वेशीवरच्या पाऊलखुणा : उंबरपाडा : शिराईलक्ष्मीचा उंबरपाडा !
आदिवासी संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये निसर्गाचा फार मोठा वाटा आहे. त्याचेच प्रतिबिंब आदिवासींनी बनविलेल्या वस्तुमध्ये व त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तुंमध्ये पहायला मिळते. गरजेनुरूप वस्तू बनविणारे आदिवासी आधुनिक बाजार पद्धतीमुळे आता या कलेंपासून लांब झालेले दिसू लागले आहेत. मात्र नाशिकमधील पेठ सारख्या तालुक्यातील उंबरपाडा गावांमध्ये आजही त्यांची कलाकुसर पहायला अन् अनुभवायला मिळते. केरसुणी म्हणजेच शिराई हा उंबरपाडा या गावचा गेल्या अनेक पिढ्यांपासून मुख्य व्यवसाय आहे. दिवाळीत लक्ष्मीपुजनासाठी महत्त्वाची असणारी शिराईची कर्मभूमी म्हणूनही उंबरपाड्याला ओळखले जाते.
'जंगल माणसाला काय काय देते’ या प्रश्नाचे उत्तर आपण प्रत्येकाने शालेय जीवनात दिले असेल. मात्र आपला थेट संबंध जंगलाशी येते नाही. जंगल, निर्मिती प्रक्रिया, बाजार, विक्रेता अन् आपण अशी साखळी जंगल अन् आपल्यामध्ये असते. पण, आदिवासी बांधव फक्त अन् थेट जंगलावरच अवलंबून असतात. त्यांच्या उपयोगी वस्तू ते जंगलातून तयार करतात. मग ती घर स्वच्छ करण्याचा झाडू असो वा सणांना मंत्रमुग्ध करणारे एखादे वाद्य. त्या प्रत्येकाला थेट निसर्गाचा स्पर्श असतो. म्हणूनच साधेपणे, सुंदरता, रेखीवपणा व उपयोगिता ही आदिवासी कलांची वैशिष्ट्ये आहेत. आदिवासींचा जीवनविषयक दृष्टीकोन साधा, सरळ असल्याने त्यांची कलाही साधी सोपी असते. त्यांना निसर्गातील विविध वस्तुंचे आकार त्यांना प्रेरणा देतात अन् त्यातूनच ती वस्तु साकरते. त्यामुळेच त्याच्या कलेत निरागसता प्रगट होताना दिसते. हाच आविष्कार त्यांनी बनविलेल्या केरसूणी (झाडू) म्हणजेच शिराईतही पहायला मिळतो. आदिवासींसाठी शिराई लक्ष्मीसमान आहे. दारिद्र निर्मुलन करणारी शिंदीच्या झाडापासून बनविली जाणारी शिराईची परंपरा उंबरपाड्याच्या मागील अनेक पिढ्या पुढे नेत आहे.
नाशिक-पेठ रस्त्यावर ४० किलोमीटरवर करंजाळे हे गाव लागते. या गावातून उजव्या हाताला उंबरपाडा गावाकडे घेऊन जाणारा हिरवाईने नटलेला रस्ता आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातो. या रस्त्याने पाच किलोमीटरवर गेल्यावर झाडींमध्ये दडलेली आदिवासी निवासी शाळा पाहिली की, समजावं उंबरपाडा आला. थोडे पुढे डाव्या हाताने गेल्यावर उंबरपाडा गावची कमान आपले स्वागत करते. उंबरांच्या झाडांनी वेढलेले गाव असल्याने गावाला उंबरपाडा असे नाव पडले असावे, असे येथील आदिवासी बांधव सांगतात. मात्र आता उंबरांची झाडे गावात नाहीत. मात्र आदिवासींच्या लहान लहान घराघरांवर डिशी टिव्हीच्या टोपल्यांचा शिरकाव पहायला मिळतो. वारली, कोळी, कोकणा आदिवासींचे दोनशे उंबरांचे उंबरपाडा हे गावंधपाडा श्रीमंत धरणालगत वसलेले आहे. धरणाच्या पाण्यामुळे गाव बेटावर वसल्यासारखे वाटते.
या धरणाला श्रीमंत असे का म्हटले गेले असावे, असा प्रश्न न पडला तर नवलंच. पेठ तालुक्यातील सर्वात मोठे धरण असल्याने अन् या धरणाच्या श्रीमंतीवर पेठचा बराचसा उदरनिर्वाह असल्याने या धरणाला श्रीमंत म्हटले गेले, असे लक्ष्मण डोळे सांगतात. मात्र गावची श्रीमंती अन् उदरनिर्वाह गेल्या अनेक पिढ्या शिराई उद्योगावर अवलंबून आहेत. हा व्यवसाय कधीपासून गावात चालतो, यावर त्र्यंबक गुंबाडे म्हणतात,`मागील अनेक पिढ्या आम्ही हेच करतो आहोत. शिराईत आमची श्रीमंती अन् जगण्याचा आधार आहे. पावसाळ्यात शेती अन् इतरवेळी शिराईचे उत्पादन घेतले जाते.’
केरसूणी, झाडू, शिराई यात उंची, रूंदी अन् बनविण्याच्या पद्धतीत थोड्याफार प्रमाणात वेगळ्या आहे. मात्र सर्वांना झाडूच म्हटले जाते.झाडू माडाच्या हिरांचे, शिंदीच्या पात्यांचे व एका विशिष्ट प्रकारच्या गवताने बनवितात.जमीन झाडावयाचा तो झाडू अशी सामान्यव्याख्या प्रचलित असली तरी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत त्याला वेगवेगळी नावे आहेत. कोकणात झाडू हिरांचेच करतात. त्याला केरसुणी किंवा वाढवण म्हणतात. देशावर हिराची केरसुणी क्वचितच वापरतात पण तेथे तिला खराटा म्हणतात. तसेच तेथे गवतापासून केलेले झाडूही वापरले जातात व त्यांना कुंचले म्हणतात. नागपूरकडे झाडू,झाडणी व फडा ही नावे प्रचलित असून,शिंदीच्या झाडूला झाडू व फडा आणि गवताच्या झाडूला झाडणी म्हणतात. तर नगर भागात गवतापासून तयार होणाऱ्या झाडूलासुराड म्हणतात. तर उत्तर महाराष्ट्रात शिंदीपासून बनविलेल्या झाडूला शिराई म्हणतात. उभ्या उभ्या झाडता यावे यासाठीझटकणी असाही एक प्रकार यात आहे.
शिराई म्हणजे शिंदीच्या बनविलेला झाडू. शिंदीच्या पानांना लहान लहान सुयांच्या साहायाने छिनले जाते. या झुबक्यापासून प्रत्येक पानाच्या लहान लहान शिरा वेगळ्या केल्या जातात. या शिरांच्या चार-पाच पात्यांपासून तयार झालेला झाडू म्हणजे शिराई. हा उलगडताना गुंबाडे यांचे हात शिंदीच्या पात्यांवर झटपट चालत होते. त्यांची पत्नी, मुले, नातवंडे अन् ७० टक्के उंबरपाडा गाव दिवाळी जवळ आल्याने शिराईच्या कामात मग्न होता. गावचा व्यवसायच शिराई निर्मिती असल्याने या त्यांच्या व्यवसायाला धार्मिक महत्त्वही लाभले आहे. झाडू फक्त घराची स्वच्छतेसाठीच उपयोगी असतो, असे नाही तर दारिद्र दूर करण्यासाठीही तो उपयोगी असतो, असे आदिवासी बांधव मानतात. म्हणूनच तिला लक्ष्मीचे प्रतिकही मानले जाते. अगदी झाडू कुठे अन् कसा ठेवावा याबाबतही अनेक मान्यता आहेत अन् त्या आपल्या जीवनावर परिणाम करतात असेही ते सांगतात. म्हणूनच झाडूला पाय लाव नये, झाडू कसा, कुठे ठेवावा हेही ते सांगतात. दर आठवड्याला एक कुटुंब गावातून सुमारे १५०० हजार शिराई नाशिक शहरात पाठवतं. तर दिवाळीत पाच हजाराहून अधिक शिराई एका घरातून जात असल्याचे रोहिदास गवळी व लक्ष्मण डोळे सांगतात.
शिराई बनविण्यासाठी आवश्यक शिंदीच्या पानांसाठी आदिवासींना शहरातील सातपूर, बेळगाव ढगा, त्र्यंबक व आडगाव परिसरावर अवलंबून रहावे लागते. शिंदीची झाडे (ताड,शिंदी, भैरली, माड किंवा नारळी) कमी होऊ लागल्याने त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरही दिसू लागला आहे. महाराष्ट्रात शिंदीची झाडे नीरेसाठी सर्वसाधारणपणे उपयोगात आणली जातात. शिंदीची झाडे कमी झाल्यामुळे केरसुणी उद्योगावर संकट आले असून, मध्यप्रदेश व हैदराबादवरून आता झाडूचा शिरकाव होऊ लागल्याने पिढ्यांपिढ्या सुरू असलेला शिराईची श्रीमंती मागे पडेल की, काय अशी भीती आदिवासींमध्ये आहे. पेठ परिरासील झार्लीपाडा सारख्या शिराईचे परंपरागत पद्धतीने उत्पादन करणाऱ्या अनेक गावांमधील शिराईचा उद्योग बंद पडला असून, तो उंबरपाड्यातूनही हद्दपार होण्याची भीती आहे.
शिराईच्या श्रीमंतीवर पुढे जात असलेल्या उंबरपाडा आपली लोककला अन् संस्कृतीही जोपासताना दिसते. गावात आकर्षक लाकडी बांधणीचे हनुमान मंदिर अन् जागोजागी वीरगळ पहायला मिळतात. अगदी लहान वीरगळींना ते निरवाशीया चिरा म्हणतात. निरवाशीया म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पुढे वंश न चालल्यास त्याच्या निधनानंतर कुटुंबीय त्याच्या नावाने चीरा उभारून त्याची सणांना पुजा करतात. म्हणून त्याला निरवाशीया म्हटले जाते. शिमग्याला डोंगर देवाची पुजा व होळीचा पेठ यात्रेत सहभागी होण्याची परंपरा गावात आहे. धरणामुळे मासेमारी हा नवीन व्यवसाय आदिवासी बांधवाना मिळाला असला तरी शिराईची श्रीमंती हातातून जाईल का? याची भीती मात्र त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळते. आदिवासी पाड्यांवर व इतरत्र बहुपयोगी असलेल्या शिंदीच्या झाडांची लागवड वाढविल्यास याचा फायदा आदिवासींच्या पारंपरिक व्यवसायाला नक्की होऊ शकतो. आदिवासी कलागुण टिकवायचे असतील तर त्यांना आवश्यक पुरक गोष्टीचाही विचार होण्याची गरज आहे. तर लक्ष्मीपूजनचा आनंद त्यांच्या अन् आपल्यासाठी द्विगुणीत होईल.
अंतिम सुधारित : 7/18/2020
आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रम.
आदिवासी जीवनाची परंपरा आणि रूढी, त्यांची सांस्कृति...
नगर जिल्ह्यातील वाकी या आदिवासी गावात प्रभाताई फलक...
आदिवासी विकार विभाग