অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील

पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील

विठ्ठलराव एकनाथराव विखे-पाटील : (१२ ऑगस्ट १८९७२७ एप्रिल १९८०). महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण. नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरून त्यांनी व्हवहारबुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ ची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी’ची स्थापना केली.

इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड’ हे विधेयक आणले, या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकाऱ्यांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखेपाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यापुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातूनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला.

पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखेपाटील आघाडीवर, त्यात विखेपाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करून देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्त्व पटवून दिले. विखेपाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘द डेक्कन कॅनॉल्स बागायतदार परिषदेत विखे-पाटील’ यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला.

या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणूक विखे-पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करून भागभांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली. कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही’ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखेपाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली.

अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो.

पहिली अकरा वर्षे विखेपाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत. पुढे ते ‘विखेपाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्या’चे अध्यक्ष (१९६०) व ‘संगमनेर सहकारी साखर कारखान्या’चे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष (१९६६) झाले.

शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखेपाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद १९५६ साली प्रवरानगर येथे भरविली.

प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना व विखेपाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले. अशा प्रकारचे आणखी कारखाने उभे राहण्यासाठी विखेपाटील यांनी अनेक शेतकरी नेत्यांनी प्रोत्साहन दिले. उदा., सांगलीचे वसंतदादा पाटील, वारणानगरचे तात्यासाहेब कोरे, पोहेगावचे गणपतराव ओंताडे, राहुरीचे वाबूराब तनपुरे, अकलूजचे शंकरराव मोहिते, पंचगंगेचे रत्नाप्पा कुंभार, परभणीचे शिवाजीराव देशमुख, इत्यादी. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे-पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली (१५ मे १९६१).

विखेपाटील यांनी शेतकऱ्यांना बचतीचे महत्त्वही पटवून दिले. शासनाची अल्पबचत योजना यशस्वी रीत्या राबविल्याबद्दल १९६५ मद्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांनी खास मानपत्र देऊन गौरविले. त्याचप्रमाणे कुटुंबनियोजनाची योजनाही १९५९ पासून त्यांनी परिसरात राबविली. या योजनेचे फलित म्हणजे, १९७६ साली ऑक्टोंबर महिन्यात प्रवरा हॉस्पिटलमध्ये चार दिवस भरविलेल्या कुटुंबनियोजन शिबिरात ६,२३१ शस्त्रक्रिया यशस्वी रीत्या पूर्ण करण्यात आल्या व त्यातून शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.

विखेपाटील यांनी पुढील सामाजिक. शैक्षणिक संस्थांवर विविध नात्यांनी काम केले : प्रवरा शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष (१९५३), अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष (१९५३५६), कोपरगाव व कारेगाव सह. साखर कारख्यान्यांचे सन्मानीय संचालक (१९५४), प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेचे आद्य प्रवर्तक (१९६४), साखर कामगार हॉस्पिटलचे (श्रीरामपूर) अध्यक्ष (१९६८), अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक (१९५८) व अध्यक्ष (१९६८), गोदावरी विकास मंडळाचे सदस्य (१९७१) इत्यादी.

र्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण केले. तसेच सर्वतोपरीने साहाय्य केले. विखेपाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष (१९७८) होते. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत; म्हणून त्यांनी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. त्यांच्या पश्चात् त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमांतून अनेक शिक्षणसंस्था-उदा., वैद्यकीय, दंत, परिचालिका, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन (मुलांचे व मुलींचे), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कला अकादमी तसेच गावोगावी अनेक माध्यमिक विद्यालये इ. संस्था उभ्या राहिल्या. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखेपाटील व नातू राधाकृष्ण विखे-पाटील यांनी समर्थपणे पुढे चालविले आहे.

विखेपाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला, तर पुणे विद्यापीठाने ‘डी. लिट्.’ (१९७८) व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (१९७९) या पदव्या प्रदान केल्या. लोणी बुद्रुक येथे त्याचे निधन झाले.

 

लेखक : शंकरराव दिघे

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate