অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हर्जिन बेटे

व्हर्जिन बेटे

वेस्ट इंडीज बेटांपैकी कॅरिबियन समुद्र व अटलांटिक महासागर या दरम्यानचा सु. शंभरांवर लहानलहान बेटांचा समूह. ग्रेटर अँटिलीसचा अगदी पूर्वेकडील, तर लेसर अँटिलीसचा अगदी पश्चिमेकडील भाग व्हर्जिन बेटांनी व्यापला आहे. प्वेर्त रीकोच्या पूर्वेस सु. ६४ किमी. पासून ९७ किमी. पर्यंत यांचा विस्तार झालेला आहे. राजकीयदृष्ट्या संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे (पूर्वीची डॅनिश वेस्ट इंडीज बेटे) व ब्रिटिश व्हर्जिन बेटे अशा दोन गटांत ही विभागली आहेत.

या बेटांची निर्मिती प्रामुख्याने ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे. भूशास्त्रीयदृष्ट्या ह्या बेटांचे साधर्म्य प्वेर्त रीको व ग्रेटर अँटिलीस बेटांशी दिसते. ही बेटे म्हणजे ग्रेटर अँटिलीस व प्वेर्त रीकोवरील मध्यवर्ती प्रस्तरभंगयुक्त ठोकळ्याच्या पर्वतांचे विस्तारित असे जलमग्न माथे आहेत. ऍनेगाडा खाडीमुळे ही बेटे लेसर अँटिलीसपासून अलग झाली आहेत. घडीयुक्त गाळाचे खडक, रूपांतरित व अग्निजन्य खडक यांपासून यांची भूस्तररचना बनलेली आहे. काही ठिकाणी चुनखडक व गाळाच्या मृदेचे आच्छादन आढळते.

ही बेटे बरीच डोंगराळ व खडबडीत असून अनेक ठिकाणी त्यांची उंची ४९० मी. पर्यंत वाढत गेलेली आहे. टॉर्टोल बेटावरील मौंट सॅग (उंची ५४३ मी.) हे व्हर्जिन बेटांमधील सर्वोच्च ठिकाणी आहे. पर्वत, प्रवाळ खडकयुक्त खाजण, रोधक पुळणी व भूवेष्टित बंदरे अशी विविध प्रकारची भूमिस्वरूपे येथे आढळतात. बेटांवर कधीकधी भूकंपाचे सौम्य धक्के बसतात. सेंट क्रोई बेटाचा अपवाद वगळता कोणत्याही दोन बेटांमधील अंतर पाच किमी.पेक्षा अधिक नाही.

व्हर्जिन बेटांवर अनेक सुंदर पुळणी आहेत. काही ठिकाणी त्या प्रवाळ खडकांनी वेढलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी अतिशय मनोवेधन खडक-रचना निर्माण झालेली आढळते. उदा., व्हर्जिन गॉर्द बेटावरील बाथ हे ठिकाण. तेथे पाण्याच्या घर्षणाने वाटोळे व सुटे झालेले मोठे दगड असून त्यांत प्रचंड गुहा निर्माण झाल्या आहेत. फॉलन जेरूसलेमवर दगडाच्या मोठमोठ्या चिपा असून त्या पाषाणरूपी शहराचे अवशेष वाटतात. सर फ्रान्सिस ड्रेक चॅनेलमुळे मोठी व्हर्जिन बेटे; लहान बेटे व द्वीपकांच्या रांगेपासून अलग झाली आहेत.

चॅनेलचा हा भाग खोल वाहतूकयोग्य असून सर फ्रान्सिस ड्रेक याने याचा वापर केला होता. व्हर्जिन बेटांचे हवामान उष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. परंतु ईशान्य व्यापारी वाऱ्यांनी तापमानाची तीव्रता कमी केली जात असल्यामुळे वर्षभर हवामान सम, आल्हाददायक व आरोग्यवर्धक राहते. येथील पर्यटन उद्योगाच्या विकासातील हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. येथील सरासरी तापमान हिवाळ्यात २१ अंश ते २९ अंश सें., तर उन्हाळ्यात २४ अंश ते ३१ अंश से. यांदरम्यान राहते.

वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० ते १५० सेंमी. असते. पाऊस प्रामुख्याने सप्टेंबर ते डिसेंबर या काळात पडतो. अवर्षणाची स्थिती नेहमीच निर्माण होते. ऑगस्ट ते ऑक्टोबर यांदरम्यान कधीकधी हरिकेन वादळांचा तडाखा या बेटांना बसतो. पाणीपुरवठा पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा साठा करून ठेवला जातो.

सुरुवातीच्या काळात पिकांच्या लागवडीसाठी उष्ण कटिबंधीय अरण्ये तोडण्यात आली. प्राणिजीवनही विरळ असून काही प्रमाणात हरणे व रानडुकरे आढळतात. बेटांवर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची खनिजसंपत्ती नाही. सभोवतालच्या सागरभागात प्रवाळ, स्पंज व तेजस्वी विविधरंगी मासे आढळतात. येथे सु.६५० प्रकारचे शिंपले सापडतात.

व्हर्जिन बेटांवर सुरुवातीला आरावाक या अमेरिकन इंडियानांनी वस्ती केलेली असावी. कोलंबसाने १४९३ मध्ये व्हर्जिन बेटांचा शोध लावला. तो येथील सेंट क्रोई बेटावर उतरला असता, त्याला तेथे शूर कॅरिब इंडियानांची वस्ती आढळली. त्याच्या सफरीतील लोकांचा कॅरिब जमातींशी झगडाही झाला. त्यांनीच आरावाक इंडियानांना हुसकावून लावलेले असावे.

या भागात अनेक बेटे असल्यामुळे त्या प्रत्येकाला वेगवेगळे नाव देणे अव्यवहार्य वाटल्याने ‘‘सेंट अर्स्यूल अँड द इलेव्हन थाऊंजड व्हर्जिन्स’’ या दंतकथेनुसार व त्या स्वधर्मवीरांच्या स्मरणार्थ बेटांच्या या समूहाला कोलंबसाने ‘व्हर्जिन’ असे नाव दिले व त्यांवर स्पेनचा हक्क सांगितला.

स्पेनचा सम्राट पाचवा चार्ल्स याने १५५५ मध्ये पाठविलेल्या स्पॅनिश सफरीने कॅरिब लोकांचा पाडावा करून या बेटांवर स्पेनचा हक्क प्रस्थापित केला. १५९६ पर्यंत स्पॅनिशांनी बहुतांश कॅरिब लोकांना तेथून पळवून लावले किंवा ठार मारले. सुमारे दोन शतके ही बेटे म्हणजे चाचेगिरी करणाऱ्यांचे केंद्रस्थान होते. त्यामुळे यांतील काही बेटांना चाचांचीच नावे दिलेली आढळतात. उदा., डेड चेस्ट, कूपर आयलंड, नॉर्मन आयलंड, योस्ट व्हॅन डाइक इत्यादी.

या बेटांवर फार मोठ्या प्रमाणावर गुप्तधन असल्याचे मानले जाते. १६५० मध्ये स्पॅनिशांनी ब्रिटिश वसाहतकारांना हुसकावून लावले. परंतु त्यानंतर त्याच वर्षी या बेटांचा ताबा फ्रेंचांनी घेतला. त्यांनी १६५३ मध्ये यांतील सेंट क्रोई बेट मॉल्टाच्या सरदाराला स्वेच्छेने प्रदान केले. परंतु त्याने ते बेट फ्रेंच वेस्ट इंडिया कंपनीला विकले. डच चाचांनी टॉर्टोल बेटावर आपले बस्तान बसविले. परंतु इंग्रज मळेवाल्यांनी १६६६ मध्ये त्यांना हुसकावून लावले व ब्रिटिश प्रशासनाखाली असलेल्या लीवर्ड बेटांना टॉर्टोल जोडण्यात आले. तथापि डेन्मार्कने सेंट टॉमस व सेंट जॉन बेटांवर हक्क सांगितला.

डेन लोकांनी सुरुवातीला शिक्षा झालेल्या गुन्हेगारांच्या साहाय्याने, तर १६७३ नंतर आफ्रिकन गुलामांच्या साहाय्याने येथे ऊस उत्पादनास सुरुवात केली. आफ्रिकेतून आणले जाणारे गुलाम, युरोपला पाठविली जाणारी रम व मळी आणि युरोपकडून या बेटांकडे आणल्या जाणाऱ्या विविध वस्तू असा तिहेरी व्यापार येथे वाढीस लागला. सेंट टॉमस हे कॅरिबियन समुद्रातील गुलामांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात साखरउद्योगाचे महत्त्व कमी होऊ लागले. त्याच दरम्यान गुलामांची दोन बंडे झाली. त्यामुळे मळ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. १८४८ मध्ये येथील गुलामगिरी संपुष्टात आली.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात व्हर्जिन बेटे दोन गटांत विभागली गेली. त्यांपैकी पूर्वेकडील गट ‘ब्रिटिश व्हर्जिन बेटे’ म्हणून तर पश्चिमेकडील गट ‘अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ब्रिटिश चाचांनी डच वसाहतकऱ्यांकडून पूर्वेकडील बेटे बळकावून त्यांवर ग्रेट ब्रिटनचा हक्क सांगितला. ब्रिटिश राजवटीत सुरुवातीपासूनच ‘लीवर्ड आयलंड्स कॉलनी’ चा एक भाग म्हणून ही बेटे राहिली. १९५६ मध्ये मात्र ही कॉलनी संपुष्टात आल्यानंतर व्हर्जिन बेटे हा ग्रेट ब्रिटनचा स्वतंत्र आश्रित प्रदेश म्हणून राहिला.

या भागात लष्करी तळ उभारण्याचा जर्मनीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संयुक्त संस्थानांनी डेन्मार्ककडून पश्चिमेकडील व्हर्जिन बेटे खरेदी करण्याची बोलणी सुरू केली (१८६७). ऍनेगाडा खाडीवर या बेटांचा हक्क येत असल्याने आणि या खाडीमार्गे अटलांटिकमधून कॅरिबियनमध्ये येऊन पुढे पनामा कालव्याकडे जाता येत असल्यामुळे ही मोक्याची बेटे संयुक्त संस्थानांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १९१७ मध्ये २५ लक्ष डॉलरला संयुक्त संस्थानांनी ही बेटे खरेदी केली. तीच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे होत.

व्हर्जिन बेटांवरील लोक प्रामुख्याने कृष्णवर्णीय असून पळून आलेल्या व मुक्त झालेल्या गुलामांचे ते वंशज आहेत. गरीब, श्वेतवर्णीय समाजातीलही काही लोक येथे आढळतात. सेंट टॉमस बेटावर फ्रेंचांचे वंशज अधिक आहेत. अलीकडच्या काळात विश्राम करण्यासाठी तसेच पर्यटन उद्योगाशी निगडित व्यवसाय चालविण्यासाठी अनेक सधन गोरे लोकही येथे वास्तव्यास आलेले आहेत. व्हर्जिन बेटांवरील लोकांची प्रमुख भाषा इंग्रजी आहे. ब्रिटिश व्हर्जिन बेटे अधिकृतरीत्या स्टर्लिंग प्रदेशात येत असली, तरी दोन्ही समूहांतील बेटांवर अमेरिकी डॉलर हे चलन वापरले जाते.

संयुक्त संस्थानांची व्हर्जिन बेटे

ग्रेटर अँटिलीसच्या पूर्व टोकाशी व प्वेर्त रीकोपासून पूर्वेस ६४ किमी. वर असलेल्या संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांमध्ये सेंट टॉमस, सेंट जॉन व सेंट क्रोई या प्रमुख तीन बेटांचा व सु. ५० लहान बेटांचा व द्वीपकांचा समावेश होतो. यांतील सेंट टॉमस व सेंट जॉन ही बेटे खूपच ओबडधोबड आहेत. वेस्ट इंडीजमधील लेसर अँटिलीस या एका मोठ्या द्वीपमालिकेचा अगदी पश्चिमेकडील काही भाग संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांनी व्यापला आहे. नॅरोझ या चॅनेलमुळे ही बेटे ब्रिटिश व्हर्जिन बेटांपासून अलग झालेली आहेत. यांतील काही बेटांवर फारच कमी वस्ती आहे, तर काही बेटांवर वस्तीच नाही. या बेटांचे एकूण क्षेत्रफळ १,९१० चौ. किमी, असून त्यांपैकी ३५२ चौ. किमी. कोरडी भूमी आहे. येथील एकूण लोकसंख्या १,०१,८०९ (१९९०) होती.

सेंट टॉमस बेटावरील शार्लट अमाल्य (लोकसंख्या १२,३३१ – १९९०) हे या बेटांच्या राजधानीचे ठिकाण आहे.

सेंट टॉमस बेट

संयुक्त संस्थानांच्या व्हर्जिन बेटांमधील हे सर्वांत पश्चिमेकडील बेट आहे. याचे क्षेत्रफळ ८३ चौ. किमी. व लोकसंख्या ४८,१६६ (१९९०) होती. १६६५ मध्ये डेन लोकांनी यावर वस्ती केली. तत्पूर्वी ब्रिटिश व फ्रेंच वसाहतकार येथे शेती करीत होते. शार्लट अमाल्य ही येथील एक सुंदर जुनी नगरी तसेच एक प्रमुख नैसर्गिक सागरी बंदर आहे. एके काळी हे एक प्रमुख कॅरिबियन बंदर होते. पर्यटकांसाठीच्या विविध सुविधा येथे आहेत.

सेंट क्रोई बेट

मुख्य द्वीपसमूहाच्या दक्षिणेस सु. ४८ किमी. वर हे बेट आहे. हे या समूहातील सर्वांत मोठे बेट असून त्याचे क्षेत्रफळ २१८ चौ. किमी. व लोकसंख्या ५०,१३९ (१९९०) होती. बेटाची कमाल उंची मौंट ईगल (३५५ मी.) येथे आहे. फ्रेंच मॉल्टाचा सरदार, डच, ब्रिटिश व डेन यांच्या सत्ता यावर होऊन गेल्या. क्रिश्चनस्टेड (लोकसंख्या २,५५५ –१९९०) हे या बेटावरील प्रमुख गाव आहे. त्याच्या किनारी भागात डॅनिश वास्तुशिल्प व दगडी इमारती असून राष्ट्रीय स्मारक म्हणून त्यांचे जतन केलेले आहे. फ्रेडरिकस्टेड (लोकसंख्या १,०६४ – १९९०) हे दुसरे महत्त्वाचे बंदर आहे.

सेंट जॉन बेट

सेंट टॉमस बेटाच्या पूर्वेस पाच किमी. वर सेंट जॉन बेट आहे. त्याचे क्षेत्रफळ ५२ चौ. किमी. व लोकसंख्या ३,५०४ (१९९०) आहे. बेटाची कमाल उंची बॉर्दो मौंटन (३८९ मी.) येथे आहे. बेटाचा सु. तीन-चतुर्थांश भाग राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. तसेच किनारी भागातील विस्तृत सागरी प्रदेशाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. बेटावरील नैसर्गिक सृष्टिसौंदर्य, वन्यजीवन, सागरी सृष्टिसौंदर्य, ऐतिहासिकदृष्ट्या प्रेक्षणीय स्थळे इत्यादींचे संवर्धन करणे, हा त्यामागील उद्देश आहे. संघीय शासनाकडून त्याचे प्रशासन पाहिले जाते. आग्नेय किनाऱ्यावरील कोरल हार्बर हे या विभागातील अतिशय सुरक्षित असे बंदर आहे. किनाऱ्यावर आकर्षक अशी प्रवाळ खडकरचना निर्माण झालेली आढळते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate