অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यू फाउंडलंड बेट

न्यू फाउंडलंड बेट

कॅनडाच्या अगदी पूर्वेकडील न्यू फाउंडलंड प्रांताचा, उत्तरेकडील लॅब्रॅडॉर विभाग सोडून दक्षिणेकडील द्वीपरूप विभाग. क्षेत्रफळ १,१२,३०० चौ. किमी. त्यापैंकी सु. १३,८३६ चौ. किमी. पाण्याखाली लोकसंख्या ४,९३,९३९ (१९७१). विस्तार ४६°३६ उ. ते ५१° ३९′ उ. अक्षांश आणि ५२°३२′ प. ते ५९°२७ प. रेखांश यांदरम्यान.

हे बेट सर्वसामान्यपणे त्रिकोणाकृती असून याच्या दक्षिणेस व पूर्वेस अटलांटिक महासागर, ईशान्येस त्याचे बेल हे बेट, उत्तरेस बेल बेट सामुद्रधुनी व त्यापलीकडे प्रांताचा लॅब्रॅडॉर विभाग, पश्चिमेस विस्तृत सेंट लॉरेन्सचे आखात व नैर्ऋत्येस कॅबट सामुद्रधुनी आहे.

किनाऱ्याजवळची ग्रे, फोगू, मीरशीन, सेंट जॉन व इतर अनेक बेटे यातच समाविष्ट आहेत. दक्षिणेकडील सेंट पीएर व मिकलॉन ही बेटे मात्र फ्रान्सची आहेत. अटलांटिकच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे बेट मोक्याच्या जागी असून, यूरोप व अमेरिका यांमधील वाहतूक व संदेशवहन या दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. सेंट जॉन्स ही याची राजधानी आहे.

भूवर्णन

न्यू फाउंडलंड बेट उत्तर अमेरिकेच्या अ‍ॅपालॅचिअन या भूशास्त्रीय विभागातच मोडते. उत्तरेकडील ग्रेट नॉर्दर्न, दक्षिणेकडील ब्युरिन व आग्नेयीकडील अ‍ॅव्हलॉन या द्वीपकल्पांनी बनलेल्या सु. ३०० मी. उंचीच्या या ऊर्मिला पठारी प्रदेशाचा सर्वसामान्य उतार व ग्रेट नॉर्दर्न द्वीपकल्पातील लाँग रेंज पर्वताची दिशा नैर्ऋत्य–ईशान्य अशीच आहे. लाँग रेंज पर्वताची सरासरी उंची ७६० मी. असून त्याचे सर्वोच्च शिखर ग्रो मॉर्न ८०८ मी. उंच आहे.

याचा पुष्कळसा प्रदेश कॅब्रियनपूर्व कठीण खडकांचा असून, येथील शेकडो लहानमोठी सरोवरे, दलदली, पंकिल खळगे आणि यू आकाराच्या दऱ्या यांवरून याचे हिमक्षयित स्वरूप समजते. पूर्वीच्या प्रायः समतल प्रदेशाचे अवशेष सु. ६७० मी. उंचीवर दिसून येतात. ग्रँड, रेड इंडियन, सँडी, गँडर ही सरोवरे मोठी आहेत. बेटाचा किनारा अत्यंत दंतुर व दीर्घ आहे.

पश्चिम किनाऱ्यापासून भूमी एकदम उंचावत जाते. किनारी प्रदेशाच्या निमज्‍जनामुळे प्लासेंशा, फॉर्चून, सेंट जॉर्जेस, बॉन, सेंट जॉन, व्हाइट, नोत्रदाम, बॉनव्हिस्ता, ट्रिनिटी, कन्सेप्शन, सेंट मेरीज, बे ऑफ आयलंड्स इ. अनेक आखाते, उपसागर व किनारी बेटे निर्माण झाली आहेत. किनारपट्ट्या डोंगराळ आणि उंचसखल आहेत.

बेटाभोवती बराच विस्तृत समुद्रबूड जमिनीचा प्रदेश असून तेथील ग्रँड बँक्स हा उथळ समुद्रप्रदेश मासेमारीसाठी जगद्विख्यात आहे. पश्चिमवाहिनी हंबर आणि पूर्ववाहिनी एक्स्‌‌प्लॉइट्स, गँडर, टेरा नोव्हा या येथील प्रमुख नद्या आहेत. या नद्या व इतर अनेक प्रवाह जलविद्युत्‌निर्मितीस उपयुक्त आहेत.

हवामान

अक्षांश, लॅब्रॅडॉरचा थंड सागरी प्रवाह व प्रदेशाचे पठारी स्वरूप यांमुळे हवा थंड आणि खंडीय प्रभावाची आढळते. भोवतीचा बराच सागरी भाग हिवाळ्यात गोठलेला, तर उन्हाळ्यात हिमगिरी व धुके यांनी युक्त असून थंड प्रवाहामुळे उन्हाळा फारसा जाणवतच नाही. जानेवारीत उत्तरेस तपमान –९° से. व दक्षिणेस –४°से. आणि जुलैमध्ये उत्तरेस सु. १२° से. व दक्षिणेस सु. १४° से. असते. वृष्टी दक्षिणेकडे १५० सेंमी. पासून उत्तरेकडे ७५ सेंमी.पर्यंत आढळते.

दक्षिणेस २०० सेंमी. व उत्तरेस ३०० सेंमी. जाडीचा थर होईल इतका हिमवर्षाव होतो. उत्तरेकडील समुद्रभाग वर्षातून पाच महिने गोठलेले असतात. फक्त अतिदक्षिणेकडील सागरी भाग मात्र कधीच गोठत नाहीत.

कॅनडाच्या मुख्य भूमीवरून येणाऱ्या मध्यअक्षांशीय वादळांचा येथील हवामानावर बराच परिणाम होतो. त्याच्या दक्षिण भागात ओढली जाणारी गरम हवा दक्षिणेकडील प्रदेशात जास्त पाऊस पाडण्यास साहाय्यक होते. वादळांपूर्वी पूर्वेकडून व ईशान्येकडून लॅब्रॅडॉर प्रवाहावरून येणारे वारे किनारी भागातील उन्हाळा अधिक सौम्य करतात. वादळांनंतर वायव्येकडून आर्क्टिकची थंड हवा आणणारे वारे अक्षांश व समुद्रसान्निध्य यांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात.

दक्षिणेकडील व आग्नेयीकडील समुद्रावर गल्फ प्रवाहावरील उबदार हवा व लॅब्रॅडॉर प्रवाहावरील थंड हवा एकत्र मिसळल्यामुळे धुके निर्माण होते व त्यामुळे थंड प्रवाहाबरोबर येणाऱ्या हिमगिरींमुळे मासेमारी व वाहतूक या व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होतो.

वनस्पती

निम्म्याहून अधिक भाग वनाच्छादित आहे. जंगले प्रामुख्याने सूचिपर्णी वृक्षांची आहेत. येथील अरण्यात कॅनडा बाल्सम फर, व्हाइट स्प्रूस, ब्लॅक स्प्रूस, व्हाइट व यलो बर्च ही झाडे व अनेक कठीण लाकडाची झुडुपे व फळझाडे प्रामुख्याने आढळतात. बहुतेक जंगले गँडर व एक्स्‌‌प्लॉइट्स नद्यांच्या खोऱ्यांत आहेत. यांशिवाय इतरत्र शेवाळे भरपूर आढळते. आगी लागणे व त्यानंतरचे क्षरण यांमुळे काही भाग उजाड झाला आहे.

बेटावर वन्य प्राणी आणि जलचर विपुल आहेत. बीव्हर, कस्तुरी उंदीर, खोकड, लिंक्स व ऑटर हे प्रमुख फरधारी प्राणी उत्तरेकडील जंगलांत आढळतात. यांशिवाय मूस, कॅरिबू, काळी अस्वले, सील व ससे हेही प्राणी आढळतात. किनाऱ्यावर आणि जवळपासच्या बेटांवर सागरी पक्ष्यांचे थवे आढळतात.

अनेत स्थलांतरी पक्षीही येथे येतात. टार्मिगन व स्नाइप अंतर्भागात आढळतात. बदके आणि हंस विपुल आहेत. पेरिग्रिन ससाणा, ऑस्प्रे व टकल्या गरुड हे शिकारी पक्षी आहेत. काही प्राण्यांची संख्या कमीकमी होत चालली आहे. नद्यांतून व सरोवरांतून ट्राउट व सामन मासे विपुल आढळतात. समुद्र विविझ मत्स्यसंपत्तीने समृद्ध आहेत.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate