অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गिल्बर्ट आणि एलिस बेटे

गिल्बर्ट आणि एलिस बेटे

गिल्बर्ट आणि एलिस बेटे

ब्रिटिशांची पॅसिफिकमधील द्वीपवसाहत. पश्चिम पॅसिफिकमध्ये ही द्वीपे एकूण ५२ लक्ष चौ.किमी. प्रदेशात पसरलेली असली तरी त्यांचे प्रत्यक्ष भूक्षेत्र फक्त ९७१ चौ.किमी. आहे. एकूण लोकसंख्या १९६८ मध्ये ५५,१८५ होती. तारावा बेटावरील बैरिकी हे मुख्य ठाणे आहे.

उ. ते ३ द. व १७२ पू. ते १७८ पू. या दरम्यानची मॅकिन किंवा बुतारीतारी, लिट्ल मॅकिन, माराके, आबाइआंग, तारावा, माइआना, आबेमामा किंवा आपामामा, आरानूका, कुरिया, नोनोऊटी, ताबितेऊएआ, ओनोरोआ, बेरू, नीकूनाऊ, तामाना व आरॉराई ही गिल्बर्ट बेटे; ५ द. ते ११ द. व १७६ पू. ते १८० पू. दरम्यानची नेनूमेआ, नीऊताओ, नानूमांगा, नूई, व्हाइतूपू, नूकूफेताऊ, फूनाफूती, नूकूलाइलाई आणि न्यूलाकीता ही एलिस बेटे; २ द. ते ५ द. आणि १७१प. ते १७५प. यांदरम्यानची गार्डनर, हल्, सिडनी, मकीन, फीनिक्स, बरनी, एंडरबेरी आणि कँटन ही फीनिक्स बेटे; १ उ. ते ५ उ. व १५७. प. ते १६१ प. यांदरम्यानची फॅनिंग, वॉशिंग्टन आणि ख्रिसमस ही लाइन बेटांपैकी उत्तरेकडील बेटे आणि ० ५२' द. व १६९३५' पू. येथे वसलेले ओशन बेट या एकूण ३७ बेटांचा समावेश या वसाहतीत होतो. यांपैकी ओशन बेट हे ५७७ हे. विस्ताराचे व ८१ मी. उंचीचे प्रवाळ व फॉस्फेटयुक्त बेट असून बाकीची प्रवाळ कंकणद्वीपे आहेत. त्यांतील ख्रिसमस बेट हे जगातील सर्वांत मोठे कंकणद्वीप आहे. ही बेटे भरतीच्या पाण्यापेक्षा जेमतेम ३-४ मी. उंच असतात. भोवतीच्या प्रवाळ कंकणांमुळे त्याचे लाटांपासून संरक्षण होते.

येथील तपमान २६·७ से. ते ३३·९ से. असते. उत्तर गिल्बर्ट बेटांत २०० ते २५० सेंमी. पाऊस पडतो. एलिस बेटांत ३०० सेंमी., फीनिक्स बेटात १२५ सेंमी. व दक्षिण गिल्बर्ट बेटांत १०० सेंमी. पाऊस पडतो. फीनिक्स व दक्षिण गिल्बर्ट बेटांत कधीकधी अवर्षणच पडते.

या बेटांवरील प्रमुख वनस्पती म्हणजे नारळ होय. त्याखालोखाल पांडानुस किंवा स्क्रू पाइन ही केवड्याच्या वंशातील वनस्पती उगवते. प्रवाळी वाळू व समुद्रातून वाहत आलेले पदार्थ यांचीच मृदा बनलेली असल्यामुळे दुसऱ्या काही वनस्पती उगवतच नाहीत. किनाऱ्याजवळ उथळ समुद्रात मासे मात्र भरपूर सापडतात; पोटापुरते मासे पकडणे हा लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे.

या बेटांचा शोध मुख्यत्वे १७६५ ते १८२४ च्या दरम्यान बायरन, गिल्बर्ट, मार्शल या ब्रिटिश नाविकांनी, फॅनिंग या अमेरिकनाने व इतर व्यापाऱ्यांनी लावला. १८९२ मध्ये ब्रिटिशांनी या बेटांवर आपले संरक्षण जाहीर केले व १९१५ मध्ये ती वसाहत म्हणून आपल्या राज्याला जोडली. फीनिक्स बेटे १९३७ मध्ये वसाहतीत सामील झाली.

१९४१ मध्ये जपान्यांनी गिल्बर्ट बेटे घेतली व १९४२ मध्ये ओशन बेटही घेतले. दोस्त सैन्यांनी नंतर त्यांना काढून लावले. या बेटांपैकी काहींवर अमेरिका हक्क सांगत आहे. १९६७ पासून येथील कारभार लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत कमिशनर पाहतो. स्थानिक कारभारासाठी कौन्सिले स्थापन केली गेली आहेत. ऑस्ट्रेलियन डॉलर हे येथील अधिकृत नाणे. लोक मायक्रोनीशियन, पॉलिनीशियन, निग्रो, यूरोपीय इ. असून इंग्रजीशिवाय गिल्बर्टी, सॅमोअन अशा आदिवासी भाषा बोलल्या जातात. तारावा बेटावर नभोवाणीकेंद्र असून मोठा विमानतळ आहे.

 

डिसूझा, आ. रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate