डॉ. आनंदीबाई गोपाल जोशी : (३१ मार्च १८६५ - २६ फेब्रुवारी १८८७) १६ नोव्हेबर १८८६ ! नऊवारी साडी नेसलेली. नाकात नथीचा आकडा घातलेली. कृष शरीरबांध्याची व बोटीच्या तसेच जीवन सागरातील परावासाने थकलेली अशी मनस्वी स्त्री मुंबईच्या किना-यावर उतरली व तिच्या पदस्पर्शाने भारतातील स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ती स्त्री म्हणजेच डॉ. आनंदीबाई गोपाल जोशी ! १९व्या शतकात केवळ पतीच्या इच्छेसाठी स-या समाजाचा रोष व विरोध पत्करून हि महिला शिकली व पुढे अमेरिकेस जाऊन वैद्यकीय पदवी मिळवून भारतातील स्त्रियांची सेवा करण्याचे व्रत घेऊन भारतात परत आली. भारतातील पहिली महिला वैद्यक (M. D.) म्हणून त्यांची लौकिक आजही कायम आहे. आनंदीबाई म्हणजे कल्याणच्या गणपतराव जोशी यांची कन्या यमुना ! ३१ मार्च १८६५ या दिवशी तिचा जन्म झाला. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांचे बालपण फारसे रम्य नव्हतेच. आनंदीचे लंग लवकर करून मोकळे व्हावे असाच विचार तिच्या आई-वडिलांचा होता. अशातच पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशींचे स्थळ अनायसे चालून आले व त्यांच्याशी यमुनाचे लग्न करण्याचे गणपतरावांनी पक्के केले. गोपाळराव जोशी हे विदुर होते व सुधारक विचारांनी भारावलेले होते. विधवेशी पुनर्विवाह करण्याचा त्यांनी निश्चय केला असल्याने आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांनी लहान असलेल्या कुमारिकेशी विवाह करणे त्यांना पटत नव्हते. त्यांनी लग्न ठरू नये म्हणून खूप प्रयन्त केले! अखेर यमुनाला शिकण्यासाठी तिच्या माहेरून काही विरोध नसावा अशी अट मान्य केल्यावरच ते लग्नास तयार झाले.
स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा ध्यास होता व त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबातून करण्याचा त्यांचा मनोदय होता. आनंदीला शिक्षणात फारसा रस नव्हता, परंतु पतीच्या नजरेच्या धाकाने तिला अभ्यास करावा लागत असे. सुधारक विचारांचा काहीसा विक्षिप्त व मनस्वी अशा पतीमुळे तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.सर्वसामान्य मुलींप्रमाणे'केवळ संसार तिने करू नये तर शिक्षण घेऊन काही तरी वेगळे करावे, असे गोपाल रावांना वाटत असे. तिच्या आईला शिक्षणाचे महत्व मुळीच समजले नसल्याने ती मात्र आनंदीचा अतिशय राग-राग करीत असे. तिच्या मागे कामांचा सपाटा लावून तिला अभ्यासाला वेळच देत नसे. तरीही तिने अभ्यास केला नाही तर पतीचा मार खायचा व केला तर आईचा मार खायचा, असे घोर संकट आनंदीबाई वयाच्या १० - १२ व्या वर्षी झेलत होत्या. एकदा आईने जळक्या लाकडाने दिलेल्या माराणे शरीरावर झालेल्या जखमा गोपाळरावांचे निदर्शनास आले व या घरात राहुन तिचा अभ्यास होणार नाही, या विचाराने त्यांनी आपली बदली अलीबाग येथे करवून घेतली.
अलिबाग मध्ये आनंदीबाईच्या अभ्यासाला गती आली. तिचे भाषेचे ज्ञान वाढावे म्हणून मराठी बरोबरच संस्कृत भाषेचे शिक्षण त्यांनी सुरु केले. आपल्या पतीवरील विश्वास व त्यांची कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदिनेही हे शिक्षणाचे व्रत स्वीकारले व त्या दोघांमध्ये पती-पत्नी पेक्षा गुरु-शिष्याचे नाते अधिक दृढ झाले.
