অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वांद्रे किल्ला

वांद्रे किल्ला

मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे सीरॉक हॉटेलला लागून एक रस्ता दक्षिणेकडे जातो. हा रस्ता थेट वांद्रे किल्ल्याच्या प्रवेशद्वारपर्यंत जातो. या ठिकाणी जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्थानकावरुन बस सेवाही आहे.

इ.स. 1505 मध्ये फारियाने ‘बंदर’ या कोकण किनाऱ्यावरील गावाचा उल्लेख केला आहे. ते ठिकाण म्हणजेच आजचा वांद्रे. वांद्रे म्हणजे साष्टी बेटाचे दक्षिणेकडील टोक. या बेटामध्ये सहासष्ट गावे होती म्हणून या बेटाचे नाव साष्टी पडले. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात सध्याच्या महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीचा प्रदेश पोर्तुगीजांना गुजरातच्या सुलतानाकडून मिळाला. 1661 साली ब्रिटीन आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये राजघराण्यातील लग्नसंबंधात जो करार झाला त्या अन्वये मुंबई बेट ब्रिटीशांना आंदण म्हणून द्यायची ठरली. तथापि ही बेटे हस्तांतरित होण्यास 1665 साल उजाडले. हे हस्तांतरण करतानाही पोर्तुगीजांनी मखलाशी केली. त्यांनी साष्टी व ठाणे तर ब्रिटशांना दिले नाहीतच, पण माजगाव, परळ, वरळी, शीव, धारावी आणि माहीम ही स्वतंत्र बेटे आहेत या सबबीवर त्यांचा ताबा देण्याचे नाकारले. तथापि मुंबईचा पहिला गव्हर्नर हंफ्रे कुक ह्याने ओहोटीच्या वेळी मुंबईहून माझगाव, परळ आणि माहिमलाही सरळ चालत जाता येते ही वस्तुस्थिती पुढे करुन ही वेगळी बेटे असल्याचे अमान्य केले. नुसते अमान्य करुन तो स्वस्थ बसला नाही तर त्याने सरळ या सर्व प्रदेशाचा ताबा घेतला. साष्टी व ठाण्याचा ताबा मात्र पोर्तुगीजांकडेच राहिला.

आज दिसणार हा किल्ला रुढार्थाने किल्ला म्हणता येईल असा नाही. मात्र पेशवे दप्तरामध्ये ‘वेसाव्याचा किल्ला हा माहीम व वांद्रे येथील किल्ल्यांइतका मोठा आहे’, असा उल्लेख आहे.

सध्याच्या वांद्रे भागाच्या नैऋत्य टोकावर समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. हा किल्ला ज्या समुद्राजवळ आहे तो समुद्रकिनारा बऱ्यापैकी खडकाळ असून त्यालगतच्या एका टेकडावर हा किल्ला बांधण्यात आला. त्यामुळे या किल्ल्याची पश्चिम तटबंदी अक्षरश: समुद्रातूनच सुरु झाली आहे. तशीच परिस्थिती दक्षिणेकडील तटाच्या बाबतीतही आहे. ही किल्याची टेकडी आकाराने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या टेकडीची किंवा टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू एकदम तीव्र कड्याची तर जमिनीकडील म्हणजे पूर्व व उत्तरेकडील बाजू कमी उताराची आहे. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी या बाजू तासून तिथे कडे निर्माण केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आज गेल्यानंतर डाव्या हातास एक घराच्या किंवा कौलांचे छप्पर असलेल्या खोलीचे अवशेष दिसतात. दरवाज्याच्या डावीकडे दरवाजाला काटकोनात असलेली भिंत आणि तटबंदीत असलेल्या खाचा यावर या खोलीच्या छताच्या लाकडी तुळ्या पेलल्या गेल्या होत्या. खोलीच्या अंतर्भागात दरवाज्यालगतच्या डाव्या भिंतीत एक कोनाडा होता. हा कोनाडा आजही भिंतीच्या अवशेषांमध्ये टिकून आहे. या खोलीव अर्थातच पोर्तुगीज धाटणीची कौले असणार. हा पार्तुगीजांनी भारतात आणलेला कौलांचा प्रकार आज मंगलोरी कौले म्हणून ओळखला जातो.

वांद्रे किल्ल्याचे दरवाजेही मुंबईत आढळणाऱ्या युरोपीय लोकांनी बांधलेल्या इतर ‍किल्ल्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. इतर युरोपीय किल्ल्यांमध्ये दरवाजे पूर्णत: तटबंदीच्या जाडीतच असतात आणि आतमध्ये जर चौकट असेल तर ती लाकडी असते. पण इथे मात्र दगडी चौकट आहे.

किल्ल्याच्या भिंतीही मुंबईतील अन्य युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळ्या आहेत. या भिंती, अगदी तटबदीच्या भिंतीही बाहेरच्या बाजूला खालच्या भागात अधिक जाड आणि वरच्या भागात जाडी उत्तरोत्तर कमी होत जाणाऱ्या नाहीत. त्या सरळ उभ्या असून त्यांची जाडी मुंबईतील अन्य किल्ल्यांच्या भिंतींच्या जाडीपेक्षा कमी आहे. तटबंदीतील तोफांच्या खाचा आजतरी अस्तित्वात नाहीत.

गेल्या दोन वर्षात या किल्ल्याची जतन-दुरुस्ती व पुरातत्त्व संकेतात बसणारी सुशोभिकरणाची कामे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने पार पाडली आहेत. त्यामुळे हा किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे. 

लेखन - संकलन - विलास सागवेकर, 
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate