অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्वॉदल कॅनल बेट

ग्वॉदल कॅनल बेट

ग्वॉदल कॅनल बेट

ब्रिटिश सॉलोमन बेटांपैकी सर्वांत मोठे बेट. क्षेत्रफळ ५,६६८ चौ. किमी. लोकसंख्या २३,९२२ (१९७०). हे पश्चिम पॅसिफिक महासागरात न्यू गिनीच्या पूर्वेस ९७० किमी. वर, ९ १५' द. ते १० द. व १५९ ३५' पू. ते १६० पू. यांदरम्यान असून त्याची कमाल लांबी-रुंदी अनुक्रमे १४७ किमी., ५२ किमी. आहे.

या ज्वालामुखीजन्य डोंगराळ बेटावरील काव्हो या पूर्वपश्चिम पर्वतरांगेतील अत्युच्च शिखर पोपमनासीऊ हे २,४४० मी. उंच आहे. उत्तरेकडे थोडासा मैदानी प्रदेश असून त्यातून मटॅनिको, लुंगा व तेनारू या नद्या वाहतात. येथील वार्षिक सरासरी तपमान २७ से. व पर्जन्यमान २०० ते ३०० सेंमी. असून सर्वत्र घटदाट जंगल व किनारी भागात कच्छ दलदली आहेत.

काही भागांत येथील मेलानेशियन लोक जंगल तोडून शेती करतात. नारळ हे मुख्य उत्पन्न असून खोबरे, इमारती लाकूड व ट्रोकस या सागरी प्राण्याचे बटणे वगैरेसाठी लागणारे शिंपले यांची निर्यात होते.

हिला स्पॅनिश नाविक १५६८ मध्ये आणि पहिला इंग्रज नाविक १७८८ मध्ये येथे उतरला. १८५० नंतर गोऱ्यांची वसाहत होऊ लागली आणि १८९३ मध्ये दक्षिण सॉलोमन बेटे ब्रिटिश संरक्षित बेटे झाली.

दुसऱ्या महायुद्धात जपानने हे व्यापून तेथे विमानतळ बांधला. जपानचे अमेरिकेशी येथे दीर्घकाळ घनघोर नाविक युद्ध होऊन सहा महिने झुंजून जपानने ते सोडले. नंतर हे अमेरिकेचा सैनिकी तळ बनले. उत्तर किनाऱ्यावरील होनीआरा ही बेटाची राजधानी आणि मुख्य बंदर झाले. तेथे १९५३ पासून पश्चिम पॅसिफिकमधील ब्रिटिश हायकमिशनरचे मुख्य कार्यालय आहे. हेंडरसन फील्ड हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.


कांबळे, य. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/18/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate