यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अवघे ८० किलोमिटर अंतर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दुर्मिळ प्राणी समजल्या जाणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या वाघांचे सहज दर्शन होऊ लागल्याने अभयारण्यात पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये टिपेश्वर अभयारण्याचा समावेश आहे. सन 1997 मध्ये अभयारण्य घोषित करण्याची अधिसुचना निघाली होती. केळापूर व घाटंजी तहसील अंतर्गत समाविष्ट असलेल्या या क्षेत्राची तिपाई देवीच्या नावावरून टिपेश्वर अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर तिपाईचे मंदीर आहे. या अभयारण्याचे क्षेत्र 14832 हेक्टर म्हणजे 148.64 चौरस किलोमिटर इतके आहे. अभयारण्य दक्षिणेस आंध्रप्रदेशच्या सिमेलगत अदिलाबाद जिल्ह्यास लागून असून डोंगरदऱ्यांनी व्यापले आहे तसेच जैवविविधतेने नटलेले आहे. राज्यातील वाघांच्या संरक्षणाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे अभयारण्य आहे.
गेल्यावेळी झालेल्या व्याघ्र गणनेनुसार अभयारण्यात दहा पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. परंतु यापेक्षाही जास्त वाघ असल्याचा अंदाज आहे. टिपेश्वर अभयारण्यात समावेश नसलेल्या परंतु अभयारण्यास लागून असलेल्या झरी तालुक्यातील घनदाट जंगलातही जवळपास नऊ वाघ आहेत. या वाघांचा मुक्त संचार अभयारण्याच्या जंगलात असल्याने येथे येणाऱ्या पर्यंटकांना हमखास वाघ दिसण्याची शक्यता असते.
वाघांसोबतच अस्वल, चांदी अस्वल, निलगाय, रोही, सांबर, चितळ, काळवीट, भेडकी, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, सायाळ, काळतोंड्या माकड, मसण्याउद, रानमांजर, खवले मांजर इत्यादी प्रकारचे प्राणीसुद्धा आहेत. याशिवाय मोर, निलकंठ, हरीयल, पोपट, गरूड, घार, गिधाड, ससाना, घुबड, तीतर, बटेर, देवचिमनी, पानकोंबडी इत्यादी प्रकारचे पक्षीही मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात.
टिपेश्वर अभयारण्यात प्रामुख्याने साग या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच निम, भुईनिम, बेल, वड, पिंपळ, बेहाळा, चंदन, पळस, खैर, धावडा, सालई, बाबुळ, आंजन, आवळा, चिंच, बोर, जांभुळ इत्यादी प्रकारच्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसात वाघांची संख्या वाढल्याने अभयारण्याला विशेष महत्त्व आले आहे. दरदिवशी अनेक पर्यटक टिपेश्वरला येत असून वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रोज वाघोबाचे दर्शन होत आहे.
टिपेश्वर अभयारण्यात टिपेश्वर हे वन विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाचे बांधकाम 1947 साली झाले होते. या विश्रामगृहात 3 मोगली हट व 2 व्हीआयपी सुट आहेत. वन विभागाचे राष्ट्रीय महामार्गावर सुन्ना येथे उजव्या बाजूस सुन्ना निर्वाचन केंद्र आहे. येथे पर्यटकांना राहण्यासाठी मोगली हट मध्ये स्वागत कक्ष 1 व 2 खोल्या आहेत. षटकोणी आकारामध्ये 2 खोल्या आहेत.
टिपेश्वर येथे वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी जावयाचे असल्यास पांढरकवडा येथून राष्ट्रीय महामार्ग 7 अदिलाबाद कडे जातांना डाव्या बाजूस सुन्ना गावाजवळून अभयारण्यात प्रवेश करता येतो. तसेच घांटजी व तेथून पारवा मार्गेसुद्धा टिपेश्वर अभयारण्यात जाता येते. दोनही मार्गाने साधारणत: 75 ते 80 किलोमिटर इतके अंतर आहे. सध्या वाघांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांनी या संधीचा लाभ घ्यावा व अभयारण्यास नक्की भेट द्यावी.
लेखक: मंगेश वरकड
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 7/12/2020
निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घ...
निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहावा या हेतूने महा...
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गा...
महाराष्ट्रातील रस्त्यांवर, रेल्वे, एसटीच्या स्थानक...