येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) आहेत. त्यांतील ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे असून बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० चैत्य आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हे हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ.स.पू. २ रे शतक ते इ.स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते, की ती ⇨वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकीर्दीत (सु. ४७५-५००) कोरली गेली असावीत. हीनयान पंथाच्या लेण्यांची स्थापत्यशैली आधीची वाटते. यांपैकी ९ व्या व १० व्या चैत्यगृहांच आलेख गजपृष्ठाकृती आहेत आणि मंडपाच्या चापाकार बाजूंत स्तूप कोरलेला आहे. या कालखंडातील विहारांत खांब नाहीत. फक्त यांत तिन्ही बाजूंना भिक्षूंना राहण्यासाठी खोल्या खोदलेल्या आहेत. या समूहातील लेण्यांत दहावे लेणे सर्वांत प्राचीन आहे. त्यात बुद्धप्रतिमा नाही. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी यूआन-च्वांग अजिंठ्यास जरी येऊन गेला नाही, तरी त्याने या लेण्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. एका विहारातील कोरलेल्या भव्य हत्तीची उल्लेख करून तो अचल ह्या पश्चिम भारतातील भिक्षूने बांधला, असे त्याने नमूद करून ठेवले आहे. २६ व्या लेण्यांतील शिलालेख, हे शैलगृह आचार्य अचल ह्याचे आहे, असे सांगतो.
इतर शैलगृहांप्रमाणे अजिंठ्याची शैलगृहे त्यांतील वास्तुकलेसाठी आणि मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असली, तरी येथील लेणी मुख्यत्वे चित्रकलेकरिता प्रख्यात आहेत. चित्रे काढण्यासाठी भिंतींवर प्रथम माती, शेण, भाताचा भुस्सा किंवा ताग आणि तूस ह्यांच्या वस्त्रगाळ मिश्रणाचा गिलावा चढवीत आणि त्यावर चुन्याचा एक हलका हात मारून किंवा संदलाचा चकचकीत पातळ थर चढवून त्यावर गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात क्रमाक्रमाने रंग भरीत. अजिंठ्याच्या चित्रकारांनी मुख्यतः पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा आणि निळा हे रंग आपल्या चित्रकलेत वापरले आहेत. यांपैकी पुष्कळसे रंग नैसर्गिक पदार्थांपासून केलेले आहेत व अशी मूलरंगद्रव्ये अजिंठ्याजवळच सापडतात. लाखेपासून केलेल्या कार्बनी तांबड्या रंगासारखे काही उडणारे रंगही वापरले असावेत; कारण काही चित्रांतील मानवी आकृतींच्या ओठांवरील लाल रंग नाहीसा झालेला दिसतो. फक्त निळा रंग (लाजवर्दी) तेवढा आयात केलेला असावा. सरसाचा रंगबंधक म्हणून बहुधा वापर केलेला असावा. भित्तिचित्रांशिवाय मूर्तिकामही रंगविलेले असावे. कारण अशा कामाचे अवशेष आजही आढळतात.
चित्रप्रसंग बव्हंशी जातकादी ग्रंथांतील बुद्धाच्या कथांतून निवडलेले आहेत. याशिवाय बौद्ध धर्मग्रंथांतून वर्णिलेल्या काही देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आणि निरनिराळे प्राणी यांचीही चित्रे आहेत. छतांवर आणि स्तंभांवर वेलबुट्टीचे अप्रतिम नमुने चितारलेले आढळून येतात. अजिंठ्याच्या स्त्रियांच्या चित्राकृती अगदी अपूर्व आहेत. गौरवर्णा आणि श्यामा, मुग्धा, अर्धस्फुटिता, प्रौढा आणि कुमारिका, सुस्तनी आणि पृथुल नितंबिनी अशा, आभूषणे धारण करणाऱ्या, विविध स्त्रिया चित्रकारांनी इथे मूर्त केल्या आहेत. काही लेणी अपूर्ण आहेत व काही पडझड झाल्यामुळे खराब झाली आहेत. सुस्थितीत असलेली लेण्यांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत
याचा आलेख चतुष्कोनी असून गर्भगृहात बुद्धाची प्रतिमा कोरलेली आहे. ओवरीच्या स्तंभावर अप्रतिम नक्षीकाम आहे. मंडपाच्या तिन्ही बाजूंस भिक्षूंकरिता खोल्या खोदलेल्या असून मंडपाच्या भिंतींवर चित्रे आहेत. ही चित्रे जातकादी कथांतील असून त्यांतील पद्मपाणीचे चित्र प्राचीन भारतीय चित्रकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना समजले जाते. येथील श्यामल वर्णाची राजकन्या आणि अप्सराही आकर्षक आहे. दुसऱ्या एका लहान चित्रात एक इराणी व्यक्ती सुरापान करीत असल्याचे दर्शविले असून काही विद्वानांच्या मते ती व्यक्ती इराणचा राजा दुसरा खुश्रु आणि त्याच्या शेजारी बसलेली स्त्री ही त्याची राणी शिरीन असावी. मात्र हे मत सर्वमान्य नाही. आणखी एका चित्रात दरबारातील दृश्य असून त्यात राजा काही परकीयांचे स्वागत करीत आहे, असे दृश्य आहे. हा राजा चालुक्य नृपती दुसरा पुलकेशी असावा व तो दुसऱ्या खुश्रूच्या दूतवासींचे स्वागत करीत आहे, असे काही विद्वानांचे मत आहे. तथापि तेही मत सर्वमान्य नाही. ह्या लेण्यातील गर्भगृहातील बुद्धाचे एक शिल्प वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात बुद्धाचे स्मित, विषाद आणि ध्यान असे तीन स्पष्ट भाव विभिन्न कोनांतून पाहिले असता दिसतात. ह्याशिवाय लेण्याच्या मागील बाजूस असणाऱ्या पडवीच्या स्तंभावर एक मुख व चार धडे असणाऱ्या हरिणाचे चमत्कृतिपूर्ण शिल्प आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020