गुण

सर्वात महत्वाचे म्हणजे विज्ञान विषयाची आवड हवी आणि संशोधकवृत्ती असल्यास त्याचा फायदा ठरतो. उत्तम कल्पनाशक्ती, समुहात सहकार्य भावनेने काम करण्याची तयारी असल्यास सुनियोजित पद्धतीने उद्दिष्ट पार करता येते.

कामाच्या संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जेनिटिक इंजिनिअरना देशात तसेच परदेशातही संधी उपलब्ध होतात. मेडिकल आणि फार्मास्युटीकल कंपन्या, अॅग्रीकल्चर सेक्टर, खाजगी आणि सरकारी संशोधन संस्था तसेच अध्यापक म्हणून अध्यापनाचे काम देखील करता येते. बायोटेक लॅबोरेटरीत संशोधक म्हणूनही संधी आहेत. तसेच उर्जा आणि पर्यावरण संबंधीत क्षेत्र, अॅनिमल हस्बन्ड्री, डेअरी फार्मिंग, मेडिसिन या क्षेत्रात जावू शकता. सर्वात जास्त मागणी औषध उद्योगात आहे. अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगातही नोकरी मिळू शकते. आजकाल नवनवीन आजारांवर संशोधन करून लसी शोधण्यावर मोठ्या प्रमाणात काम चालते यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासत असते अर्थात नोकरीच्या संधी आहेतच.

वेतन

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १५ ते २५ हजारापर्यंत सुरुवातीस वेतन मिळू शकते. अनुभवानंतर उत्तम मानधन मिळते. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या रक्कमेचे पॅकेज मिळते

प्रशिक्षण संस्था

• डी. वाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई

• जीएसएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे

• गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे

• एमईटी इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक

• एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे

• सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे

• औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, औरंगाबाद

• अभा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर

• आयआयटी खडकपूर, नवी दिल्ली, मद्रास, गुवाहाटी

• दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली

• एमएस विद्यापीठ, बडोदा

• बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

• उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद,

• बिरला इंस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी पिलानी.

सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate