অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चॅनेल बेटे

चॅनेल बेटे

इंग्लिश खाडीतील द्वीपसमूह. क्षेत्रफळ १९४ चौ. किमी.; लोकसंख्या १,२५,२४० (१९७०).

ही बेटे फ्रान्सच्या वायव्य किनाऱ्यापासून १५ ते ५० किमी. आणि इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यापासून ८० ते १५० किमी. दूर असून रोशेदूव्र व शोझे ही फ्रेंच सत्तेखालील बेटे वगळता, जर्सी, गर्न्सी, ऑल्डरनी, सार्क ही बेटे व इतर अनेक लहानसहान बेटे, खडक वगैरे प्रदेश आकडेवारीसाठी युनायटेड किंगडममध्ये समाविष्ट असला, तरी त्यावर प्रत्यक्ष सत्ता ब्रिटिश राजाची (किंवा राणीची) असते.

ही बेटे ९३३ मध्ये नॉर्मंडीचा भाग होती. १०६६ च्या नॉर्मन विजयानंतर ती ब्रिटिश राजाकडे आली.

१३६० मध्ये फ्रान्सच्या राजाने ब्रिटिश राजाचा त्यांवरील हक्क मान्य केला. पूर्वीच्या नॉर्मंडीच्या डचांचा एवढाच अवशेष आता ब्रिटनच्या राजाकडे आहे. जून १९४० ते मे १९४५ पर्यंत ही बेटे जर्मंनांनी व्यापली होती.

भूवर्णन

येथील ऊर्मिल भूप्रदेश नैसर्गिक सृष्टिसौंदर्यासाठी विख्यात असून त्याची उंची कोठेही १४० मी. पेक्षा अधिक नाही. उभ्या दरडीमधून खळाळत जाणारे प्रवाह, समुद्रकाठचे कडे आणि वालुकायुक्त उपसागर ही येथील प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत.

येथील हवामान सौम्य आहे.

ऑगस्टमधील सरासरी तपमान १६-१७ से. असून फेब्रुवारीत ते ६ से. पर्यंत खाली येते. वार्षिक पर्जन्यमान ९० सेंमी. च्या आसपास असते. वसंत ऋतुत आणि उन्हाळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश, हिरवीगार वनश्री व गर्द निळा समुद्र यांची शोभा विलोभनीय असते. अनेक प्रकारचे पक्षी, सरसे, बेडूक, खारी, ससे या बेटांवर आढळतात. गवती साप फक्त जर्सी बेटावर आहे. मासे फारसे नसले तरी खेकडे व शेवंडे भरपूर मिळतात.

मिनी सुपीक असून फळे, फुले आणि बटाटे, टोमॅटो व इतर भाजीपाला यांचे मोठे उत्पन्न येते. गुरे पाळणे हा एक प्रमुख व्यवसाय असून गायीबैलांच्या जर्सी, हर्म व गर्न्सी या विख्यात दुधाळ जाती येथूनच जगात प्रसृत झाल्या. ऑल्डरनी आणि सार्क येथील जातीही प्रसिद्ध आहेत. विणकाम, कापड, तंबाखू, खाणकाम इ. व्यवसाय लहान प्रमाणावर चालतात.

राज्यकारभार

या बेटांचा राज्यकारभार, जर्सी, गर्न्सी व ऑल्डरनी येथील स्टेट्‌स नावाच्या व सार्कमधील चीफ प्लीज नावाच्या विधिमंडळाकडे आहे. त्यांची संविधाने वेगवेगळी आहेत. विधिमंडळाचा अध्यक्ष जर्सीमध्ये व गर्न्सीमध्ये ब्रिटिश राजाने नेमलेला बेलिफ हा शेरिफच्या खालोखाल हुद्याचा अधिकारी असतो. यामुळे जर्सी व इतर एकदोन बेटे आणि गर्न्सी, ऑल्डरनी, सार्क व इतर बेटे यांच्या गटास अनुक्रमे जर्सी बेलिविक व गर्न्सी बेलिविक म्हणतात. ऑल्डरनीत बेलिफ निवडलेला असतो.

सार्कमध्ये सर्वोच्च अधिकारावरील पुरूषास सीनोर व स्त्री असल्यास तिला डेम म्हणतात. विधिमंडळात ब्रिटिश राजाने वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून नेमलेल्या लेफ्टनंट गव्हर्नरास मतप्रदर्शन करता येते; परंतु मतदान करता येत नाही. मात्र त्याला नकाराधिकार आहे.

या बेटांवर काही कुटुंबे शतकानुशतके राहत आली आहेत. परंतु येथे प्राप्तीकर माफक असून स्थावर शुल्क वगैरे इतर कर नसल्यामुळे ब्रिटिश बेटांच्या इतर भागांतून व नॉर्मंडी आणि ब्रिटन येथून अनेक लोक कायम रहावयास आले आहेत. त्यांची भाषा मुख्यतः इंग्रजी आहे. फ्रेंच भाषेचा वापर कमी होत आहे. काही लोक जुनी नॉर्मन फ्रेंच बोलतात. रोमन कॅथलिकांपेक्षा प्रॉटेस्टंटांची संख्या जास्त आहे.

येथे इंग्लंडचेच चलन व डाक तिकिटे आहेत. परंतु काही स्थानिक नाणी व ५ पौंड आणि १ पौंड यांच्या नोटाही प्रचारात आहेत. जर्सी गर्न्सी यांच्या नृपन्यायालयाकडे (रॉयल कोर्ट) न्यायव्यवस्था असे. त्यात बेलिफाशिवाय बारा निवडलेले 'ज्युराट' असतात. यांवर अपील न्यायालय व प्रिव्ही कौन्सिलकडे दाद मागता येते. किरकोळ दिवाणी व फौजदारी दाव्यांसाठी जर्सी व गर्न्सी बेलिविकांत एक एक पगारी न्यायाधीश असतो.

वाहतूक व दळणवळण नौकांनी व विमानांनी बेटाबेटांमधील तसेच बेटे आणि शेजारी देश यांमध्ये वाहतुक होते. बेटांवर बससेवा चालते. डाक, दूरध्वनी व तारायंत्र यांची व्यवस्था त्या त्या बेटावरील डाकखात्याकडे आहे. १९७० मध्ये जर्सीत १६,५७० आणि गर्न्सीत १५,०२५ दूरध्वनी यंत्रे होती.

जर्सीत एक स्वतंत्र दूरचित्रवाणी केंद्र आहे. फ्रेंच बेटांवर दीपस्तंभ आहेत. शोझेवर शेते, चर्च व हॉटेल आहेत. जर्सीची १९७० ची प्रमुख आयात अन्न, यंत्रे, वाहतूक उपकरणे, पेये, तंबाखू, जळण, रसायने व निर्यात बटाटे, टोमॅटो, गुरे अशी होती. गर्न्सीची १९७० ची प्रमुख आयात कोळसा, खनिज तेल व तेले आणि निर्यात टोमॅटो, फुले व नेचे अशी होती. सार्कमध्ये ट्रॅक्टरशिवाय दुसरी मोटारवाहने आणू दिली जात नाहीत.

शिक्षण

जर्सीत १९७१ मध्ये २८ प्राथमिक शाळांतून ५,४६० विद्यार्थी व ३ ग्रामर स्कूल आणि तीन आधुनिक माध्यमिक शाळांमधून ३,२४५ विद्यार्थी होते. कॉलेज ऑफ फरदर एज्युकेशनमध्ये तांत्रिक शिक्षण, डोमेस्टिक सायन्स, संध्याकाळचे शिक्षणवर्ग व प्रौढांसाठी वर्ग चालविण्यात येतात.

गर्न्सीत १५६३ मध्ये एलिझाबेथ राणीने स्थापिलेले मुलांचे एलिझाबेथ कॉलेज व मुलींचे लेडीज कॉलेज आहे. इतरत्र शासकीय ग्रामर स्कूलमधून विद्यापीठ प्रवेशापर्यंत शिक्षण मिळते. मुलींसाठी निवासी कॉन्व्हेंट शाळा आहे.

पर्यटन

पर्यटनाच्या दृष्टीने चॅनेल बेटे महत्त्वाची आहेत. जर्सीचे सेंट हेल्पर, गर्न्सीचे सेंट पीटर पोर्ट व आल्डरनीचे सेंट ॲन हीच फक्त शहरे आहेत.

येथील जुने किल्ले, चर्चे, सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो याचे ऑटव्हिल येथील घर, आल्डरनीचा टेलिग्राम उपसागर, इतिहास पूर्वकालीन अवशेष व चित्तवेधक सृष्टिसौंदर्य आणि सुंदर पुळणी यांमुळे हौशी प्रवासी व सुट्टी मजेत घालवू इच्छिणारे लोक यांची येथे नेहमी मोठी वर्दळ असते.

 

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate