অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औरंगाबाद शहर

औरंगाबाद शहर

औरंगाबाद शहर

महाराष्ट्रातील जिल्ह्याचे व मराठवाडा विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या कँटोनमेंटसह १,६५,२५३ (१९७१). गोदावरीची उपनदी खाम हिच्या उजव्या तीरावर हे वसले असून मनमाड - हैदराबाद मीटरमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. हे पुण्याच्या २३० किमी. आणि अहमदनगरच्या १०९ किमी. ईशान्येस असून मोटारवाहतुकीचे केंद्र आहे. येथून नऊ किमी.वर चिकलठाणा येथे विमानतळ आहे. शहरात सुती व रेशमी कापडाच्या गिरण्या असून कापडावरील पारंपरिक ‘हिमरू’ आणि किनखाबाच्या कामासाठी औरंगाबाद प्रसिध्द आहे; याशिवाय येथे यंत्रे, कातडीकाम, भांडी, धातूच्या वस्तू इत्यादींचे कारखाने आहेत. जिल्ह्यातील शेतमालाची ही व्यापारपेठ असून सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत मराठवाड्यात अग्रेसर आहे. मराठवाडा विद्यापीठ येथेच असून अनेक महाविद्यालये व तंत्रसंस्था येथे आहेत. अजिंठा-वेरूळच्या भेटीकरिता जगभरचे प्रवासी औरंगाबादला येत असल्याने पर्यटनकेंद्र म्हणून औरंगाबादची ख्याती आहे. औरंगाबादच्या परिसरात अनेक जुन्या ऐतिहासिक वास्तू असल्या तरी औरंगाबादची स्थापना १६०४ मध्ये मलिक अंबरने केली; निजामशाहीच्या या प्रधानाने मोगलांचा येथेच पराभव केल्याने त्याने हे गाव वसविले. मूळच्या खडकीचे पुढे औरंगजेबने औरंगाबाद बनविले. मोगलांकडून हैदराबादच्या निजामाकडे आल्यानंतर मराठवाड्याचे सांस्कृतिक केंद्र म्हणून हे ओळखले जाऊ लागले आणि राज्यपुनर्रचनेनंतर हे महाराष्ट्रात आल्यावरही त्याचे स्थान तेच राहिले आहे. शासकीय कार्यालये व इतर अत्याधुनिक वास्तूंबरोबरच शहरातील काही जुन्या वास्तू प्रवाशांची आकर्षणे आहेत. त्यांपैकी मलिक अंबर कालीन व नंतरही शहराला पाणीपुरवठा करणारा नहरे अंबरी, भव्य पाणचक्की, औरंगजेब दरबार भरवीत असे तो किल्ला, जामे मशीद व इतर मशीदी, औरंगजेबाची राणी रबिया दौरानी हिच्या स्मरणार्थ प्रतिताजमहाल स्वरूपाचा, औरंगजेबाच्या मुलाने बांधलेला बिबिका मकबरा आणि त्याजवळच असलेल्या औरंगाबाद गुंफा सुप्रसिध्द आहेत. दुसऱ्या ते सातव्या शतकांत खोदलेल्या या तेरा गुंफांत अजिंठा-वेरूळ येथील सहजता प्रमाणबध्दता व सौंदर्य तसेच गुप्त-चालुक्यकालीन शिल्पाकृतींतील सौष्ठव आढळत नाही; तथापि भव्यता आणि एकंदर डामडौल यांमुळे त्यांना महत्त्व आले आहे. औरंगाबादसभोवातलच्या दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर, वेरूळ, खुल्दाबाद, अजिंठा इत्यादींच्या पर्यटनासाठी औरंगाबाद येथे सर्व सोयी आहेत. (चित्रपत्र ४).

 

शाह, र. रू.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate