অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामटेक

रामटेक

रामटेक

नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निसर्गरम्य स्थान. लोकसंख्या १६,७३३ (१९८१ अंदाज). हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ किमी. वर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे.

रामटेक म्हणजे ‘रामाची टेकडी’; रामाने वनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले, असेही म्हटले जाते. या टेकडीवर विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास ‘सिंदुरगिरी’ असेही नाव पडले आहे. ‘रामगिरी’, ‘तपोगिरी’, ‘काशीचे महाद्वार’ असेही याचे उल्लेख आहेत. ‘सिंदुरगिरी’ व ‘तपोगिरी’ ही दोन्ही नावे येथील लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या एका यादवकालीन शिलालेखात (तेरावे शतक) आढळतात.

रामटेक या १५२ मी. उंचीवर असलेल्या टेकडीवर चौदाव्या शतकातील बरीच मंदिरे आहेत. या टेकडीला चारी बाजूंनी कोट असून त्याला अनुक्रमे वराह, भैरव, सिंगपूर आणि गोकुळ असे चार दरवाजे आहेत. आवारात प्रथम दशरथ व वसिष्ठ मुनी यांची मंदिरे असून नंतर राम-सीतेचे मंदिर आहे, परंतु भक्तगण प्रथम धूम्रेश्वर महादेवाचे दर्शन घेऊनच श्रीराम मंदिरात दर्शनास जातात.

राममंदिरात राम-सीता यांच्या काळ्या दगडातील, वनवासी वेषातील रम्य मूर्ती आहेत. त्या दुधाळे तलावात मिळाल्याचे म्हटले जाते. या मंदिरासमोरच लक्ष्मणाचेही मंदिर असून, गोकुळ दरवाजा व लक्ष्णण मंदिर यांवरील कोरीव काम विशेष लक्षणीय आहे. यांव्यतिरिक्त अन्य काही मंदिरेही आवारात आहेत.

मंदिरासमोरच एक कुंड असून, ते सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते. येथे रामनवमी व त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी मोठ्या जत्रा भरतात टेकडीच्या पायथ्याशी एक जुने कलंकीचे मंदिर व मध्ययुगीन नागर शैलीत बांधलेली काही जैन मंदिरे आहेत.

रामटेकमध्ये माणिकताल व मथुरासागर अशा दोन बागा आणि २७ तलाव असून त्यांपैकी अंबाला तलाव सर्वांत मोठा आहे. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेली अनेक प्रेक्षणीय देवालये असून सकाळच्या प्रहरी या देवालयांवर सूर्यकिरणे पडून चमकू लागली म्हणजे तलाव व देवालये यांचे एकंदर दृश्य अतिशय मनोहारी बनते.

या मंदिरांमध्ये एक अप्रतिम सूर्य मंदिरही आहे. अंबाला तलावावर एकूण आठ घाट बांधण्यात आले असून त्यांना अष्टतीर्थांची नावे देण्यात आली आहेत. येथे १८६७ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

तीर्थक्षेत्राखेरीज आसमंतीय मँगॅनीजच्या खाणी यांमुळे रामटेकला विशेष महत्व आले आहे. येथील पानमळे प्रसिद्ध असून ही पाने पुण्या-मुंबईला निर्यात होतात.

येथील नयनरम्य सृष्टीसौंदर्य पाहून कविश्रेष्ठ कालिदासाला मेघदूतासारखे खंडकाव्य स्फुरले, तर कवी अनिलांनी येथील त्रिविक्रम वामनाचे मंदिर पाहून भग्नमूर्ति हेखंडकाव्य लिहिले.


खंडकर, प्रेमलता

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate