भूपृष्ठावरील आजचे खंडप्रदेश पुराजीव महाकल्पात एकाच महाखंडाचे किंवा सलग भूमीचे भाग होते. उत्तर कार्बॉनिफेरस काल खंडात हालचालींमुळे ती फुटून तिचे प्रथम लॉरेंशिया व गोंडवनभूमी असे दोन प्रमुख भाग झाले. नंतर हे दोन खंडप्रदेश विभागून इतर खंडे तयार झाली. प्रत्येक खंडात वरील महाखंडांचे अवशेष आढळतात. हे अवशेष म्हणजे अतिप्राचीन काळात तयार झालेली पठारे आहेत. गोंडवनभूमीचे विखंडन होऊन दक्षिण अमेरिकेतील गियाना (ब्राझील) पठार, आफ्रिकेतील पठार, अरेबियाचे पठार, भारतातील दख्खनचे पठार व पश्चिम ऑस्ट्रेलियातील पठार ही पठारे तयार झाली; तर लॉरेंशियाच्या विभंजनामुळे सायबीरियातील अंगारा पठार, स्कँडिनेव्हियाचे पठार व कॅनडाचे पठार ही पठारे निर्माण झाली असावीत. ग्रीनलंडच्या व स्कँडिनेव्हियाच्या पठारांवर हिमनद्यांमुळे सरोवरे तयार झाली. ज्वालामुखी क्रियेमुळेही पठारे तयार होतात. भेगी उद्गीरण क्रियेमुळे वरील प्रकारच्या पठारांची निर्मिती होते. भूपृष्ठाला प्रचंड भेग पडून शिलारस बाहेर येतो. त्याचे थरावर थर साचत जातात व त्यांपासून उंच-सखल पठारे तयार होतात. संयुक्त संस्थानांतील कोलंबियाचे पठार, भारतातील दख्खनच्या पठाराचा वायव्य भाग, आयर्लंडमधील अँट्रिमचे पठार ही पठारे वरील प्रकारे तयार झाली असावीत, असा अंदाज आहे. वरील प्रकारची पठारे शिलारसापासून बनलेली असतात. संयुक्त संस्थानांतील कोलंबियाच्या पठाराची रुंदी १६० किमी. असून एकूण विस्तार सु. एक लक्ष चौं किमी. व पठारावरील शिलारसाची जाडी १,५०० मी. इतकी असावी. पठाराखाली शिलारसाचे सु. २० थर असून प्रत्येक थराची जाडी वेगवेगळी आहे. कोलंबियाचे पठार मायोसीन काळात तयार झाले असावे. भारतातील दख्खनच्या पठाराचा वायव्य भाग वरील प्रकारेच तयार झाला असावा. मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी भेगी उद्गीरण अनेक वेळा होऊन हे पठार तयार झाले असावे. लाव्हारसाच्या उद्रेकामुळे तयार झालेली पठारे संयुक्त संस्थानांच्या ऑरेगन, नेव्हाडा, आयडाहो व वायोमिग या राज्यांत आढळून येतात. आफ्रिकेतील ड्रेकन्सबर्गचे पठार, ब्राझील, यूरग्वाय व अर्जेंटिना येथील पाराना पठार व न्यूझीलंडच्या उत्तर बेटातील इग्निम्ब्राईट पठार ही लाव्हारसापासून तयार झालेली पठारे आहेत. इग्निम्ब्राईट व येलोस्टोन या पठारांवर रायोलाइट प्रस्तर आहेत.
ही पठारे अतिशय विस्तृत असून त्यांनी खंडांचा खूपच मोठा भाग व्यापलेला आढळून येतो. यांना शील्ड किंवा ढालक्षेत्र असेही म्हणतात. या पठारांचा बरचसा भाग झिजेमुळे किंवा अनावरणामुळे उघडा पडतो आणि नंतर ऊर्ध्वगामी हालचालींमुळे उचलला जातो. थायलंडमधील कोराटचे पठार, ब्रह्मदेशातील शानचे पठार, आफ्रिकेतील व अरबस्तानातील पठारे व भारतातील दख्खनचे पठार ही पठारे महाद्वीपीय पठारे म्हणून ओळखली जातात. समुद्रसपाटीपासून वरील पठारे सरासरीने ७०० मी. उंचीवर असून त्यांची समुद्राकडील बाजू तीव्र उताराची असते.
हिनमदीच्या घर्षण कार्यामुळेही पठारे तयार होतात. प्लाइस्टोसीन कालखंडात अमेरिका, यूरोप व यूरेशिया या खंडांचे उत्तर भाग हिमावरणाखाली होते; परंतु तपमानात वाढ झाल्यानंतर बर्फाचा विस्तार कमी होत गेला व बर्फाच्या घर्षण कार्यामुळे वरील विभागांतील उंच पर्वतमय प्रदेशांचे क्षरण होऊन तेथे पठारांसारखे प्रदेश तयार झाले असावेत. ग्रीनलंड व अंटार्क्टिका येथील पठारे वरील प्रकारे तयार झाली आहेत. अत्यंत थंडीमुळे म्हणजे तापमान शून्याखाली अनेक अंश असल्याने वरील प्रदेशांत नद्या आढळत नाहीत, त्यामुळे ओलसर प्रदेशातील पठारांवर नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूमिस्वरूपे ग्रीनलंड व अंटार्क्टिका येथे नाहीत. फक्त ग्रीनलंडमध्ये पठारांवर एकमेकांना समांतर असे कटक आहेत. त्याची उंची आजूबाजूंच्या भागांपेक्षा सु. १० मी. पर्यंत जास्त असते, त्यांना ‘झासट्रगी’ असे म्हणतात. वारा व प्रवाही बर्फ यांमुळे झासट्रगी तयार होतात. काही ठिकाणी बर्फाच्या थराची जाडी १,५०० मी. इतकी आहे. ग्रीनलंड व अंटार्क्टिका यांमधील पठारे हजारो मीटर बर्फाखाली असल्याने खूपच सपाट आहेत. या पठारावंर असलेली आणि बर्फावर डोकावणारी शिखरे ‘हिमस्थगिरी’ या नावाने ओळखली जातात.
अंतिम सुधारित : 5/2/2020