অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ताहिती

ताहिती

ताहिती

द. पॅसिफिकमधील फ्रेंच पॉलिनीशियातील सोसायटी द्वीपसमूहातील एक मोठे व महत्त्वाचे ज्वालामुखीजन्य बेट. क्षेत्रफळ १,०४२ चौ. किमी. लोकसंख्या ७९,४९४ (१९७१). हे १७° ३७ द. व १४९° २७ प. यादरम्यान वसले असून ५२·८ किमी. लांब आणि २४·८ किमी. रुंद आहे. हे बेट वायव्य–आग्नेय पसरले असून त्याचा वायव्येकडील ताहिती नुई हा मोठा भाग आणि आग्नेयीकडील ताहिती इती हा लहान भाग ताराव्हाओ संयोगभूमीने जोडलेले आहेत.

बेटाची भूमी फारच डोंगराळ आणि उंचसखल आहे. त्यावर चार ज्वालामुखी शिखरे आहेत. ओरोहेना हे त्यांपैकी सर्वांत उंच (२,२३५ मी.) आहे. याच भागात ५०० मी. उंचीवर वैहिरिआ हे ज्वालामुखीजनक कुंड असून त्यातून त्याच नावाची नदी वाहते. पपेनू ही सर्वांत मोठी नदी आहे. बेटाभोवती प्रवाळ भित्ती व खारकच्छे आहेत. बेटाचे हवामान उष्ण आणि दमट असून सरासरी तपमान २९·४° से. असते. पाऊस १७५ ते २५० सेंमी. असून. व्यापारी वारे, समुद्रसान्निध्य व उंची यांमुळे हवामान सुसह्य असते.

येथील वनस्पतींत नारळी, केतकीगण, वन कपास, जास्वंदी, घाणेरी व उष्णकटिबंधीय फळझाडे व फुलझाडे यांचा समावेश होतो. डोंगराच्या माथ्यापर्यंत पसरलेली नयनरम्य हिरवीगार वनश्री, नारळीच्या बागा व उष्णकटिबंधीय फळाफुलांची विपुलता हे ताहितीचे वैभव आहे.

येथे ऊस, नारळ, व्हॅनिला, कॉफी व निरनिराळी फळफळावळ होते. समुद्रात मासे आणि मोती मिळतात. बेटाभोवती अरुंद किनारपट्टी असून तेथेच शेती व नारळीच्या बागा करणाऱ्या लोकांची अनेक खेडी आहेत. ब्रेडफ्रूट, सुरण, नारळ, तारो, केळी, मासे, डुकरे, कोंबड्या हे त्यांचे प्रमुख अन्न असते. घरांवर नारळीच्या झावळ्यांचे छप्पर व भिंती पांडानूच्या विणलेल्या पानांच्या असतात.

लोक उत्तम मच्छीमार असून आनंदी, खेळकर वृत्तीचे आहेत. ते मूळचे पॉलिनीशियन असून सुसंस्कृत होते. गोऱ्यांच्या सहवासाने त्यांची संस्कृती व प्रकृती खालावली. फ्रेंचांच्या हाती निर्यात पिके व उद्योग असून चिनी लोक व्यापारी व दुकानदार आहेत. नारळ, खोबरे, मोती, शिंपले, व्हॅनिला, कॉफी व फॉस्फेट हे प्रामुख्याने निर्यात होतात. पपीटी हे मोठे बंदर व शहर आणि राजधानीचे ठिकाण व पर्यटन केंद्र आहे. येथे सर्व देशांची जहाजे थांबतात.

शिक्षण शासकीय व मिशनरी सहाय्याने होते. पपीटी येथे रुग्णालये असून क्षयरोग हा प्रमुख रोग आहे. ओरोफरा येथे कुष्ठरोग निवारण केंद्र आहे.

यूरोपीयांपैकी पेद्रो फर्‌नँदीश दे कैरॉज या पोर्तुगीजाने हे १६०६ मध्ये शोधले. १७६७ मध्ये ब्रिटिश आरमारीतील कॅ. वॉलिस याने त्यास तिसरा जॉर्ज बेट असे नाव ठेवले. १७६९ मध्ये कॅ. कुक तेथे गेला होता. १८४३ मध्ये येथील स्थानिक पोमारे राज्य फ्रेंचांच्या सत्ते खाली आले.

१८८० मध्ये  ते फ्रेंच वसाहत झाले. १९४० मधील मतदानाने तेथील लोकांनी फ्रेंच सत्तेखालीच राहण्याचे ठरविले. ताहिती लोक फ्रेंच नागरिक समजले जातात व त्यांस सर्व नागरी व राजकीय हक्क असतात.

 

डिसूझा, आ. रे.; पाठक सु. पुं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate