অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुरबाडच्या ‘गणेश गडद' पर्यटन स्थळाला संजिवनी

मुरबाडच्या ‘गणेश गडद' पर्यटन स्थळाला संजिवनी

सह्याद्रीच्या डोंगररागांमधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावाजवळील प्राचीन गणेश लेणी अथवा गणेश गडद या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडेतीन किलोमिटर अंतरावर डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.

सातव्या शतकात खोदलेल्या या भव्य लेण्यांद्वारे तत्कालिन संस्कृतीची ओळख होण्यास मोठा हातभार लागला. १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. गणेश लेणी नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या या दगडी गुहेत विविध दालने असून त्यात हिंदू देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. मध्यभागी मुख्य सभागृह आणि शेजारी छोटी तीन-चार दालने असे या लेण्यांचे स्वरूप आहे. पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.

या पर्यटन स्थळावरील असुविधांमुळे ते दुर्लक्षित होते. मात्र आता वनविभाग आणि सोनावळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थेट लेण्यांमध्ये चक्क नळपाणी योजना राबविण्यात आल्याने या पर्यटनस्थळाचा जीर्णोद्धार झाला आहे. त्याचबरोबर तीन सौर पथदिवे बसवून इथल्या दालनांमध्ये रात्री मुक्काम करू इच्छिणाऱ्‍यांसाठी उजेडाची सोय करण्यात आली आहे.

गावापासून लेण्यांपर्यंतच्या प्रवासात आढळणाऱ्‍या निसर्ग श्रीमंतीची ओळख करून देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटकांना त्यांच्या मागणीनुसार स्थानिक शाकाहारी भोजन व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने पुरविली जाणार आहे. यापूर्वी याच डोंगररागांमध्ये असलेल्या नागझरी या बारमाही झऱ्‍यावर पाणी पुरवठा राबवून खालच्या बाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. मात्र लेण्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचा हा बहुधा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

मात्र पावसाळ्यानंतर इथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे खाली असणाऱ्‍या सोनावळे गावातून पाणी आणण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती. आता ती चिंता मिटली आहे. लेण्याजवळच असलेल्या ‘आंब्याचे पाणी' या बारमाही झऱ्‍यावरून थेट वाहिन्यांद्वारे पाणी लेण्यात आणले आहे. ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नांची शर्थ करून जवळपास एक किलोमिटर लांबीची वाहिनी टाकून झऱ्‍याचे पाणी लेण्यांजवळील टाकीत आणले आहे. गुरूत्त्वीय बलाने हे पाणी लेण्यात आले आहे. नुकतेच वनक्षेत्रपाल तुकाराम हिरवे, इतिहास तज्ज्ञ अविनाश हरड आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पाणी योजनेचे औपचारिक उद्घाटन झाले.

शहरातल्यासारखे हे पाणी ठराविक वेळेत नव्हे तर अहोरात्र उपलब्ध असणार आहे. तसेच रात्री सौरदिव्यांचा प्रकाशही असेल. त्यामुळे पर्यटकांना इथे मुक्काम करता येणे सोयीचे होणार आहे.

ग्रामस्थ आणि वन विभागाच्या वतीने लेण्यांकडे जाणारी पायवाट दुरूस्त करण्यात येत आहे. कठीण चढ काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे अधिक सुलभ पद्धतीने येता येईल. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला जात आहे. पर्यटक आणि ग्रामस्थ यांच्या सूचना विचारात घेऊन याठिकाणी अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील - तुकाराम हिरवे, वनक्षेत्रपाल, टोकावडे.

आपल्या प्राचीन परंपरा आणि संस्कृती समजून घेण्यासाठी लेण्यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. पाणी, वीज, सोपे रस्ते या सोयींमुळे आता ‘गणेश लेणी' परिसरात अधिक संख्येने पर्यटक येतील. वाटेत जैवविविधतेने श्रीमंत असे जंगल आहे. या जंगलात अनेक दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहेत. रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरांनी हा सगळा परिसर समृद्ध आहे. त्यामुळे पर्यटकांना ही भेट संस्मरणीय होईलच, शिवाय त्यातून सोनावळे ग्रामस्थांनाही रोजगाराच्या संधी मिळतील

- अविनाश हरड, अश्वामेध प्रतिष्ठान

लेखक: प्रशांत मोरे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate