विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. बी.ए.बी.कॉम, बी.एस्सी. यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास 50 टक्के स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला असेल व असे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील ते सहजपणे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात.
अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की, आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि त्यात जर अपयश आले तर आपल्या भविष्याचे काय? आपणास पुढे नोकरी मिळेल का? आपण पदवी अभ्यासक्रमापासून बरेच दिवस दूर असल्याने आपल्या शिक्षणाचा नोकरीमध्ये कितपत फायदा होऊ शकेल. असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात. पण जो विद्यार्थी सातत्याने कष्ट घेतो तो निश्चित कोणत्या तरी परीक्षेत यश मिळवतो. अनेक जण पदवी शिक्षणानंतर खासगी नोकरी पत्करतात. त्यानंतर दोन-तीन वर्षांनंतर स्पर्धा परीक्षेकडे वळतात. त्यामुळे त्यांची द्विधा मन:स्थिती होते परिणामी त्यांना मनाजोगते यश मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना खासगी नोकरी केल्यानंतर आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वात बदल होतो असे वाटते. ते अगदी खरे आहे. नोकरीच्या अनुभवातून आपले आचारविचार समृद्ध होतात. वाचन, लेखन, बैठका, नियोजन यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. याचा मुलाखतीसाठी उपयोग होऊ शकतो. परंतु नोकरीमध्ये गेलेला वेळ भरून निघत नाही. परिणामी आपली उशिराने निवड होऊ शकते.
बऱ्याचदा आपल्या पाल्यांना पुढे स्पर्धा परीक्षेसाठी पाठवायचे असल्याने दहावीनंतर कलाशाखा की विज्ञान शाखा निवडावे असा प्रश्न पडतो. खरे तर विद्यार्थ्यांनी दहावीनंतर विज्ञान शाखेकडे वळावे. यामुळे इंग्रजी सुधारते, त्याचप्रमाणे अधिक अभ्यास करण्याची सवय लागते. बारावीनंतर मात्र ज्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊनच करिअर करायचे आहे त्यांनी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत शक्यतो वेळ खर्ची घालवू नये. त्यांनी बी.ए., बी.कॉम किंवा बी.एस्सीला प्रवेश घ्यावा. जर आपण दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली तर निश्चितपणे कोणती ना कोणती वर्ग-1 अथवा वर्ग-2 पदाची नोकरी हमखास मिळू शकते.
दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत जर एम.पी.एस.सी. किंवा यु.पी.एस.सी.साठी घेण्यात येणाऱ्या फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतला तर त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. यानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात. यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी ही परीक्षा नेमकी काय असते, यावर ‘आयएएस प्लॅनर’ व एमपीएससीसाठी ‘एमपीएससी प्लॅनर’ ही दोन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती वाचून काढावी. यामुळे या परीक्षासंदर्भातील आपल्या सर्व शंका दूर होतील.
स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन (जनरल नॉलेज) या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत विचारले जातात. त्यामुळे सामान्य अध्ययन या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान वाचून त्याच्या नोंदी कराव्यात. लोकराज्य, योजना, यशदा-यशमंथन, कुरुक्षेत्र ही मासिके नित्यनियमाने वाचायला हवीत. वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणत: वर्तमानपत्राचा या परीक्षांसाठी 20 ते 25 टक्के वाटा आहे म्हणून लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे. दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणीवरील मराठी व इंग्रजी बातम्याही दररोज ऐकायला हव्यात.
इंटरनेटच्या माध्यमातून आपणास हवी ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते. स्पर्धा परिक्षेच्या संदर्भात अनेक संकेतस्थळे व यू ट्यूबद्वारे खूप माहिती उपलब्ध आहे. वक्तृत्व व लेखन शैली सुधारावी. कुठल्याही परीक्षेसाठी लेखनशैली उत्तम असायला हवी. स्पर्धा परीक्षेसाठी काही पेपर्स हे वर्णनात्मक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सूंदर असायला हवे. ते विकसित करता येऊ शकते. लेखन, मनन, वाचन, चिंतन आणि मेहनत या पंचसूत्रीतून प्रभावी लेखन कौशल्य सुधारता येते. विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीपासून मुलाखतीच्या अनुषंगाने तयारी करायला हवी. त्यासाठी त्यांनी आपले संवाद कौशल्य सुधारले पाहिजे.लिखाणाची चांगली शैली विकसित करायला हवी. लेखनाचा उपयोग निबंध या विषयाच्या पेपरसाठी प्रामुख्याने होतो. कारण निबंध लेखन हे आपल्याला अधिक गुण मिळवून देण्यास मदत करते. लेखनाची तयारी करताना अनेक पुस्तकांचे, साहित्यांचे वाचन आवश्यक आहे. सरावाने आपले लेखन कौशल्य बालपणापासून विकसित करता येऊ शकते.
लेखक: डॉ. बबन जोगदंड
संशोधन अधिकारी (प्रकाशन), ‘यशदा’ संस्था
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 8/8/2020
स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच...
द बिग इयर - स्पर्धा पक्षिनिरीक्षणाची- चित्रपट-परिच...
जिल्हयातील कृषि उत्पादन व उत्पादनामध्ये वाढ करताना...
शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आ...