मानवाचा आर्थिक विकास झाला आणि त्याच्या दैनंदिन आयुष्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढला. भौतिक विकासाची साधने वाढली तशीच त्याच्या गरजाही वाढल्या. नव्या आकांक्षा, नवे आयाम आणि त्या जोडीला समाधानाची हावही वाढत गेली. आज विज्ञानाच्या विकासाबरोबर सर्वच क्षेत्रात बदल झाल्याचे दिसून येते पण वर्चस्वाची लढाई, पराकोटीचे द्वेष यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हिंसाचारातून मिळणारा आसुरी आनंद यामुळे गुन्हा करून पाहण्याचे धाडस वाढले आहे. सकाळी वर्तमानपत्र उघडले तरी गुन्ह्यांच्या अनेक बातम्या नजरेस पडतात. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, त्याला पायबंद करण्यासाठी मग वेगवेगळ्या पातळींवर अभ्यासशाखाही सुरु झाल्या. गुन्हेगारांचेही मानसशास्त्र असते या नियमानुसार त्या त्या पातळीवर मानसशास्त्रीय चिकित्सा होऊ लागली. गुन्हेगारी वाढली तरी त्याचा शोध लावणे, तपास करणे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा देणे गरजेचे असते आणि या कामात महत्वाची भुमिका क्रिमिनॉलॉजीस्ट बजावत असतात. घटनास्थळी जाऊन त्या गुन्ह्याचा अभ्यास करून पुरावे संकलित करण्याचे काम तो करत असतो. अनेक लोकप्रिय टी.व्ही मालिकांमध्येसुद्धा अशी पात्रे तुम्ही पाहिली असतील. तसे पहिले तर हे क्षेत्र आव्हानात्मक आहे पण तितकेच ते आनंद देणारे आहे. चला तर मग या क्षेत्रात करिअर करण्यासंबंधी अधिक जाणून घेऊया खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी.
क्रिमिनॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. या विषयात पदवीही घेता येते त्याचा कालावधी तीन वर्षाचा असतो. तसेच पदव्युत्तर पदवीही घेता येते. बीए/ बीएससी इन क्रिमिनॉलॉजी तसेच एमए/एमएससी इन क्रिमिनॉलॉजी हे अभ्यासक्रम प्रचलित आहेत. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्रिमिनॉलॉजी हा एक वर्षाचा करता येतो
या क्षेत्रात अत्यंत गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय बाबींचा उलगडा करावा लागतो. काम करत असताना आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याचबरोबर यशस्वी होण्यासाठी मानसिकरित्या खंबीर असायला हवे. बऱ्याचदा गंभीर गुन्ह्यातील प्रकरणांना सामोरे जावे लागते आणि ते भयावह असण्याची शक्यता असते. काही घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असतात अशावेळी मानसिक संतुलन नीट ठेवून काम करावे लागते. तसेच सामुहिकरित्या काम करावे लागत असल्याने इथे चुकांना फार वाव नसतो. या क्षेत्रात काही अनुमान बांधावे लागतात त्यामुळे तर्कसुसंगत विचार करावा लागतो.
गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर क्राईम इंटेलीजन्स अॅनालीस्ट, लॉ रीफार्म रिसर्चर, कम्युनिटी करेक्शन कोऑर्डीनेटर, ड्रग्स पॉलीसी अॅडव्हायजर, कन्जुमर अॅडवोकेट एनवायरमेंट प्रोटेक्शन अॅनालीस्ट या पदावर काम करता येते. खाजगी कंपनी, सोशल वेलफेअर डीपार्टमेंट, एनजीओ, रिसर्च ऑर्गनायझेशन, खाजगी सुरक्षा कंपनी, डीटेक्टीव एजन्सी आदी ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो.
देशात क्रिमिनॉलॉजीस्ट म्हणून सुरुवात करताना दरमहा २० ते २५ हजार वेतन मिळू शकते तसेच अनुभवानंतर चांगले वेतन मिळू शकते. मुक्त पद्धतीने काम करताना अधिक कमाई होऊ शकते. परदेशात क्रिमिनॉलॉजीस्टना जास्त मागणी आहे आणि चांगल्या प्रकारे वेतनही मिळते.
लेखक: सचिन के.पाटील, संपर्क: ९५२७७७७७३२
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 5/24/2020
या विभागात व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी कोणते मह...
करिअर कसे निवडावे? या बद्दल माहिती.