मंत्रालयाच्या तळमजल्यावरचं त्रिमुर्ती प्रांगण आज विद्यार्थ्यांच्या चिवचिवटानं आणि औत्सुक्यानं न्हाऊन निघालं ... विद्यार्थ्यांची भिरभिरती नजर तळमजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत मंत्रलयीन इमारतीचा वेध घेत होती.. अरं बग ना... माणसं चालत नाय तरी बी खाली येत्यात.... एका मुलानं सरकत्या जिन्याकडं बोट दाखवून म्हटलं... अन् वर बी जात्यात... दुसरा म्हणाला... भारी यार.... किती छान नं... आपण जायचं का त्याच्यावरून... आपसात कुजबूज झाली... शिक्षकांनी एक नजर फिरवताच मुलं पुन्हा शांत झाली... मुलांच्या नजरेतले भाव शिक्षकांनीही ओळखले... आपल्याला जायचंच आहे त्याच्यावरून... पण कुठलीही घाई नाही.. कुणीही एकमेकांची साथ सोडायची नाही. कुणी इकडे-तिकडे जायचं नाही.. सगळ्यांनी बरोबर जायचं... शिक्षकांनी असं म्हणताच आनंदाचा एकच जल्लोष झाला...
फेसाळता समुद्र, नेहरू तारांगण, म्हतारीचा बुट, गेट वे ऑफ इंडिया, गरमगरम वडापाव, लोकल ट्रेन अशी बालमनाला मोहिनी घालणारी मुंबई शहरातील आकर्षणं मुलांनी फक्त टीव्हीमधूनच का पहावीत? ते त्यांना प्रत्यक्ष पाहाता आलं तर? असा विचार करून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील चापडगावच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची सहल आज मुंबईत दाखल झाली... बाकी साऱ्या गोष्टींबरोबर राज्याचं प्रशासकीय मुख्यालय असणाऱ्या “मंत्रालया”चं आकर्षण खुप विशेष होतं.. म्हणूनच ९६ मुलांचा हा समुह आज मंत्रालयात राज्याचं हे मुख्यालय पाहण्यासाठी दाखल झाला... सोबत ८ शिक्षक ही होते. मंत्रालयात आल्या आल्या त्यांनी त्रिमुर्ती प्रांगण गाठलं. सगळ्या सुचनांचं पालन करण्याचं मान्य करत मुलांचा ताफा निघाला तो जिन्याच्या दिशेनं... सरकत्या जिन्यानं वर जाण्याचा अनुभव नसला तरी मनात भीती अजिबात नव्हती. त्यामुळं मुलं न अडखळता पटापट जिन्यावरून वर गेली... अरे मज्जा आहे नं... पाय उचलायचा नाही... नुसतं पायरीवर उभं राहायचं आपसुक जातो की आपण वर.... मुलांच्या डोळ्यातला आनंद काही केल्या कमी होत नव्हता. बरं आनंद तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता हा जिना आपल्याला न अडखळता चढता आल्याचं कौतूकही होतं.. त्यामुळं मुलांनी सरकत्या जिन्याचा प्रवास एन्जॉय करत सुरुवातीला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं मंत्रालयीन दालन पाहिलं... तिथले सुविचार वाचले... त्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाला भेट दिली... सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाचा फेरफटका मारला..
मंत्रालय पाहून झाल्यानंतर कॅन्टीनमध्ये दुपारचं जेवण घेऊन ही सगळी मुलं पुन्हा त्रिमुर्ती प्रांगणात आली आणि त्यांनी तिथं बैठक मांडली. सगळं पाहून झालं तरी डोळ्यातली नवलाई मात्र कमी होत नव्हती... त्यातील काही मुलांचा मोर्चा मग त्रिमुर्ती प्रांगणात असलेल्या लोकराज्य मासिकाच्या स्टॉलकडे गेला... लोकराज्य मासिक हातात घेऊन त्यांनी चाळायला सुरुवात केली आणि आमचं लोकराज्य भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या हातात अलगद पोहोचलं... तिथे पुन्हा माझी त्यांची भेट झाली.. माझे लोकराज्य चे काही सहकारी ही तिथे उपस्थित होते.. त्यातल्या एकानं विद्यार्थ्यानं एक छोटी पुस्तिका हातात घेत वाचलं....” मी मुख्यमंत्री बोलतोय”.... “मी पण बोलतोय की्” पुस्तिकेवरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोकडं पाहात त्यांनी पटकन् पुढचं वाक्य उच्चारलं आणि संवादाचा हा सेतू राज्यात किती भक्कम, निर्मळ आणि सहज झाला याची जाणीव झाली. आम्हाला मिळेल का एक पुस्तक... मुलांनी विचारलं आणि आमच्या लोकराज्य च्या टीमने लोकराज्य मासिक, मी मुख्यमंत्री बोलतोय ची पुस्तिका आणि अन्य प्रकाशनं मुलांच्या हातात देताच त्यांनी ती पटकन् उघडून वाचायला, चाळायला सुरुवात केली... आमचा कॅमेरा त्यांना टिपतोय हे देखील त्यांना कळलं नाही... त्यामुळंच की काय त्यांची निरागसता आम्हाला ही टिपता आली...
लहान मुलात एक होऊन जातांना नकळत का होईना शालेय दिवस आठवले... शाळेच्या गणवेशात प्रार्थनेसाठी शिस्तीत रांगेत उभं राहाणं, दोन वेण्या... त्याला बांधलेली रिबीन... नवीन जाणून घेण्याची इच्छा... सगळं सगळं.. आठवलं... खरं तर ही सहल घेऊन येणाऱ्या शाळेच्या डी.डी. गरड, हरिश्चंद्र वांढेकर, भगवान आरगडे, तारामती घुरे या आणि इतर शिक्षकांना धन्यवादच द्यायला हवे... मी मुंबई पहिल्यांदा आले ते इथल्या नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी...म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतरही काही वर्षांनी... पण या मुलांना शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने फार लहान वयात मुंबई, मंत्रालय पाहाता आलं... आतापर्यंत काय काय पाहिलं... असं विचारताच ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, भीमाशंकर, गेटवे ऑफ इंडिया, नेहरू तारांगण, महड, लोणावळा, एकवीरा मुलांनी भेट दिलेल्या ठिकाणाची नावं सांगायला सुरुवात केली... मंत्रालय म्हणजे नेमकं काय... मुलांना विचारलं... इथं मंत्री बसतात, मुख्यमंत्री बसतात... इथुन राज्याचे खुप मोठे मोठे निर्णय होतात... आम्हाला शिकवत्यात नं नागरिकशास्त्रात...
हो का... मग मंत्रालय पाहून काय वाटलं... मी असं विचारताच, एक बोलकी प्रतिक्रिया पटकन आली... १ नंबर.... भारताचं भविष्यच जर इतकं आशादायी आहे तर मग आणखी काय हवं नं?
लेखक : डॉ. सुरेखा म. मुळे,
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 4/14/2020