शिक्षणाप्रमाणेच समाजातून तीव्र परातीक्रिया उमटतील असे विक्षिप्त जीवन ते तिच्यावर लाडात असत. पायात बूट घालणे, समुद्रतीरावर फिरावयास जाणे इ. गोष्टीने त्याना समाजाचा रोष व विरोध पत्करावा लागला. परंतु समुद्र पार असणा-या प्रगत देशाच्या ओढीने पुढे या दाम्पत्याची ओळख कोल्हापुरास बदली केली असताना अमेरिकेतील ख्रिस्ती धर्म-मंडळाचे प्रमुख मि. वाईल्डर यांच्याशी झाली. कर्मधर्म संयोगाने अमेरिकेतील मि. वाईल्डर यांचेशी झालेला पत्रव्यवहार "रुसेल ' या गावात स्थायिक असलेल्या मिसेस. कार्पेटर यांच्या वाचनात आला व अंत:स्फूर्तीने प्रेरित होऊन त्यांनी भारतातील आनंदीबाईशी पत्रव्यवहार केला. अखेर मिसेस. कार्पेटर यांच्या मदतीने ७ एप्रिल १८८३ हा दिवस आनंदीबाईच्या अमेरिकेच्या प्रयाणासाठी निश्चित झाला. मेट्रिक परीक्षाही पास न झालेली अवघ्या १८ वर्षाची नऊवारी साडी नेसलेली, नाकात नथ घालणारी हि भारतीय तरुणी ७ एप्रिल १८८६ रोजी कलकात्ता बंदरावरील 'सिटी ऑफ बर्लिन ' या बोटीत विराजमान झाली. डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूंच्या पडद्याआड गोपाळराव दिसेनासे झाले. बोटीत लोकांच्या विचित्र नजर त्यांना भेडसावत होत्या. मनाची अस्वस्थता व नैराश्य घालविण्यासाठी त्यानि बोटीतील ग्रंथालयाचा आधार घेतला. 'सिटीझन ऑफ द वर्ल्ड' या पुस्तकाने त्यांना प्रफुल्लीत केले व केवळ उकडलेले बटाटे खाऊन दोन महिण्याचा प्रवास आनंदीने पार पाडला.
४ जून १८८६ रोजी त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला व मिसेस. कार्पेटर यांच्या घरी राहू लागल्या. पुढे अत्यंत प्रतिकूल परस्थितीतही त्यांनी अभ्यासाची कस सोडली नाही व वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतली. १ मार्च १८८६ रोजी त्यांचा पदवीदान समारंभ झाला व त्यांना एम. डी. हि पदवी मिळाली. भारतीय इतिहासाचे एक सोनेरी पान लिहिले गेले. गोपाळराव व आनंदीबाई याच्या जीवनातील हा परमोच्च आनंदाचा क्षण होता, यासाठी त्यांनी जीवनातील अनेक सुखांचा त्याग केला होता.
अखेर ९ ऑक्टोंबर १८८६ रोजी 'इट्सरिया' या बोतीनेहे दांपत्य भारताकडे परत येण्यास निघाले. कष्टमय जीवनाचा अतिरेकाने आनंदीबाईला क्षयरोगाने त्रासले होते. १६ नोव्हेंबर १८८६ रोजी हि बोट मुंबईच्या किना-यावर आली. अम्य्देशी परत आल्याचा आनंद त्यांच्या मुखावर दिसत होता पण शरीर मात्र थकले होते. शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आनंदीबाईचे व गोपाळरावांचे स्वप्न पूर्ण झाले होते परंतु महिलांची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण नाही झाले. २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांचे निधन झाले.
नाव आनंद असूनही अत्यंत खडतर व दुखं:मे जीवन त्यांच्या नशिबी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धडाडीने जगणारी हि स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ध्येय पूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. आनंदीबाई होय ! म्हणूनच आजही त्या वंदनीय व आदर्श आहेत.
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020