वाऱ्याच्या क्रियेने बनलेली सुट्या वाळूची लहान टेकडी किंवा कटक. समुद्राच्या उथळ किनारी भागात, वाळवंटात व सरोवराच्या सखल किनाऱ्यालगत सामान्यपणे वालुकागिरी आढळतात.
सुकलेली वाळू वारा वाहून नेतो. किनारी भागात जमिनीकडे वाहणाऱ्या अशा वाऱ्याच्या मार्गात गवत, वृक्ष किंवा खडबडीत पृष्ठभाग यांसारख्या अडथळा आल्यास वाऱ्याचा वेग कमी होऊन तेथे वाळू साचू लागते. वाळूची रास वाढली की, तिच्याकडून वाऱ्याला होणारा विरोधही वाढतो आणि रास आणखी वाढत जाऊन वालुकागिरी तयार होतो.
वालुकागिरी मुख्यतः वाळूचा बनलेला असतो; तथापि त्यात इतर सुटे द्रव्यही असू शकते. टेक्सस (अमेरिका), आफ्रिका व ऑस्ट्रेलियात मृत्तिकागिरीही आढळतात. वालुकागिरीला सुस्पष्ट माथा वा शिखर असते. आदर्श वालुकागिरीची वाऱ्याच्या दिशेतील बाजू लांब व तिचा उतार मंद असून वातविमुख बाजूचा उतार याहून तीव्र असतो. कारण शिखरापलीकडील वातछायेच्या भागात पडणारे वाळूचे कण त्यांच्या नैसर्गिक विराम वा अभिशयन कोनाला पडून स्थिर होतात. सुकलेल्या वाळूच्या कणांचा विराम कोन ३० ते ३५ अंश असतो. तसेच स्थिर झालेल्या वालुकागिरीचे शिखर पुढे जात उंच होत असते. अधिक उंच वालुकागिरीवरून माणूस वा जनावर चालत गेल्यास कधीकधी वाळूचे लोट खाली घसरू लागतात. यामुळे गडगडाटासारखा अथवा कधीकधी नादमय आवाज येतो. उदा., सिनाई द्विकल्पातील (ईजिप्त) जेबेल नाकूस किंवा गाँग टेकडी.
वाळूचे कण घट्ट न झालेल्या वालुकागिरीचे वाऱ्याच्या दिशेत सावकाश स्थलांतर होते. वाऱ्याचा जोर कायम राहिला व त्याच्याबरोबर येणारी वाळू कमी झाली की, वालुकागिरीच्या दीर्घ बाजूवरची वाळू वाऱ्याने शिखरावर नेऊन टाकली जाते. तेथून हे कण 'निसरड्या पृष्ठावरून' प्रवाहाप्रमाणे घसरत पुढे जातात. या रीतीने एका बाजूची वाळू दुसऱ्या बाजूला नेली जाऊन वालुकागिरीचे स्थलांतर होते.
अशा प्रकारे वालुकागिरींचा एक पट्टाच किनाऱ्याकडून जमिनीकडे सरकतो व त्याच्या जागी नवे वालुकागिरी तयार होतात. म्हणजे जणू काही वालुकागिरींची प्रचंड लाटच जमिनीकडे सरकत असते. हॉलंड, उत्तर जर्मनी, नामिबियाचा किनारा इ. भागांत असे स्थलांतर होते. वालुकागिरी वर्षाला ३० मी. सरकतात व या आक्रमणाने पिकाऊ जमिनी नापीक होतात. घरे, मळे, फळबागा व वृक्षही वाळूत गाडले जाऊन वसाहती उठवाव्या लागतात. पूर्वी काही शहरे अशा रीतीने गाडली गेल्याची उदाहरणे आहेत.
वालुकागिरींचे असे आक्रमण रोखण्यासाठी वाळू धरून ठेवणारी गवते लावतात. ही गवते या परिस्थितीशी जुळवून घेणारी असल्याने चांगली वाढतात. त्यांच्या काटक तुऱ्यांमुळे वाऱ्याचा जोर कमी होतो; गवतात वाळू पकडून ठेवली जाते; वाळूची रास वाढते तशी गवताची उंची वाढते आणि लांब मुळांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने वाळू घट्ट होते. अखेरीस वालुकागिरीच्या जागी गवताळ जमीन बनते व तिचा समुद्राच्या दिशेने विस्तार होतो. याचसाठी कधीकधी गवताच्या जोडीला शंकुमंत वृक्षांसारखे वृक्षही लावतात.
वाळवंटातही वालुकागिरी तयार होतात. भर वाळवंटात वाऱ्याच्या मुक्त क्रियेद्वारे वालुकागिरीचा मालिकाच बनते. ओलावा व वनस्पती असणाऱ्या ठिकाणी (उदा., मरूद्यानभोवती तसेच वाळवंट व तृणसंघात किंवा रुक्षवन यांच्या सीमावर्ती प्रदेशात) वालुकागिरी तयार होण्याची क्रिया गुंतागुंतीची असते. मूळ खडकाचे स्वरूप, तो झिजण्याचे प्रमाण व वेग, वाळू व अन्य कणांची आकारमाने, वाऱ्याच्या दिशेत व वेगात होणारे बदल आणि भूभागाचा खडबडीतपणा यांच्यावर वालुकागिरीची निर्मिती व स्वरूप अवलंबून असते. प्लवराशी, चंद्रकोरीच्या आकाराच्या बारखान, लांबट साइफ (सेफ) आणि वालुकास्तर हे वालुकागिरीचे चार मुख्य प्रकार वाळवंटात आढळतात. पुढे आलेल्या खडकाच्या किंवा कड्याच्या वातछाया प्रदेशात तात्पुरता वालुकागिरी बनतो. त्याला प्लवराशी म्हणतात.
चंद्रकोरीसारखे बारखान हे वालुकागिरी एकेकटे वा त्यांचे समूह आढळतात. त्यांची उंची ३० मी. पर्यंत आणि रुंदी उंचीच्या सु. बारापट असते. जवळजवळ एकाच दिशेत व एकसारख्या वाहणाऱ्या वाऱ्याद्वारे (उदा., ईशान्य व्यापारी वारे) बारखान निर्माण होते. वालुकागिरीचे स्थलांतर होताना त्याच्या कडांकडून वाऱ्याला मध्यभागाएवढा विरोध होत नाही. परिणामी या दोन्हींचा विरोध एकसारखा होईपर्यंत कडांचे कण अधिक लांबवर पडून त्यांची लांबी मध्यभागापेक्षा अधिक होते. म्हणजेच वातविमुख भागात टोके असणाऱ्या चंद्रकोरीसारखा आकार वालुकागिरीला येतो. वाऱ्यात बदल होईपर्यंत बारखानचा आकार व आकारमान विशेष बदलत नाहीत. अखंड वारा व वाळूचा पुरेसा साठा असतो, तेव्हा बारखानचेही स्थलांतर होते. या रीतीने मोठी बारखान वर्षाला सु. ६ मी. तर लहान सु. १५ मी. पुढे जाते.
कधीकधी प्रचलित वा नेहमीचे वारे त्यांना आडव्या दिशेत असणाऱ्या वाऱ्यांनी अडविले जातात. अशा वेळी एकेरी वाहतुकीतील वाहनांप्रमाणे वाळूची कोंडी होऊन प्रचलित वाऱ्याच्या दिशेत लांबट (लांबी कित्येक किमी. पर्यंत) वालुकागिरी बनतो. त्याला साइफ वा रेखीय कटक म्हणतात. याचे शिखर १०० मी. पर्यंत उंच व रुंदी उंचीच्या सहापट असते. यांच्या समांतर रांगा असतात व अशा वालुकागिरींची शिखरे एखाद्या प्रचंड करवतीच्या दात्यांप्रमाणे असतात. विस्तृत व्यापाच्या सपाट वालुकागिरींना वालुकास्तर म्हणतात. हे सलग वा विभक्त आणि उंचसखलही असतात.
यांशिवाय वालुकागिरींचे अन्य प्रकारही आहेत. उदा., विपुल वाळू असलेल्या भागात बारखान जोडल्या जाऊन आडव्या वालुकागिरींचा जणू'वाळूचा समुद्र' बनतो. याला स्पष्ट शिखर नसते. वनस्पतींचा सलग पट्टा नसलेल्या व वाऱ्याने खळगा पडलेल्या ठिकाणी अन्वस्ताकार वालुकागिरी बनतो. तारकाकृती वालुकागिरीच्या ताऱ्याच्या टोकापासून शिखरापर्यंत कटक असतो. याचे स्थलांतर होत नाही, म्हणून वाळवंटातील प्रवासामध्ये याचा खुणेसारखा वापर करतात.
भारतामध्ये नूतनतम (होलोसीन - गेल्या सु. ११ हजार वर्षांच्या) काळातील वालुकागिरी आढळतात. राजस्थान, ओरिसा, गुजरात, तमिळनाडू व केरळ येथील काही किनारी भागांत तसेच कृष्णा, गोदावरी व गंगा नद्यांच्या खोऱ्यांत व मैदानी प्रदेशांतही वालुकागिरी आढळतात.
पहा - वाळवंट; वाळू.
ठाकूर, अ. ना.
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/6/2020