অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रूआन

रूआन

रूआन

फ्रान्समधील एक मोठे औद्योगिक नगर, प्रसिद्ध बंदर आणि सेन-मॅरिटाइम विभागाच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १,०१,७०० (१९८२). फ्रान्सच्या वायव्य भागात सेन नदीमुखावर वसलेले रूआन पॅरिसच्या वायव्येस १४० किमी., तर इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावरील ल हाव्र्हच्या पूर्वेस ८७ किमी. वर आहे. सुरुवातीला येथे केल्टिक वसाहत होती. रोमनांनी राटुमा या केल्टिक नावाचे रोटोमॅगस असे लॅटिनीकरण करून त्याचे प्रांतीय राजधानीत रुपांतर केले. इ. स. २६० पासून हे बिशपचे (नंतर आर्चबिशपचे) ठिकाण बनले. इ. स. ८७६ मध्ये नॉर्मंनांनी याच्यावर हल्ला केला.

इ. स. ९१२ मध्ये रूआन नॉर्मंडीची राजधानी बनली. शेवटचा ड्यूक इंग्लंडचा किंग जॉन याला १२०४ मध्ये फिलिप ऑगस्टसने पदच्युत केले. तेव्हा रूआनचा ताबा फ्रेंचांकडे आला. १४४९ मध्ये रूआन पुन्हा फ्रेंचांनी घेतले. त्यापुढे एक शतकभर रूआन फ्रान्सने प्रमुख सांस्कृतिक केंद्र होते. त्यानंतर एकोणिसाव्या शतकापर्यंत शहराचे तसेच बंदराचे महत्त्व कमी होत गेले. कापडाचा व्यापार सुरू झाल्यापासून रूआनचे महत्त्व पुन्हा वाढू लागले.

१८७० मधील फ्रँको-प्रशियन युद्धात रूआन जर्मनांनी घेतले. अनेक प्राचीन इमारती शहरात आढळत असून त्याला संग्रहालय-नगर असेही संबोधले जाते. गॉथिक पॅलेस ऑफ जस्टिस (पंधरावे व सोळावे शतक), व्हिन्सेंट चर्च (सोळावे शतक), नोत्रदाम कॅथीड्रल, सेंट ओंएन चर्च (चौदावे शतक), सेंट मॅक्लाऊ चर्च (पंधरावे शतक), ग्रेट क्लॉक टॉवर (चौदावे शतक), ब्यूरो देस फिनॅन्स, कौर देस कॉम्प्टेस, फिरर्ते सेंट रोमेन या येथील प्रसिद्ध व सुंदर वास्तू आहेत.

सोळाव्या शतकातील धर्मयुद्धात तसेच दुसऱ्या महायुद्धकाळात शहरातील बऱ्याचशा इमारतींची पडझड झाली. त्यांपैकी काहींची पुनर्रचना करण्यात आली आहे. फिलिप ऑगस्टसने इ. स. १२०७ मध्ये बांधलेला येथील मनोरा विशेष उल्लेखनीय असून जोन ऑफ आर्कला येथेच तुरूंगात ठेवल्याचे सांगितले जाते. तिच्या नावावरूनच याला जोन ऑफ आर्क टॉवरअसे नाव देण्यात आले. फाइन आर्ट्‌स म्यूझीयम, अँटक्विटीज म्यूझीयम, आयर्नवर्क म्यूझीयम ही येथील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये आहेत.

१९६६ मध्ये येथे एका विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. रूआन हे देशातील सर्वांत मोठे बंदर व प्रसिद्ध व्यापारी केंद्र आहे. त्यामुळेच त्याला आर्थिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले आहे. या बंदरापर्यंत २०,००० टन वजनाच्या बोटी येऊ शकतात. या बंदरातून कोळसा, लाकूड, खनिजे, कापूस, खनिज तेल, फॉस्फेट, रसायने मद्य, फळे यांची आयात, तर यंत्रे,खते, तेल उत्पादने, सिंमेट व कापड ह्या सेन खोऱ्यातील औद्योगिक संकुलात निर्माण होणाऱ्या उत्पादनांची निर्यात केली जाते. रूयान हे पॅरिसचे बंदर आहे

येथील वाहतूक व व्यापाराच्या सोयीमुळे रूआन व सभोवतालची शहरे मिळून एका मोठ्या औद्योगिक संकुलाची निर्मिती झालेली आहे. यात जहाजबांधणी व दुरुस्ती,लोहभट्ट्या, धातू उत्पादने, औषधे, कागद, यंत्रनिर्मिती उद्योग, खनिज तेल व उत्पादने, चामड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खतनिर्मिती इत्यांदींचे विविछ कारखाने येथे आहेत. सुती वस्त्रोत्पादात रूआनचा देशात तिसरा क्रमांक लागतो.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate