অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इवेंट मॅनेजर

इवेंट मॅनेजर

मानवाच्या आयुष्यात कार्यक्रमांना फार महत्व आहे. एकत्र येवून अनेक सण, समारंभ, लग्न, वाढदिवस आपण करत असतो. मोठमोठ्या सत्काराच्या कार्यक्रमापासून ते ऑफिसचे छोटेमोठे कार्यक्रम, परिषदा, एखाद्या नवीन वस्तूचे अनावरण अशा अनेक बाबीत आपला सहभाग असतो. कार्यक्रम संपला की हमखास त्या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया दिली जाते. कार्यक्रमात सर्व गोष्टी नीट पार पडल्या की तो कार्यक्रम यशस्वी झाला असे एका अर्थाने म्हटले जाते. संपूर्ण कार्यक्रमाची रचना, मांडणी त्याचबरोबर उपलब्ध सुविधा आदीबाबत आपण मूल्यमापन करत असतो. अर्थात चांगला कार्यक्रम पार पडला की मॅनेजमेंट छान होतं असे आपण आवर्जुन नोंदवितो. आजकाल धावपळीच्या काळात सर्व गोष्टी एकाच छताखाली हव्या असतात आणि त्या उपलब्ध करून देणाऱ्यास इवेंट मॅनेजमेंट असे म्हटले जाते. या क्षेत्रात विविध कंपन्याही कार्यरत आहेत. एकदा का रक्कम दिली की ते सर्व नियोजन करून कार्यक्रम पार पाडतात. यात कार्यक्रमाच्या जाहिरातीपासून व्यवस्थापनापर्यंत सर्वच बाबी ते हाताळतात. या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा हा घेतलेला आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

कामाचे स्वरूप

या क्षेत्रातील लोक विविध कार्यक्रमाचे नियोजन करत असतात. ठराविक वर्गासाठी काही कार्यक्रमही ते आयोजित करतात. उदा. संगीत समारंभ, लग्न सोहळे, थीम पार्टी, व्यावसायिक सेमिनार, प्रदर्शने, विविध प्रिमीयर आदीचा त्यात समावेश होतो. आजकाल इवेंट कंपन्या बजेटही ठरवून देत असतात त्यामुळे ग्राहकाला आपल्या कुवतीनुसार त्यातील निवड करता येते. एकदा करार झाल्यानंतर इवेंट मॅनेजर संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. त्यात अगदी हॉल बुक करण्यापासून ते जेवणाचे मेन्यू ठरविण्यापर्यंत तसेच स्वागत सत्कार आदीपर्यंत नियोजन ते केले जाते.

पात्रता

इवेंट मॅनेजमेंट देणारे अनेक अभ्यासक्रम सध्या उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. सध्या काही संस्था प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करून देतात. त्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. तसेच डिप्लोमा इन इवेंट मॅनेजमेंट(पदव्युत्तर पदवी) ही उपलब्ध आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पार्ट टाइम पद्धतीनेही करता येतो. त्याचबरोबर आता या विषयात एमबीए देखील करता येते.

आवश्यक गुण

इवेंट मॅनेजर होताना तुमच्याकडे संघटन, उत्तम संवाद, प्रभावी जनसंपर्क, निर्मिती क्षमता आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य हवे. दोनपेक्षा अधिक भाषा अवगत असल्यास ते फायद्याचे ठरते. काम करवून घेण्याची कला, चांगले नेतृत्व असल्यास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात.

संधी

देशात परदेशी कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत असल्याने कामाच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राचा विकासदरही वाढतो आहे. नवनवीन पद्धती येत असल्याने त्यानुसार नियोजन करणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज भासते आहे.

वेतन

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरवातीस पंधरा हजार रुपयांपासून वेतनास सुरुवात होते. अनुभवानंतर नामांकित कंपनीत चांगले वेतन मिळू शकते. स्वत:ची कंपनीही आपण सुरु करू शकता. अनेक इवेंट मॅनेजरना अगदी लाखापर्यंत पगार आहे. व्यवसायरुपात कामास प्रारंभ केल्यास आपण इतरांनाही रोजगार देऊ शकता. या क्षेत्रात नाव कमावल्यास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

प्रशिक्षण संस्था

• एमिटी इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट नवी दिल्ली

• इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (इएमडीआय) वांद्रे, मुंबई

• नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट(एनआयइएम) विलेपार्ले, मुंबई

• कॉलेज ऑफ इव्हेंट आणि मॅनेजमेंट (सीओइएम) पुणे

• स्कायलाइन बिझनेस स्कूल, नवी दिल्ली

• इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट(इएमडीआय) पुणे

• नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट पुणे

• प्रौढ निरंतर शिक्षण विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

मित्रहो हे विस्तारत जाणारे क्षेत्र असून नव्या आव्हानांना तोंड देण्याची आणि काळाबरोबर अद्ययावत राहण्याची तयारी असेल तर हे क्षेत्र आपल्यासाठी खुले आहे. इथे एकाचवेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागतात. विविध कौशल्य आत्मसात करावी लागतात, प्रसंगी अनाहूत अडचणींना तोंड द्यावे लागते पण अखंड मेहनतीची तयारी असेल तर आपण उत्तम इवेंट मॅनेजर बनू शकता. इथे कष्टाला पर्याय नसतो. कामाच्या वेळाही ठरलेल्या नसतात पण कामाचा आनंद मात्र मिळतो आणि जनसंपर्कही वाढतो. अर्थात आपल्यातील कलागुणांना वाव देणारे हे क्षेत्र आहे. चला तर मग एक पाऊल पुढे टाका आणि बना..! इवेंट मॅनेजर..

सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate