(२५ जुलै १९३१-१३ जुलै २००९). मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते. मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले. निळूभाऊ या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील पुणे येथेच लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. उद्यानविषयक पदविकाही त्यांनी मिळविली मात्र त्यांना अभिनयाची किशोरवयापासूनच विलक्षण आवड होती.
आपल्या ऐन तारुण्यात त्यांनी पुणे येथील ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’च्या उद्यानात माळी म्हणून काम केले. याच सुमारास त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. आपल्या दरमहा ८० रुपये पगारातील दहा रुपये ते दरमहा राष्ट्र सेवा दलाच्या कार्यासाठी देत. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्यांनी काम केले. या वेळी वसंत बापट, पु. ल. देशपांडे या दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला. खरे तर त्यांना माळी म्हणूनच पुढे कार्य करावयाचे होते. त्यासाठी ते स्वत:ची रोपवाटिका (नर्सरी) सुरू करण्याच्या विचारात होते. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुरेशा भांडवलाअभावी हा विचार सोडून द्यावा लागला.
राष्ट्र सेवा दलात कार्य करीत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याने ते प्रभावित झाले. याच काळात त्यांनी उद्यान हे नाटकही लिहिले होते. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. या वगाच्या सादरीकरणाने त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच; शिवाय त्यांच्या अभिनयकौशल्याची चुणूक इतरांना जाणवली. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले. या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकामुळे त्यांना 'एक गाव बारा भानगडी' (१९६८, दिग्द. अनंत माने) या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली व त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. या चित्रपटात त्यांनी साकारलेली 'झेले अण्णा' ही विनोदी खलनायकाची भूमिका अत्यंत गाजली. त्यांच्या नाट्य-कारकीर्दीत विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर (१९७२, दिग्द. कमलाकर सारंग) या नाटकातली त्यांची खलनायकी ढंगाची भूमिका विलक्षण प्रभावी ठरली. या नाटकाचे, त्यातील आशयाचे आणि निळू फुले यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी स्वागत केले. पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, कुणाचा कुणाला मेळ नाही, कथाअकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत यांसारख्या लोकनाट्यांमधून त्यांनी भूमिका केल्या. ही सर्वच लोकनाट्येत्या त्या काळात गाजली.
सलग ४० वर्षे ते चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर सक्रिय होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी १४० हून अधिक मराठी चित्रपटांमधून व १२ हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.त्यांच्या भूमिकांपैकी सामना (१९७५, दिग्द. जब्बार पटेल), सिंहासन (१९८०, दिग्द. जब्बार पटेल), शापित (१९८४, दिग्द. राजदत्त), पुढचं पाऊल (१९८९, दिग्द.राजदत्त) यांतील भूमिका विशेष लक्षणीय मानल्या जातात. सामाना चित्रपटातील ‘हिंदुराव धोंडे पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारून निळूभाऊंनी खलनायकाची स्वतंत्र शैलीनिर्माण केली. त्यांची जरब-युक्त शब्दफेक, भेदक नजर, देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री, मग्रूर भूमिकेसाठी पूरक ठरले.
या व्यतिरिक्त सोंगाड्या (१९७०, दिग्द. गोविंदकुलकर्णी), पिंजरा (१९७२, दिग्द. व्ही. शांताराम), हऱ्या नाऱ्या जिंदाबाद (१९७२, दिग्द. गोविंद कुलकर्णी), वरात (१९७५), भिंगरी (१९७९, दिग्द. सुषमा शिरोमणी), जैतरे जैत (१९७७, दिग्द. जब्बार पटेल), नाव मोठं लक्षण खोटं (१९७७, दिग्द. अनंत माने), पटली रे पटली (१९९१, दिग्द. गिरीश घाणेकर), एक होता विदूषक (१९९२,दिग्द. जब्बार पटेल) आदी मराठी चित्रपटांतील तसेच सारांश (१९८४, दिग्द. महेश भट्ट), मशाल (१९८४, दिग्द. यश चोप्रा), प्रेम प्रतिज्ञा (१९८९, दिग्द. बापू), कुली(१९८३, दिग्द. मनमोहन देसाई), दिशा (१९९०, दिग्द. सई परांजपे), नरम गरम (१९८१, दिग्द. बासू चॅटर्जी) आदी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रियठरल्या. त्यांनी भूमिका केलेल्या काही प्रमुख नाटकांमध्ये सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबुतर, बेबी, रण दोघांचे ही नाटकेही लोकप्रिय ठरली. गोष्ट छोटी डोंगराएवढी(२००९, दिग्द. गिरीश कुलकर्णी) हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सलग ३ वर्षे (१९७२,१९७३,१९७४) पुरस्कार मिळाले. १९९१ मध्ये भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारहीत्यांना मिळाला होता. सूर्यास्त या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना नाट्यदर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रांतही निळूभाऊंनीस्वत:च्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक वसूक्ष्म होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला.
त्यांच्या कारकीर्दीची अभिनयाइतकीच महत्त्वाची दुसरी बाजू राहिली, ती सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभागाची. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधकचळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य आदींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध व सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळींशी आपली नाळअखंडित ठेवली होती.
निळू फुले यांचे पुणे येथे अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले.
लेखक : मिलिंद मधुकर दुसाने
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/26/2020