অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानिला

मानिला

पसीग नदीकाठावर वसलेले मानिला शहर

मानिला

 

 

 

 

फिलिपीन्सची राजधानी व प्रमुख बंदर. देशाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक केंद्र, लोकसंख्या १६,३०,४८५; महानगरीय ५९,२५,८८४ (१९८०). उत्तर फिलिपीन्समधील लूझॉन या मोठ्या बेटाच्या नैर्ऋत्य भागात, मानिला उपसागाराच्या पूर्व किनाऱ्यावर, पसीग नदीच्या त्रिभुज प्रदेशात मानिला वसलेले आहे. याचे आधीचे ‘मेनिलाद हे नाव येथील एका फुलझाडावरून पडले; पुढे त्याचेच ‘मानिला’ झाले.

पूर्वेकडील ईस्टर्न कॉर्डिलेराच्या रांगांमुळे मानिलाचे पूर्वेकडील वादळी वाऱ्यांपासून बरेचसे संरक्षण होते. पसीग नदी नौसुलभ असून तिच्यामुळे लागूना दे बाय हे गोड्या पाण्याचे सरोवर मानिला उपसागाराला जोडले गेले आहे.

मानिलाचे हवामान आर्द्र, उष्ण कटिबंधीय आहे. ‘मानिला हेंप’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ॲबका या केळीवर्गीय बळकट धागा देणाऱ्या वनस्पतीपासून बनविलेली येथील दोरखंडे जगप्रसिद्ध आहेत. उष्ण हवामानात अत्यंत सोईचा ठरलेला मानिला नावाचा सदऱ्यासारखा कपडा मूळचा येथील असावा.

हे मूळचे छोटेसे, मुसलमानी वस्तीचे गाव. मीगेल लोपेस दे लेगास्पी (१५१०? –१५७२) या स्पॅनिश सेनाप्रमुखाने नदीमार्गे येऊन ते १५७१ मध्ये उद्ध्वस्त केले व तेथे तटबंदीयुक्त शहर वसविले. १५७४ मध्ये चिनी, सतराव्या शतकात डच, अठराव्या शतकात ब्रिटिश, अशी आक्रमणे व सत्तांतरे होत होत स्पॅनिश अमेरिकन युद्धानंतर १८९८ मध्ये ते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे आले.

दुसऱ्या महायुद्धात १९४२ मध्ये मानिला जपानने जिंकले; परंतु १९४५ मध्ये अमेरिकेने ते पुन्हा मिळविले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फिलिपीन्समध्ये स्पॅनिशांविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ जोर धरीत होती. होसे रिसाल हा राष्ट्रीय नेता होता. त्याचा स्पॅनिशांनी १८९६ मध्ये ज्या ठिकाणी वध केला, त्याच ठिकाणी आता त्याचे स्मारक उभे आहे.

एमील्यो आगिनाल्दोस (१८६९–१९६४) या नेत्याने १८९८ मध्ये देशाचे स्वातंत्र्य जाहीर केले; परंतु पुढे त्याने अमेरिकेचे शासन मान्य केले. अखेर १९४६ मध्ये देश स्वतंत्र झाला, तेव्हा मानिला ही राजधानी घोषित झाली. १९४८ मध्ये केसॉन सिटी हे मानिलाच्या ईशान्येचे ठिकाण राजधानी बनले. १९७६ मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या हुकुमाने मानिला पुन्हा राजधानी करण्यात येऊन केसॉन सिटी हे त्याचे महत्त्वाचे उपनगर बनले.

मानिलाच्या मध्यातून पसीग नदी वाहते. तिच्या उत्तरेस सात, दक्षिणेस सहा व नदीने दुभंगलेला एक असे मानिलाचे एकूण चौदा प्रशासकीय विभाग आहेत. ते सहा पुलांनी जोडलेले आहेत.

१९७५ मध्ये राष्ट्राध्यक्षांची पत्नी इमेल्दा मार्कोसच्या आधिपत्याखाली मानिला, केसॉन सिटी, पासाय व कालोओकान ही शहरे आणि इतर तेरा गावे समाविष्ट करणाऱ्या ‘मेट्रो मानिला’ या पाच सदस्यांच्या आयोगाकडे सर्व कारभार सोपविण्यात आला. औद्योगिकीकरणाला बाधा न आणता लोकसंख्येची दाटी कमी करणे आणि कारखाने व उद्योगधंदे यांचे विकेंद्रीकरण करणे, यांवर आयोगाचा भर आहे.

मानिलामध्ये वस्त्रोद्योग, पिठाच्या व तांदळाच्या गिरण्या, डबाबंद खाद्यपदार्थ, औषधे, प्लॅस्टिके, सिगारेट व तंबाखूची तत्सम उत्पादने, टोप्या, चामड्याच्या वस्तू, शिंपल्यांची बटणे, पादत्राणे, बीर, साखर, खोबरेल, साबण, मोटारींचे भाग, काचेच्या वस्तू, खिळे, रंग, रबराच्या वस्तू, दोर व दोरा, रेडिओचे भाग, यंत्रे, आगपेट्या, बांधकाम साहित्य इ. वस्तुनिर्मितीचे अनेकविध व्यवसाय, कारखाने व उद्योग चालतात.

बराचसा आयात-निर्यात व्यापार अमेरिकेशी व यूरोपीय देशांशी चालतो. मानिलाच्या दक्षिण बंदरातून सु. ८५% आयात व २०% निर्यात होते. उत्तर बंदरातून आंतरद्विपीय जलवाहतूक चालते. दक्षिण बंदराजवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बंदरापासून दक्षिणोत्तर रेल्वे व रस्ते सर्वदूर गेले आहेत.

मानिलाची वाहतूक समस्या बिकट आहे. उत्तरेकडील तोंडो हा विभाग गरीब, मागासलेल्या अतिदाट लोकवस्तीचा असून तेथे बरेच चिनी राहतात. दक्षिणेकडील एर्मिटा व मालाटे हे विभाग नवविकसित व आधुनिक रचनेचे असून तेथे धनाढ्य फिलिपिनोंचे प्रासाद आढळतात.

माकाती या उपनगरी भागात उत्तुंग इमारती, व्यापारी पेढ्या, दूतावास, मोठी हॉटेले, क्लब, देशी-परदेशी बँका, विमा कंपन्या यांची प्रधान कार्यालये, मानिलाचा शेअरबाजार इ. आहेत; तर सांपालॉक व मीगेल विभागांत राष्ट्राध्यक्ष निवास, विद्यापीठे इ, वास्तू आहे.

मानिलात बहुतेक लोकवस्ती फिलिपिनोंची असून सु. ६% चिनी, काही अमेरिकन व यूरोपीय आहेत. ९४% लोक रोमन कॅथलिक, २% प्रॉटेस्टंट व १% बौद्ध आहेत. एकट्या मानिलात साठ चर्च आहेत. मानिलात सु. २५ नभोवाणी केंद्रे आणि सहा दूरचित्रवाणी केंद्रे असून सात इंग्रजी दैनिके व सात साप्ताहिके, सात स्पॅनिश वृत्तपत्रे, तागालोग या स्थानिक भाषेतील दोन दैनिके व दहा साप्ताहिके येथून प्रसिद्ध होतात.

मानिलात बारा विद्यापीठे असून त्यांत सँटो टोमास हे १६११ मध्ये स्थापन झालेले व जपानी आक्रमणाच्या वेळी कारागृह म्हणून वापरलेले विद्यापीठ तसेच एक महिला विद्यापीठ यांचा समावेश आहे. फिलिपीन्सच्या १०% लोकसंख्या असलेल्या मानिलामध्ये देशातील ८७% शैक्षणिक संस्था आहेत.

फिलिपीन जनरल हॉस्पिटल, सेंट लूक्स, मेरी जॉन्सन (स्त्रिया व मुले यांकरिता), अमेरिकन हॉस्पिटल यांसारखी प्रख्यात व सर्व वैद्यकीय सुविधायुक्त अशी रुग्णालये शहरात असून जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालयही येथेच आहे; तथापि वाहतूक, प्रदूषण इ. नवनवीन समस्याही तेथे बिकट होत आहेत.

वॅक वॅक गोल्फ अँड कंट्री क्लब, रिसाल मिमॉरिअल स्टेडियम, आरानेटा कॉलिसियम, नॅशनल म्यूझीयम, नॅशनल लायब्ररी यांसारख्या प्रेक्षणीय वास्तू, सॅन ऑगस्टीन हे देशातील सर्वांत जुने चर्च (१६०६), होसे रिसाल या राष्ट्रीय नेत्याचे स्मारक असलेले लूनेटा पार्क हे मोठे उद्यान ही मानिलामधील प्रमुख आकर्षणे होत.

 

कुमठेकर, ज. ब.; चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate