नाशिकची उत्सव संस्कृती हा विषय महत्वाचा आहे. नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती आहे. पण नाशिक म्हणजे केवळ नाशिक शहर नव्हे तर नाशिक व परिसर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील उत्सव संस्कृती हे स्पष्ट केल्याने विषयाची व्याप्ती वाढते. अजूनही प्रकाशात न आल्याने अशा काही लोकोत्सवांवर उजेड टाकता येईल.
व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पद्धत, पाऊस येत नाही म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळ काढणे, घरभरणी करणे आदी लोकोत्सव नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या परिसरात होत असतात. पैकी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, घरभरणी करणे हे विधी अन्यत्र होत असले तरी त्यांचे स्वरूप वा नावे भिन्न आहेत.
भोवाडा, खंडोबा आढीजागरण, अहिराणी लळित, भील आणि कोकणा यांचा डोंगऱ्या देव उत्सव, कोकणा आदिवासी बांधवांची कन्सरा माऊली, एखाद्या पारंपरिक वैद्याने रोग्याची पटोळी पाहणे, लग्नाच्या विविध परंपरा, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, मंत्र-तंत्र आदी लोकविधी - नाट्य नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या परिसरात होत असतात. पैकी बोहाडा, खंडोबा जागरण हे नाट्य नृत्य प्रकार इतरत्र होत असले तरी त्यांचे स्वरूप वेगळे आहे.
कानबाई – रानबाई बसवणे, गौराई बसवणे, काठीकवाडी काढणे, खांबदेव पुजणे (नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली आदी देव- देवता वार्षिकोत्सव नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. पैकी म्हसोबा, आसरा, मुंजोबा, काठीकवाडी या देवता इतरत्रही सापडतील पण त्यांच्या लोककथा- लोकप्रथा भिन्न आहेत.
आखाजीचा बार, झोका, गोफण, गलोल आदी खेळ नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. पैकी झोका, गोफण, गलोल हे महाराष्ट्रात इतरत्रही आढळत असले तरी त्यांचा हत्यार म्हणून वेगळा उपयोग होतो.
आखाजी बारातल्या सामुहीक शिव्या, झोक्यावरची सामुहीक गाणी, कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाल्याने स्त्रियांचे शोकग्रस्त पण गेय स्वरूपात शब्दबद्ध सामुहीक रडणे, लोकगीतातल्या तीनशे साठ- नऊ लाख अशा लोकपरिमाण संज्ञा, उखाणे, आन्हे, लोकगीते आदी सामुदायिक लोकसाहित्य नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतं. इतरत्र काही प्रकार असले तरी भाषा आणि जीवन जाणिवातल्या भावना वेगळ्या दिसतील.
अहिराणी खाद्य पदार्थ, दुख टाकायला आणणे, दारावर जाणे, विवाह परंपरा, बाळाला घुगरावणे आदी लोकप्रथा नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. इतरत्र त्याचे स्वरूप वेगळे दिसेल.
खंजिरी, डफ, तुणतुणे, ढोल, ढोलकी आदी आदिवासी वाद्य प्रकार तर फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, टापऱ्या गव्हाऱ्याची कला आदी आदिवासी नृत्य प्रकार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात वेगळ्या परंपरेत दिसतील. अशी काही नाशिक लोकसंस्कृतीची विविध रूपे दिसतात. त्यांचा जवळून आस्वाद, अनुभूती नवीन जीवनदृष्टी देऊन जाते.
एखाद्या गावापुरत्या वा जिल्ह्यापुरत्या म्हणता येतील अशा क्वचित व दुर्मिळ प्रथा परंपरा असतात. लोकप्रथा, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकरहाटी, लोकजत्रा हे लोकोत्सव अनुकरणातून झपाट्याने सर्वदूर पसरत राहतात. अमूक लोकपरंपरा अमूक गावातून प्रचलित झाली असे म्हणणे योग्य नव्हे. विशिष्ट गावाशी निगडीत असलेली परंपरा ही दुर्मिळ आणि क्वचित एखादी असते. एका विशिष्ट गावाशी निगडीत असलेल्या लोकपरंपरा वा लोकोत्सव या काही संख्येने मोजता येतील इतक्या आकडेवारीनुसार सांगता येणार नाहीत. ही मर्यादा नाशिकसाठीही आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
लेखक: डॉ. सुधीर रा. देवरे
मोबाईल : 7588618857
इमेल :drsudhirdeore29@gmail.com
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती.