অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्वॉम बेट

ग्वॉम बेट

पॅसिफिक महासागरातील मेअरीॲना द्वीपसमूहातील सर्वांत मोठे व दक्षिणेचे बेट. क्षेत्रफळ ५४१ चौ. किमी.; लोकसंख्या ८६,९२६ (१९७०). १३२६' उ. व १४४ ४३' पू. हे बेट सु. ५० किमी. लांब व ६.५ ते १६ किमी. रुंद असून त्याच्या पश्चिमेस २,५४२ किमी. फिलिपीन्समधील मानिला व पूर्वेस ५,३४४ किमी. हवाईमधील होनोलूलू आहे. येथे अमेरिकेचा पॅसिफिकमधील महत्त्वाचा आरमारी व लष्करी हवाई तळ आहे.

ग्वॉमचा उत्तरेकडील अर्धा भाग उभ्या चढाच्या किनाऱ्याचा व सु. १५० मी. उंचीचा, प्रवाळी चुनखडकयुक्त पठाराचा व दक्षिणेकडील अर्धा भाग ३०० मी. पेक्षा उंच ज्वालामुखीजन्य टेकड्यांचा असून त्यातील मौंट लामलाम हे शिखर ४०७ मी. उंच आहे. या दक्षिणभागातून नद्या पूर्वेकडे व काही पश्चिमेकडे वाहतात. ग्वॉमचे हवामान उष्ण व आर्द्र आहे. तपमान २७ सें., वार्षिक पाऊस २०० ते २५० सेंमी., मुख्यतः मे ते नोव्हेंबरमध्ये पडतो. चक्रीवादळांनी मोठे नुकसान होण्याचा धोका नेहमीच असतो.

उत्तर भाग अरण्यमय असून दक्षिण भाग तलवार गवताने (स्वोर्डग्रास) युक्त आहे. सखल भागातील सुपीक जमिनीत मका, रताळी, तारो, कसाव्हा, केळी, भाजीपाला, नारळ, ऊस, लिंबूफळे, कांदे, हळद, कलिंगडे, काकड्या, टोमॅटो इत्यादींचे उत्पन्न येते. दुसऱ्या महायुद्धानंतर बरेच लोक लष्करी तळावरील नोकऱ्यांत गेल्यामुळे मुख्यतः भाजीपाला, फळे, नारळ एवढेच प्रमुख उत्पन्न राहिले आहे. शेतीवाढीचे प्रयत्न चालू आहेत. १९७०-७१ मध्ये ५६९ शेतकऱ्यांकडे प्रत्येकी २०० हेक्टरहून थोडी अधिक जमीन होती.

वाघुळे व सरडे या मूळ प्राण्यांच्या जोडीला यूरोपीयांनी हरणे, डुकरे, गुरे वगैरे प्राणी व पक्षी आणले. १९७० मध्ये ग्वॉममध्ये ६०५ म्हशी; ५,८०० गुरे; ९०० शेळ्या; ८,७५० डुकरे; ९५ घोडे व १,३०,००० अंडी घालणाऱ्या कोंबड्या होत्या. सु. ६९ मे. टन मासे पकडले गेले. २७६ लक्ष अंडी मिळाली. पूर्वी गरजेपुरते अन्नोत्पादन बेटावर होई. आता अन्नपदार्थ ही प्रमुख आयात आहे.

न्नप्रक्रिया हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याशिवाय सुटे भाग जुळवून घड्याळे तयार करणे, लाकूडसामान बनविणे, तंबाखूचे पदार्थ व मद्यार्कपेये बनविणे हे व्यवसाय आहेत. पर्यटकांची व्यवस्था हा वाढता व्यवसाय आहे. पर्यटकांची संख्या १९६६ मध्ये ३,५०० होती; ती १९६८ मध्ये १८,००० झाली. १९७० मध्ये ती ५०,००० होती. त्या वर्षी पर्यंटकांनी येथे १०५ कोटी डॉलर खर्च केले. तथापि लष्करी तळ हाच येथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. ग्वॉन हा एकच अमेरिकन प्रदेश मुक्त व्यापाराचा आहे. फक्त तंबाखू, द्रवरूप इंधन व मद्ये यांवर आयातकर आहे.

जून १९७० अखेरच्या वर्षांत १० कोटी ३९ लक्ष डॉलरची आयात व १७ लक्ष डॉलरची निर्यात झाली. आयातमाल शेजारच्या इतर बेटांस निर्यात होतो. अगान्य ही राजधानी असून तेथून १३ किमी. वरील आप्राहार्बर हे मुख्य बंदर आहे. सीनाहान्या, बारीगाडा, तामुनिंग व अगान्य हाइट्स ही इतर प्रमुख गावे आहेत.

चार व्यापारी विमान वाहतूक कंपन्यांद्वारे ग्वॉमचा अमेरिका, जपान, फिलिपीन्स व पॅसिफिक बेटांचा विश्वस्त प्रदेश यांच्याशी संपर्क राहतो. एक स्थानिक व दोन बाहेरच्या जहाज कंपन्या सागरी वाहतूक करतात. बेटावर २९३ किमी. फरसबंद व ७५ किमी. सुधारित रस्ते आहेत. ग्वॉममध्ये समुद्रपार बिनतारी संदेश, बिनतारी दूरध्वनी, व्यापारी नभोवाणी, दूरचित्रवामी यांची सोय आहे. १९७०-७१ मध्ये ६,७८५ दूरध्वनी यंत्रे होती.

ग्वॉममधील मूळचे लोक कामोरो. त्यांची भाषाही कामोरो आहे. ती इतर मायक्रोनेशियन भाषांहून वेगळी असून तिचा शब्दसंग्रह व व्याकरण स्वतंत्र आहे. शासनाची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. स्पॅनिश, फिलिपिन, मेक्सिकन, यूरोपीय व इतर पौर्वात्य यांच्याशी संकर झाल्यामुळे मूळ इंडोनेशियन वंशाचे कामोरो लोक आता क्वचितच दिसतात. बेटावरील निम्म्याहून कमी संख्या कामोरोंची असून बाकीचे हवाई, फिलिपीन्स व मुख्यतः अमेरिका इ. देशांचे आहेत. लष्करी तळावरील नोकरीत असलेले व त्यांच्यावर अवलंबून असलेले यांची संख्या १९७० मध्ये ४०,०५५ होती. येथे दोन दैनिके व चार साप्ताहिके मुख्यतः लष्करी व धार्मिक स्वरूपाची आहेत. ९३% लोक रोमन कॅथलिक आहेत.

हा ते सोळा वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. सप्टेंबर १९७० मध्ये येथे बावीस प्राथमिक शाळा, पाच कनिष्ठ माध्यमिक, तीन वरिष्ठ माध्यमिक शाळा, एक व्यावसायिक तांत्रिक शाळा व अपंग मुलांसाठी एक शाळा होती. एकूण २१,००० विद्यार्थी आणि १,१६६ शिक्षक होते. १९६९ मध्ये ग्वॉम विद्यापीठात ६,००० विद्यार्थी होते.

ध्या ग्वॉम अमेरिकेचा सामिलीकरण न झालेला प्रदेश आहे. लोक अमेरिकेचे नागरिक आहेत; परंतु त्यांना अमेरिकेच्या निवडणुकांत मताधिकार नाही. अमेरिकन काँग्रेसमध्ये त्यांना प्रतिनिधित्वही नाही. १९५० च्या कायद्याने ग्वॉम अमेरिकी आरमारी अधिकाऱ्याकडून डिपार्टमेंट ऑफ इंटीरियरकडे मुलकी कारभारात आले. येथील कारभार अमेरिकेच्या अध्यक्षाने चार वर्षांसाठी नेमलेला गव्हर्नर पाहतो.

ग्वॉमच्या २१ निर्वाचित सदस्यांच्या विधिसभेच्या संमतीने तो इतर अधिकारी नेमतो. विधिसभेच्या सदस्यांची मुदत दोन वर्षे असते. १८ वर्षे व त्यावरील वयाच्या स्त्री-पुरुषांस मताधिकार आहे. १९७० च्या निवडणुकांत ६ रिपब्लिकन व १५ डेमोक्रॅट निवडून आले. येथील डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या न्यायाधीशाची नेमणूक अमेरिकेचा अध्यक्ष सिनेटच्या अनुमतीने आठ वर्षांनी करतो. या कोर्टाच्या निकालांवर अमेरिकेच्या अपील कोर्टात व सुप्रीम कोर्टात अपील करता येते. विधिसभेच्या अनुमतीने गव्हर्नर चार वर्षांसाठी दोन न्यायाधीश नेमतो; त्यांपैकी एक पोलीस कोर्टावर असतो. एकोणीस निर्वाचित नगरपालिकांवर प्रत्येकी एक कमिशनर व त्या सर्वांवर चीफ कमिशनर असतो.

इतिहास

इंडोनेशियामर्गे आलेल्या आग्नेय आशियाई कामोरो लोकांच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष आज ग्वॉम बेटावर आढळतात. १५२१ मध्ये मॅगेलन येथे आला असावा असे मानतात. १५६५ मध्ये स्पेनने येथे अंमल बसविला; परंतु मेक्सिको व फिलिपीन्स यांच्या वाटेवरील थांबण्याचे एक ठिकाण यापेक्षा त्यांनी त्याला महत्त्व दिले नाही.

१६८८ मध्ये स्पॅनिश मिशनरी येथे आले. स्पॅनिशांनी केलेला रक्तपात, १६७१ व १६९३ ची भयानक चक्रीवादळे, इन्फ्ल्यूएंझा, देवीच्या साथी यांनी येथील फार लोक मृत्यू पावले. स्पेन-अमेरिका युद्धानंतर पॅरिसच्या तहान्वये १८९८ मध्ये स्पेनने ग्वॉम अमेरिकेला दिले. अमेरिकेने नंतर तेथे आरमारी आणि लष्करी विमानतळ निर्माण केला. आप्राहार्बर येथे अमेरिकेचा अणुसंचलित पाणबुडीतळ आहे.

ग्वॉममधूनच व्हिएटनामवर बाँबवर्षाव करणारी विमाने जात असत. दुसऱ्या महायुद्धात १२ डिसेंबर १९४१ रोजी जपानने ग्वॉम व्यापले. १० ऑगस्ट १९४४ रोजी अमेरिकेने ते पुन्हा जिंकून घेतले. त्या वेळी बेटाची व राजधानीची फार नासधूस झाली. पूर्वी १२,००० वस्ती असलेल्या अगान्यची १९७० ची वस्ती फक्त २,१३१ होती.

येथे आता ट्रस्ट टेरिटरी ऑफ पॅसिफिक आयलंड्सचे प्रमुख नसले, तरी 'यू. एस्. एअर फोर्सेस स्ट्रॅटेजिक एअर कमांड इन पॅसिफिक' चे मुख्य ठाणे आहे. पॅसिफिकमधील अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणून ग्वॉमचे महत्त्व निर्विवाद आहे.

 

डिसूझा. आ. रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate