त्या’ तिघींची ताटातूट एक रहस्यच!
महाकाली-महासरस्वती अडीचशे वर्षांपासून महालक्ष्मीपासून दूर. ...
लाकडात अखंड कोरलेल्या तीन मूर्ती गेल्या अडीचशे वर्षांपासून एकदाही भेटलेल्या नाहीत. पेशवाईत धामधूमीत रथयात्रेच्या माध्यमातून एकमेकींना भेटणाऱ्या जलालपूरची महालक्ष्मी, गंगापूरची महाकाली व गोवर्धनची महासरस्वती या महालक्ष्मीच्या ताटातुटीनंतर का भेटू शकल्या नाहीत याचे रहस्य अजूनही कायम आहे.
गोवर्धन गावाला दोन हजाराहून अधिक वर्षांचा रोचक इतिहास आहे. त्यामुळे अगदी सातवाहनांपासून ते पेशव्यांपर्यंत या परिसरात असंख्य घडामोडी घडल्या आहेत. नाशिकही पेशव्यांची उपराजधानी असल्याच्या काळात गोवर्धन, गंगापूर व जलालपूरचा विकास झाला. नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी गोपिकाबाईंचे वास्तव गंगापूर येथे होते. यामुळे या काळात कला संस्कृतीला चालना मिळाली. सध्या गंगापूरमध्ये पेठगल्लीत देवीचे मंदिर व गोवर्धनमध्ये मोठ्या होळीची देवी अशा लाकडात अखंड कोरलेल्या देवीच्या दोन मूर्ती आहेत. याबाबत एक दंतकथा सांगितली जाते की, गंगापूरच्या कोष्ठ्याला गोदावरीपात्रात निंबाचे मोठे खोड वाहताना हाती लागले. या खोडात अखंड देवीच्या तीन मूर्ती त्याने कोरल्या. यातील एक मूर्ती गोवर्धनमध्ये मोठ्या होळीच्या ठिकाणी बसवली. दुसरी गंगापूरमध्ये पेठगल्लीत तर तिसरी जलालपूरमध्ये. या तिन्ही मूर्तींची भेट उत्सवाच्या काळात मिरवणुकी दरम्यान व्हायची, अशी दंतकथा आहे. मात्र, जलालपूरातील मूर्ती गोदेच्या पुरात वाहून गेली की मिरवणुकीदरम्यान ती नाशिक शहरातच राहिल्याने तेव्हापासून तिघींची भेट झालेली नाही. शहरातील मूर्ती कोठे आहे हेही फारसे कोणाला माहिती नाही, असे मुरलीधर पाटील यांनी सांगितले.
तिसरी मूर्ती कोठे आहे याचा शोध घेतल्यावर गोवर्धन व गंगापूर येथील मूर्तीसारखीच मूर्ती गोरेराम लेनमधील राजेंद्र भाबड कुटुंबियांकडे असल्याचे आढळले. या मूर्तीबाबत माहिती रितेश राजेंद्र भाबड म्हणाले,‘सहा पिढ्यांपासून महालक्ष्मीची लाकडातील अखंड मूर्ती आमच्याकडे आहे. तिची सेवा आम्ही भक्तीभावाने करीत आहोत. ही मूर्ती गंगापूरमध्येच बनविण्यात आली होती. मात्र ही जलालपूरची देवी आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. त्या कारागिराने तीन मूर्ती कोरल्या होत्या. त्यातील एक गंगापूरची महाकाली व गोवर्धनची महासरस्वती व गोरेलेनमधील महालक्ष्मी आहे, ही माहिती मागच्या पिढ्यांनी आम्हाला दिली आहे. ही मूर्ती आमच्याकडे कशी आली हेही देखील आम्हाला माहिती नाही.’
गेल्या अनेक वर्षांपासून गोवर्धन व गंगापूरच्या देवींची मिरवणूक काढली जात नाही. उत्सवाच्या काळात गोवर्धनची मोठ्या होळीची देवीची प्रतिकृती पेठगल्लीतील देवीच्या भेटीसाठी नेली जाते. मात्र तीन भगिनींची गेल्या अनेक वर्षांपासून ताटातुटीमुळे भेट होऊ शकलेली नाही.
गोवर्धनमध्ये मोठी होळी केली जाते. त्याच चौकात देवीचे मंदिर असल्याने या देवीला मोठ्या होळीची देवी म्हटले जाते. तर गंगापूरमधील बाजारपेठ गल्लीत देवी असल्याने तिला पेठगल्लीतील देवी म्हटले जाते. या देवीला आतापर्यंत नाव नव्हते. पण, रितेश भाबड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धनमधील देवीचे नाव महासरस्वती तर गंगापूरमध्ये देवीचे नाव महाकाली आहे. ही माहिती त्यांना मागच्या पिढ्यांनी दिलेली आहे. याला कागदोपत्री पुरावा मात्र नाही, असेही ते सांगातात.
रूप समाधान देती...
भारतात मातृदेवतांच्या पूजनाची परंपरा अतिशय प्राचीन आहे. नवरात्रीच्या नऊ रात्रीत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्यांनाच नवदुर्गा म्हणतात.समृद्धी, संरक्षण आणि शौर्य इत्यादींसाठी मातृदेवतांपुढे नतमस्तक झालेले मानवी मन आपल्याला पाहायला मिळते. लाकडात अखंड कोरलेल्या या तिन्ही मूर्ती दशभुजा असून, त्या वाघावर रूढ आहेत. असुरांचा वध करताना तिन्ही देवींच्या अवतीभवती नाग, माकडे व वाघ आहेत. तिन्ही देवींच्या चेहऱ्यावरील भाव वेगवेगळे असून, पाहणाऱ्याला त्यांचे रूप समाधान देतात.
लेखक : रमेश पडवळ
rameshpadwal@gmail.com
contact no : 8380098107
अंतिम सुधारित : 1/30/2020
राज्यातील प्राणी रक्षण, शेती व दूध उत्पादनासाठी अन...