कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ८७,७३१ (१९७१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस, पंचगंगेच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी हातमाग उद्योगधंद्यामुळे पुढे आली. येथील हातमाग व यंत्रमागावरील पातळे, धोतरे व वस्त्रे प्रसिद्ध असून त्यांशिवाय येथे साखर, तेल, यंत्रे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. येथे ३०–३५ हजार यंत्रमाग असून येथील साठ टक्क्यांवर लोक हातमागधंद्यावर अवलंबून आहेत. तंबाखू, शेंग, गूळ इत्यादींची ही बाजारपेठ असून शिक्षणक्षेत्रातही पुढे आहे.
लेखक : गो. श्री. कुलकर्णी
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/22/2020