অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नमलई

अन्नमलई

अन्नमलई

सह्याद्रीचा दक्षिणेकडील फाटा. पालघाट खिंडीनंतर सह्याद्रीची एक रांग दक्षिणेकडे सुरू होते. तिलाच ‘दक्षिणघाट’ म्हणतात. या दक्षिणघाटाच्या अनाईमुडी शिखरापासून ईशान्येला पलनी, दक्षिणेला एलामई ऊर्फ कार्डंमम व उत्तरेला अन्नमलई नावाच्या पर्वतश्रेणी पसरल्या आहेत.

अन्नमलई पर्वतश्रेणी तमिळनाडूतील कोईमतूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे व केरळच्या पालघाट, त्रिचूर व एर्नाकुलम् जिल्ह्यांच्या पूर्वेस असून उ. अक्षांश १०°१५' ते १०°३१' व पू. रेखांश ७६°५१' ते ७७° २०' या दरम्यान पसरलेली आहे.

अन्नमलई–अनाइमलई–म्हणजे ‘हत्तींचा डोंगर’.

हा नाइस खडकांचा बनलेला असून येथे फेल्स्पार व स्फटिक आढळतात. अतिउंच पर्वतराजीचे पठार सरासरी २,१३३ मी. उंच असून त्यावर अनाईमुडी (२,६९५मी.), अक्का व तंगची ही शिखरे आहेत. हे पठार उंचसखल असून तुटलेल्या कड्यांनी व घनदाट जंगलांनी व्याप्त आहे. येथील हवा निलगिरीप्रमाणेच असून दऱ्‍यातील सृष्टिशोभा अतिशय नयनमनोहर आहे. उत्तम प्रतीचे सागवानी लाकूड येथे मिळते.

हत्तींच्या साहाय्याने व नदी-नाल्यांतून हे लाकूड सखल भागात आणण्यात येते. येथील अरण्यात रानहेला, सांबर, वाघ, चित्ता, अस्वल, हत्ती इ. वन्यप्राणी आढळतात. मुथुवन, पुलयन, काडन व मलसर या आदिवासी जमाती येथे राहतात. अन्नमलईच्या कमी उंचीच्या –सु. ९००–१,३००मी. – प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉफीचे मळे आहेत.

 

जोशी, चंद्रहास

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate