द. मा. मिरासदार : (१४ एप्रिल १९२७ – ). मराठी कथाकार. संपूर्ण नाव दत्ताराम मारुती मिरासदार. जन्म अकलूजचा. शिक्षण अकलूज, पंढरपूर व पुणे येथे एम्.ए.पर्यंत. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर अध्यापनक्षेत्रात प्रवेश (१९५२). १९६१ पासून मराठीचे प्राध्यापक.
बापाची पेंड (१९५७) ह्या पहिल्याच कथासंग्रहाने ग्रामीण कथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या कथांचे हुबेहूब (१९६०), विरंगुळा (१९६१), स्पर्श (१९६२), मिरासदारी (१९६६) इ. अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले.भोकरवाडीच्या गोष्टी (१९८३) हा त्यांचा अलीकडचा कथासंग्रह. ह्या संग्रहातील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे.
सरमिसळ (१९८१) आणि गप्पांगण (१९८५) हे त्यांचे ललित लेखसंग्रह. त्यांची दिलखुलास लेखनशैली त्यातही प्रत्ययास येते. त्यांनी लिहिलेल्या काही एकांकिका सुट्टी व पाच एकांकिका (१९६८) ह्या नावाने संग्रहीत आहेत. लाडाची मैना (१९७०) हे त्यांनी लिहिलेले वगनाट्य. जावईबुवाच्या गोष्टी (१९८०) आणि गाणारा मुलुख (नाटिका –१९६९) ही पुस्तके त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली आहेत
मिरासदार हे उत्तम कथाकथनही करतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी कथाकथनांचे कार्यक्रम केले आहेत.
लेखक : म. ना. अदवंत
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/17/2020