অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झीज आणि भर

झीज आणि भर

पृथ्वीचा भूभाग सरोवरातील शांत पाण्याच्या पृष्ठासारखा एकसारखा सपाट नाही; तो उंचसखल आहे. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या दृष्टीने हा उंचसखलपणा अगदीच क्षुद्र आहे.

पृथ्वीचा सरासरी व्यास १२,७३५ किमी., तिच्यावरील सर्वांत उंच पर्वतशिखर मौंट एव्हरेस्ट ८,८४७·६ मी. व सर्वांत खोल सागरी गर्ता मेअरीॲना ट्रेंच ११,०३५ मी. ही लक्षात घेतली आणि पृथ्वीचा नमुना म्हणून १ मी. व्यासाचा गोल बनविला, तर त्यावर वरील सर्वोच्च शिखर व सर्वात खोल गर्ता यांमधील फरक हा जेमतेम १·५ मिमी. म्हणजे या मजकुरातील अक्षरांच्या उंचीपेक्षाही थोडा कमीच भरेल. तथापि भूपृष्ठावर वावरणाऱ्या मानवाच्या दृष्टीने भूपृष्ठाचा उंचसखलपणा चांगलाच जाणवण्याजोगा आहे.

भूपृष्ठाचे उंचसखल स्वरूप सतत बदलते आहे. भूपृष्ठ अस्तित्वात आल्यापासून त्याच्या स्वरूपात सतत बदल होत आला आहे. आजही बदलाची ही प्रक्रिया चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे.

हा बदल घडवून आणणारी कारके दोन प्रकारची असतात : एक भूपृष्ठाच्या आतून, खालून कार्य करणारी आणि दुसरी त्याच्या बाहेरून त्याच्यावर कार्य करणारी. खालून कार्य करणारी कारके पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने किंवा भूपृष्ठ समांतर दिशेने कार्य करतात आणि त्यामुळे भूकवचाच्या खडकांचे वलीकरण, विभंग, ज्वालामुखी, भूकंप इ. आविष्कार झालेले दिसून येतात.

भूपृष्ठावर त्याच्या बाहेरून कार्य करणारी कारके त्याची काही ठिकाणी झीज घडवून आणतात, तर काही ठिकाणी ती त्यात भर घालतात. विदारण, वाहते पाणी, घसरते बर्फ, मुरलेले पाणी, समुद्राचे पाणी आणि वारा ही अशी बाह्यकारके आहेत. यांपैकी विदारणामुळे माती, दगड, गोटे, मोठमोठे शिलाखंड इ. रूपांत असणारा खडक फुटतो; त्याचे तुकडे किंवा चुरा, भुगा होतो. मृदा तयार होते. बाकीच्यामुळे हे तुकडे, चुरा इ. माल वाहून नेला जातो व वाटेत भूपृष्ठावर ती कारके व हा माल यांचे घर्षण होऊन भूपृष्ठ खरवडले, कोरले, झिजविले जाते; या प्रकारच्या कार्याला क्षरण म्हणतात. काही शास्त्रज्ञ विदारणाचाही अंतर्भाव क्षरणातच करतात.

विदारण

हे दोन प्रकारचे असते, कायिक आणि रासायनिक.

कायिक विदारण उष्णता, पाणी गोठणे, पाऊस, वारा, प्राणी इत्यादींमुळे घडून येते व रासायनिक विदारण खडकांची घटकद्रव्ये आणि वातावरण, पाणी इत्यादींची घटकद्रव्ये यांचे एकमेकांवर रासायनिक कार्य होऊन घडून येते.

कायिक विदारण

 

 

 

 

 

खडक फुटताना त्यांचे कणी विघटन (कणकण वेगळे होणे) होते, अपपर्णन (कांद्यासारखे पापुद्रे निघणे) होते, सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन खडकांचे मोठे ठोकळे अलग होतात किंवा त्यांचा विध्वंस होऊन त्यांचे अणकुचीदार व धारदार तुकडे तुकडे होतात. उष्णतेमुळे खडक तापतात व प्रसरण पावतात. ते निवले म्हणजे आकुंचन पावतात. आकुंचन-प्रसरणाची ही क्रिया वारंवार दीर्घकालपर्यंत होत राहिली म्हणजे खडकांच्या कणाकणांमध्ये ताण व दाब निर्माण होऊन अखेर खडक फुटतो.

आलटून पालटून तापण्यानिवण्यामुळे खडक फुटणे, त्याचे लहानमोठे तुकडे होणे व शेवटी त्यांची वाळू बनणे ही क्रिया विशेषतः उष्ण कटिबंधीय मरुप्रदेशांत–वाळवंटांत दिसून येते.

तेथे दिवसाच्या व रात्रीच्या तपमानांत मोठा फरक पडतो. खडकाचा बाहेरचा भाग आतल्या भागापेक्षा जास्त तापतो व निवतो, तसेच खडकाच्या घटकद्रव्यांचे प्रसरण-आकुंचनही कमीजास्त प्रमाणात होते. याचा परिणामही त्याच्या कणाकणांत ताण व दाब निर्माण होऊन तो फुटण्यात होतो. खडकाचे कण किंवा लहान मोठे तुकडे त्यापासून अलग होऊन त्याच्या पायथ्याशी साचतात आणि खडकाचा आतील नवीन पृष्ठभाग उघडा पडून त्यावर विदारणाची क्रिया चालू राहते.

खडक क्वार्टझाइट किंवा चुनखडक यांसारखा एकजिनसी असला, तर तो याप्रमाणे न फुटता त्यावर फुगवटी येते आणि तापल्यावर त्याचा पातळसा पापुद्रा सुटतो; अपपर्णन होते. खडकाचे कणी विघटन, गोलाकार किंवा कांदेपापुद्री विदारण इ. गोष्टी केवळ तापण्यानिवण्यामुळे होत नसून त्याला आर्द्रतेची जोड असावी लागते असे आता दिसून आले आहे; कारण भूपृष्ठापासून बऱ्याच खोलवर जेथे सूर्याची उष्णता पोहोचणे शक्य नाही, तेथेही हे प्रकार घडलेले दिसून आले आहेत.

पाणी गोठणे

काही वेळा विशेषतः थंड हवेच्या प्रदेशांत, खडकांच्या भेगांत किंवा जमिनीच्या कणाकणांच्या दरम्यानच्या जागेत शिरलेले पाणी गोठते. गोठणारे पाणी जास्त जागा व्यापते. त्यामुळे भेगेच्या बाजूंवर किंवा मातीच्या कणांवर मोठा दाब पडतो. त्यामुळे भेगा रुंदावतात, जमीन भेगाळते व अखेर खडक फुटतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate