অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्यूशन बेटे

अल्यूशन बेटे

अल्यूशन बेटे

उत्तर पॅसिफिकमधील बेरिंग समुद्राच्या दक्षिणेकडील बेटे. क्षेत्रफळ १७,६६६ चौ. किमी.; लोकसंख्या ६,०११ (१९६०). विस्तार ५२° ते ५५° उ. व १७२° पू. ते १६३° प. अलास्काच्या नैर्ऋत्य टोकापासून रशियाच्या कॅमचॅटका द्वीपकल्पापर्यंत सु. १,९०० किमी. पसरलेल्या या द्वीपसमूहाचे फॉक्स, आंद्रे आनॉफ, रॅट आणि निअर आयलँड्स असे चार विभाग असून ते अमेरिकेच्या अलास्का राज्यात मोडतात.

अलास्का किनाऱ्‍याला लागून असणाऱ्या फॉक्स द्वीपसमूहात प्रामुख्याने यूनिमॅक, अनालस्का, अमनॅक, आकतान ही बेटे असून अनालस्का व डच हार्बर ही यांतील महत्त्वाची ठाणी आहेत. आंद्रे आनॉफ द्वीपसमूहात अ‍ॅमलिया, आतका, ग्रेट सित्किन, अडक, कानागा व तानागा ही बेटे आहेत. रॅट द्वीपसमूहात सेमिसोपॉचनॉय, अ‍ॅमचित्का, किस्का, बुलदीर आदी बेटे आहेत, तर निअर द्वीपसमूहात सेमिची, अ‍ॅगात व अ‍ॅत या बेटांचा समावेश होतो.

या द्वीपसमूहांच्या मालिकेतून जहाजांना जाण्यायोग्य असे यूनिमॅक, अमुक्ता, अ‍ॅमचित्का व सेगुआम हे मार्ग आहेत. बेटांभोवती जोरदार प्रवाह व भोवरे आढळतात. मधल्या काही भागांत सागराची खोली ५,४०० मीटरपेक्षा जास्त आहे. ही बेटे जलमग्न पर्वतरांगेची शिखरेच आहेत. त्यांचे उतार अत्यंत तीव्र आहेत. या द्वीपसमूहात ३०—४० जागृत ज्वालामुखी आहेत व सर्वत्र राख व माती आढळते. यूनिमॅक बेटावरील शिशालदिन ह्या सर्वांत उंच ज्वालामुखीची उंची २,८६४ मी. आहे. त्याला ‘स्मोकिंग मोझेस’ म्हणतात. इसानोस्की, व्हेसीडॉक व मौंट क्लीव्हलँड ही इतर उंच शिखरे आहेत. अलास्का व कॅमचॅटकाशी ही बेटे सलग असावीत असा अंदाज आहे.

या बेटांवर अतिशय वाईट हवामान आहे. रॅट समूहातील किस्काचे व लंडनचे अक्षांश सारखे आहेत. वर्षभर वादळी वारे वाहतात. यूरेशियावरून येणारी थंड हवा व पॅसिफिकवरील ऊबदार व दमट हवा यांच्या मिश्रणामुळे वादळे, धुके, पाऊस व हिमवर्षाव नेहमीच असतात. आठवड्यातील ५-६ दिवस पाऊस पडतो. जानेवारीत सरासरी तपमान -२° से. व ऑगस्टमध्ये ८·७° से. असून पावसाची वार्षिक सरासरी ८४ सेंमी. आहे. वनस्पतींच्या वाढीचा काळ मे ते सप्टेंबरपर्यंत असून येथे फक्त काही भाज्याच वाढू शकतात. गवत, लव्हाळे, झुडपे व काही सपुष्प वनस्पती येथे आढळतात.

डॅनिश नाविक व्हीटुस बेरिंग याला रशियाच्या झारने अ‍ॅलेक्सी चेरीकॉव्ह याच्याबरोबर १७४१ मध्ये मोहिमेवर पाठविले. त्यात चेरीकॉव्ह व बेरिंगची जहाजे वादळात वेगळी झाली. चेरीकॉव्हने पूर्व बाजूची व बेरिंगने पश्चिमेची बेटे शोधली. त्या सफरीतच कमांडर द्वीपसमूहाजवळ बेरिंगचा मृत्यू झाला. रशियन व्यापाऱ्यांनी येथे फर व्यापाराची केंद्रे उघडली. एमील्यन बॅसाव्ह या एकाच नाविकाने एका फेरीमध्येच १,६०० ऑटरची, २,००० सीलची व २,००० निळ्या कोल्ह्यांची कातडी रशियास नेल्यामुळे फर व्यापाराकरिता येथे गर्दी झाली; परंतु लौकरच फरचा तुटवडा पडला व १८६७ मध्ये रशियाने अमेरिकेला अलास्काबरोबरच ही बेटेही विकली.

या बेटांत एस्किमो वंशाचे अ‍ॅल्यूट लोक आढळतात. ते अलास्कामधून आले. त्यांचे अनालास्कन व अम्टकान्स हे दोन प्रकार आहेत. अनालास्कन शुनागिन व फॉक्स बेटांत, तर अम्टकान्स अ‍ॅड्रिनॉफ, रॅट व निअर बेटांत आहेत. सर्व वस्त्या किनाऱ्यावरच आहेत. जीवन समुद्रावरच अवलंबून असते. तरंगत आलेले लाकूड, समुद्रप्राणी, मासे, पक्षी यांवर त्यांच्या गरजा भागतात. ह्या बेटांचा शोध लागला त्या वेळी या आदिवासींची येथील लोकसंख्या २५,००० होती पण भयानक कत्तली व नंतर देवीची साथ, यांमुळे त्यांची संख्या १८४८ साली २,५०० पेक्षाही कमी झाली. हे लोक घरे जमिनीखाली बांधतात. एकत्र ४० कुटुंबे राहू शकतील अशी सामुदायिक घरेही आढळतात. सुरुवातीस येथे गुलामगिरी होती. फर गोळा करणे, सील व व्हेलची शिकार हे येथील महत्त्वाचे व्यवसाय असून आता बऱ्याच बेटांवर मेंढ्यांची निपज सुरू केलेली आहे. सीलची चरबी दिव्यास वापरतात व कातड्यापासून रेनकोट बनवतात. हार्पून व विषारी लेप लावलेली हत्यारे शिकारीस वापरतात. स्त्रिया शिवण व विणकामात तरबेज आहेत. मृत देह टिकवून ठेवण्याची कला त्यांना अवगत आहे.

जपानने १९४२ मध्ये काही भागांवर हल्ले केले होते. अडक व अ‍ॅमचित्का बेटांवर नाविक तळ असून शेम्या हा अतिपूर्वेकडील महत्त्वाचा विमानतळ या भागातच आहे. रशियाशी भिडून असल्याने तसेच दूर पल्ल्याच्या विमानांमुळे व क्षेपणास्त्रांमुळे या बेटांना महत्त्व आहे.

 

डिसूझा, आ. रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate