অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आटाकामा वाळवंट

आटाकामा वाळवंट

आटाकामा वाळवंट

दक्षिण अमेरिकेच्या प. किनाऱ्यावरील मरुस्थल. अक्षांश ५ ते ३० द. पेरू देशाच्या दक्षिण सरहद्दीपासून चिलीमधील कोप्यापो नदीपर्यंत हे सु. ९६० किमी. लांब व पश्चिमेस पॅसिफिक किनाऱ्यावरील पर्वतश्रेणीपासून पूर्वेस अँडीज पर्वताच्या डोमेको श्रेणीपर्यंत सु. ३३ ते ८० किमी. रुंद आहे. येथील पॅसिफिकचा किनारा एकदम सु. ९०० मी. उंच व अवघड कड्यांचा बनलेला असल्यामुळे येथे नैसर्गिक बंदरे फारशी नाहीत.

आटाकामाचे वाळवंट सरासरीने ६००९०० मी. उंचीवर आहे. उथळ, वाळूची बेटे असलेली खारी सरोवरे व सभोवताली टेकड्या अशा बोल्सन प्रकारचे हे वाळवंट असून कॅक्टस व तशा प्रकारच्या फारच थोड्या मरुवासी वनस्पती येथे आढळतात. जगातील हा सर्वांत शुष्क भाग समजला जातो. किनाऱ्याजवळून हंबोल्ट हा थंड महासागरी प्रवाह जात असल्याने तेथे धुके, थराथरांचे ढग, आर्द्रता व सम हवामान असते.

अंतर्भागात मात्र शुष्कता व विषम हवामान जाणवते. उदा., पॅसिफिक किनाऱ्यावरील ईकीक या बंदरावर १९४८६८ या वीस वर्षांत चौदा वर्ष पावसाचा एक थेंबही पडला नाही; आणि सहा वर्षांत फक्त २·७ सेंमी. पाऊस पडला. कालामा या अंतर्गत भागातील ठिकाणी अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. अँडीजवरून हजारो प्रवाह पश्चिमेकडे उतरतात. परंतु आटाकामामध्ये येताच हे लुप्त होतात. त्या पाण्याचा पुरवठा काही मरूद्यानांस होतो.

लोआ ही सु. ४२२ किमी. वाहणारी या भागातील एकुलती एक नदी होय. पिण्यासाठी, मरूद्यानांसाठी आणि हल्ली जलविद्युतशक्तीसाठी हिचा उपयोग केला आहे. ही जलवाहतुकीस उपयुक्त नाही आणि ती पॅसिफिकला मिळते तो भाग अवघड कड्यांचा असल्याने तेथे बंदरही बनू शकले नाही.

अतिशय वैराण भाग म्हणून एकोणिसाव्या शतकापर्यंत हा दुर्लक्षित होता. इंकाच्या सम्राटांनी आपले साम्राज्य वाढविण्यासाठी या वाळवंटातील मरूद्यानांना सांधून एक दक्षिणोत्तर रस्ता बनविला होता. स्पॅनिश विजेत्यांनी यात थोडीफार भर घालून काही पूर्वपश्चिम रस्ते काढण्याचा प्रयत्‍न केला. परंतु आटाकामाच्या ओसाड मरुभूमीत जेव्हा खनिज संपत्ती असल्याचा शोध लागला, तेव्हाच हा भाग ऊर्जितावस्थेस आला. आटाकामाचा बराच भाग पूर्वी पेरू व बोलिव्हिया यांच्या मालकीचा होता; परंतु १८७८८४ मध्ये झालेल्या ‘पॅसिफिक युद्धा’ त चिलीने तो भाग या संपत्तीसाठीच जिंकून घेतला. येथे चांदी व तांबे असल्याचा शोध (१८३२च्या सुमारास ) लागल्याने लोकांनी इकडे धाव घेतली.

या भागात मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या नायट्रेट्स व इतर तत्सम लवणांचा खतासाठी उपयोग होईल हे संशोधकांनी सिद्ध केल्यावर येथे लोकांची गर्दी झाली; कारण या उद्योगाला मनुष्यबलाची जरुरी होती. आंतोफागास्ता, ईकीक, तालताल व आरीका ही बंदरे व कालामा, ताक्‍ना, पींटाडोस, पीका ही मरूद्यानांची स्थळे या उद्योगांनी फोफावली. कित्येक खाणींच्या ठिकाणी अन्न व पाणीसुद्धा दुसरीकडून आणून पोचवावे लागे. आटाकामात लोहमार्ग बनविण्यात आले.

१९०० नंतर कृत्रिम खतांचा शोध लागल्याने आटाकामाचे महत्त्व थोडे कमी झाले. परंतु तोपर्यंत चिलीची याबाबत मक्तेदारी असल्याने तो देश संपन्न झाला. हल्ली पेद्रो द व्हॉल्डीव्हिया व मारीआ एलेना या उत्तरेकडील दोन ठिकाणांहून प्रामुख्याने उत्पन्न काढले जाते. जागतिक कोट्याप्रमाणे येथून चिलीस दरसाल ठराविक टनच उत्पन्न काढावे लागते. यातील बराचसा भाग अमेरिकेतच खपतो.

टाकामामधील चांदी व तांबे ह्यांच्या बराचशा खाणी आर्थिक दृष्ट्या किफायतशीर न ठरल्यानेच लवकर बंद झाल्या. कालामाजवळील चूकीकामाता खाणीतून व पोतेरिलोस येथील दोन खाणींतून मात्र अद्यापही तांबे काढले जाते. चूकीकामाता ही जगातील तांबे काढणारी मोठ्यात मोठी खाण समजली जाते वा तांब्याच्या जागतिक उत्पादनात अमेरिका, रशिया यांच्या खालोखाल चिलीचा क्रमांक लागतो.

टाकामासारख्या अत्यंत उजाड प्रदेशातही खनिजसंपत्तीमुळे मानवाने वस्ती केली आहे. कालांतराने ही खनिजे संपली म्हणजे मरूद्यानात वस्ती करून राहिलेले मूळचे इंडियनच तेवढे येथे कायम राहण्याचा संभव आहे.

 

शाह, र. रू.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate